फेमस रील स्टार अरुण तुपेचं निधन, छत्रपती संभाजीनगरमध्ये हळहळ, घरातच मृतावस्थेत आढळला
Reel Star Arun Tupe Death : अरुण सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय होता आणि निधनाच्या अवघ्या 21 तासांपूर्वीच त्याने आपला शेवटचा रील पोस्ट केला होता. विशेष म्हणजे मृत्यूच्या काही तास आधीपर्यंत तो चाहत्यांच्या कमेंट्सना रिप्लाय देखील देत होता.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
फेमस रील स्टार अरुण तुपेचं निधन
छत्रपती संभाजीनगरमध्ये हळहळ, घरातचं मृतावस्थेत आढळला
Reel Star Arun Tupe Death : छत्रपती संभाजीनगरमधील प्रसिद्ध रील स्टार अरुण तुपे याचा राहत्या घरी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आज (मंगळवार 10 मार्च) सकाळी समोर आली आहे. छत्रपती संभाजीनगरमधील त्याच्या निवासस्थानी तो मृतावस्थेत आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडालीये. त्याच्या मृत्यूनंतर सोशल मीडिया विश्वातून मोठी हळहळ व्यक्त होत आहे. 'कोण अरुण तुपे' या नावाने इन्स्टाग्रामवर त्याचे अकाऊंट असून आपल्या अभिनय कौशल्याने आणि विनोदी शैलीने त्याने फॉलोवर्सच्या मनावर अधिराज्य गाजवले होते.
अरुण सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय होता आणि निधनाच्या अवघ्या 21 तासांपूर्वीच त्याने आपला शेवटचा रील पोस्ट केला होता. विशेष म्हणजे मृत्यूच्या काही तास आधीपर्यंत तो चाहत्यांच्या कमेंट्सना रिप्लाय देखील देत होता. त्यामुळे इतक्या कमी वेळात त्याच्यासोबत असे काही घडेल याची कल्पना कोणालाही नव्हती. त्याच्या या शेवटच्या रीलवर आता नेटकरी मोठ्या संख्येने कमेंट्स करून आपल्या लाडक्या कलाकाराला श्रद्धांजली अर्पण करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार अरुण त्याच्या घरात अत्यंत गंभीर अवस्थेत आढळून आला होता. त्यानंतर नातेवाईकांनी त्याला तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले मात्र डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. अरुणचा मृतदेह शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून या अहवानंतरच त्याच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होऊ शकणार आहे. त्याच्या अचानक जाण्याने तुपे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.










