टिटवाळ्यात गणपती विसर्जन मिरवणुकीत तुफान राडा, भाजप-ठाकरे गट आमने-सामने
गणपती विसर्जन मिरवणुकीत पुढे जाण्यावरून सुरू झालेला वाद धक्काबुक्की आणि मारहाणीपर्यंत पोहोचला. कल्याणजवळील टिटवाळ्यात घडलेल्या या घटनेप्रकरणी भाजप आणि ठाकरे गटातील ७० ते ८० जणांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
ADVERTISEMENT

टिटवाळा: कल्याणजवळील टिटवाळा परिसरात गणपती विसर्जन मिरवणुकीदरम्यान पुढे जाण्यावरून भाजप आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते आमनेसामने आल्याची घटना घडली. या वादाचे रूपांतर धक्काबुक्की, मारहाण आणि गोंधळात झाल्याचा आरोप आहे. या घटनेमुळे मिरवणुकीत काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.
मिरवणुकीत पुढे जाण्यावरून वाद
मिळालेल्या माहितीनुसार, गणपती विसर्जन मिरवणुकीत पुढे जाण्यावरून दोन्ही गटांमध्ये वाद झाला. या वादात भाजपच्या माजी उपमहापौर तथा विद्यमान नगरसेविका उपेक्षा भोईर, त्यांचे पती शक्तिवान भोईर, ठाकरे गटाचे माजी नगरसेवक सुरेश भोईर आणि पदाधिकारी प्रदीप भोईर यांची नावे समोर आली आहेत. या वादातून दोन्ही गटांमध्ये धक्काबुक्की आणि मारामारी झाल्याचा आरोप आहे.
दोन्ही गटांतील 70 ते 80 जणांविरोधात गुन्हा
या घटनेप्रकरणी कल्याण तालुका पोलिसांनी दोन्ही गटांतील सुमारे 70 ते 80 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये उपेक्षा भोईर, शक्तिवान भोईर, सुरेश भोईर आणि प्रदीप भोईर यांचाही समावेश असल्याची माहिती आहे.
हे ही वाचा>> गणपती मूर्तीच्या पायाशी अश्लील Video चा QR स्कॅनर, भयंकर कृत्याने मोठी खळबळ
विविध आरोपांखाली गुन्ह्याची नोंद
पोलिसांनी नोंदवलेल्या गुन्ह्यात सार्वजनिक सुव्यवस्थेला बाधा आणणे, दंगल घडवणे, शिवीगाळ, धक्काबुक्की आणि मारहाण यांसह विविध आरोपांचा समावेश आहे. तसेच, ध्वनीक्षेपकासाठी आवश्यक परवानगी न घेता मिरवणूक काढणे आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या मनाई आदेशाचे उल्लंघन केल्याचाही उल्लेख गुन्ह्यात करण्यात आल्याची माहिती आहे.
