सट्टेबाजांशी डीलचा प्लान, 1 कोटींची ऑफर, अमृता फडणवीसांनी सांगितलं सगळं प्रकरण

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Amruta Fadnavis latest News: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना पैसा उकळण्याचा प्लान सांगत पेशाने डिझायनर असलेल्या महिलेने 1 कोटींची ऑफर दिल्याचा प्रकार समोर आला. नेमकं काय घडलं? डिझायनर महिला कशी भेटली? तिने काय मागण्या केल्या, याबद्दल अमृता फडणवीसांनी सगळी माहिती दिलीये. (1 crore bribe offer to Amruta Fadnavis, Daughter of top bookie posed as designer)

अमृता फडणवीस यांनी या प्रकरणाची सर्व माहिती पोलिसांना दिलेली आहे. ज्या तरुणीने अमृता फडणवीसांसोबत हा प्रकार केला तिचं नाव अनिक्षा असं आहे. अमृता फडणवीसांनी फिर्यादीत म्हटलेलं आहे की, “अनिक्षाने असं सांगितलं की, ती कपडे, ज्वेलरी आणि फूटवेअर्स डिझायनर आहे. तिने डिझाईन केलेल्या वस्तू सार्वजनिक कार्यक्रमात मी परिधान कराव्यात, जेणेकरून वस्तूंचं प्रमोशन होईल. मला तिच्याबद्दल सहानुभूती वाटली आणि मी तिला होकार दिला.”

ती डिझायनर अमृता फडणवीस यांना कशी भेटली?

अमृता फडणवीसांनी पुढे म्हटलंय की, “ही डिझायनर मला नोव्हेंबर 2021 रोजी भेटली होती. आई नसल्याचं तिने सांगितलं. त्याचबरोबर सर्व कुटुंबाची भार आपल्यावरच असल्याचंही तिने मला सांगितलं. पहिल्या भेटीनंतर अनिक्षा मला उपमुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या सागर बंगल्यावर भेटायला आली होती.”

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

“एकदा ती आली आणि तिने काही डिझाईन केलेले कपडे आणि ज्वेलरी आमच्या स्टाफमधील एका व्यक्तीकडे दिल्या आणि ते मी परिधान करावेत अशी विनंती केली. ते कपडे मी कधी आणि कुठल्या कार्यक्रमात परिधान केले की नाही, हे मला आठवत नाही. त्या वस्तू माझ्या स्टाफमार्फत मी तिला परत केल्या किंवा दान केल्या असाव्यात. तिच्या वस्तू माझ्याकडे नाहीत”, अशी माहिती फडणवीसांनी पोलिसांना दिली.

सागर बंगल्यावर येऊन अमृता फडणवीसांना भेट दिला नेकलेस

“अनिक्षाने एकदा सागर बंगल्यावर मला नोव्हेंबर-डिसेंबर 2022 या कालावधीत नेकलेस भेट दिला. तो नेकलेसही मी कधी कुठल्या कार्यक्रमात घातला नाही. अनिक्षाला वाईट वाटू नये म्हणून आपण तिला एक दोन कार्यक्रमात परिधान केल्याचं सांगितलं आणि तीन आठवड्यात परत केला.”

ADVERTISEMENT

“एका भेटीवेळी अनिक्षाने सांगितलं की, तिच्या वडिलांचे विविध राजकीय नेत्यांसोबत जवळचे संबंध आहेत. नंतर तिने आमच्या स्टाफकडे एक लिफाफा दिला आणि तो मला द्यायला सांगितला. जेव्हा मी तो लिफाफा उघडला, तेव्हा त्यात हस्तलिखित नोट होती, पण मला त्या मजकूराचा आशय कळला नाही, मी तो पेपर बाजूला ठेवून दिला.”

ADVERTISEMENT

“27 जानेवारी 2023 रोजी पुण्यातील एका कार्यक्रमाला मी प्रमुख पाहुणी म्हणून उपस्थित होते. तिथे अनिक्षाला बघून मला धक्काच बसला, कारण ती मुंबई राहते. जेव्हा मी तिला याबद्दल विचारलं, तेव्हा ती म्हणाली की माझ्याच एका कर्मचाऱ्याने तिला कार्यक्रमाचा पास दिला”, असं अमृता फडणवीसांनी तक्रारीत म्हटलं आहे.

गाडीत बसली आणि ऑफर दिली, पुण्याहून परतत असताना काय घडलं?

“मुंबईला परत येत असताना मध्येच बॉडीगार्डने गाडी थांबवली, तेव्हा तिथे अनिक्षा असल्याचं मी बघितलं. ती खोटं बोलत असल्याचं माहिती असतानाही मी तिला माझ्या गाडीत बसू दिलं कारण मला घाबरवायचं नव्हतं. अनिक्षाने अशी ऑफर दिली की आपण सट्टेबाजांकडून पैसे कमवू शकतो. एकतर पोलिसांकडून केल्या जाणाऱ्या कायदेशीर कारवाईची माहिती त्यांना देऊन वा त्यांच्याविरुद्ध कोणतीही कायदेशीर कारवाई होऊ नये म्हणून आपण पैसे मिळवू शकतो,” असंही अमृता फडणवीसांनी म्हटलं आहे.

पुढे अमृता फडणवीसांनी असंही म्हटलं आहे की, “अनिक्षाची ऑफर ऐकून मी गाडी थांबवायला सांगितली आणि अनिक्षाला खाली उतरायला सांगितलं. ती दुसऱ्या गाडीत बसली आणि ते आमचा पाठलाग करत होते. त्यानंतर तिने केलेल्या कॉल्सकडे मी दुर्लक्ष केलं. 16 फेब्रुवारी रोजी रात्री साडेनऊ वाजता अनिक्षाने आपल्याला कॉल केला आणि एका गुन्ह्यात तिच्या वडिलांचं नाव असल्याचं सांगितलं. त्यातून त्यांना सोडवण्यासाठी तिने आपल्याला 1 कोटी रुपये देण्याची ऑफर दिली. ही ऑफर ऐकून मी लगेच फोन कट केला आणि तिचा नंबर ब्लॉक केला”, असं अमृता फडणवीस यांनी म्हटलेलं आहे.

“18 फेब्रुवारी रोजी रात्री 11.55 वाजता आणि मध्यरात्री 12 वाजून 15 मिनिटांनी (19 फेब्रुवारी) मला 22 व्हिडीओ क्लिप्स, तीन ऑडिओ मेसेज आणि इतर मेसेज अज्ञात नंबरवरून व्हॉट्सअपवर पाठवण्यात आले. माझ्या स्टाफमधील कर्मचाऱ्यालाही त्याच नंबरवरून हे मेसेज आले. त्यानंतर त्याच नंबरवरून 19 फेब्रुवारी रोजी रात्री 10 वाजता 40 मेसेज, व्हिडीओ, ऑडिओ मेसेज आणि स्क्रीन शॉट आले. हा मोबाईल क्रमाकं अनिक्षाचा असल्याचं मला कळलं”, असं अमृता फडणवीसांनी तक्रारीत म्हटलं आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT