
पालघर जिल्ह्यातील सातपाटी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सामूहिक बलात्कार झाल्याच्या घटनेनं खळबळ उडालीये. एका 16 वर्षीय मुलीवर 8 जणांनी रात्रभर सामूहिक अत्याचार केल्याच क्रूर आणि संतापजनक घटना घडलीये. या प्रकरणात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. मित्राने घात केल्याचं कारण यात समोर आलंय.
16 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर 8 जणांनी सामूहिक अत्याचार केल्याच्या घटनेनं पालघर जिल्हा हादरला. 8 तरूणांनी अल्पवयीन युवतीवर सामूहिक अत्याचार केल्याच्या प्रकरणात मित्रानेच विश्वासघात केल्याची बाब समोर आलीये.
16 डिसेंबर रोजी रात्री माहीम भागातच राहणाऱ्या पीडित युवतीला तिच्या मित्राने बोलवलं होतं. मित्राने सांगितलेल्या ठिकाणी पीडित युवती गेली. माहीम परिसरात असलेल्या टेंभी येथील बंद असलेल्या बंगल्यावर गेल्यानंतर तिथे युवतीवर तिच्या मित्रासह 8 जणांनी आळीपाळीने बलात्कार केला.
आरोपींनी बंगल्यावर अत्याचार केल्यानंतर पीडित मुलीला माहीम बीचजवळील निर्जन ठिकाणी घेऊन गेले. त्यानंतर तिथेही आरोपींनी आळीपाळीने अल्पवयीन मुलीवर अत्याचार केले. 16 डिसेंबरच्या रात्री 8 वाजेपासून ते दुसऱ्या दिवशी सकाळी 10 वाजेपर्यंत 8 जणांकडून मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला.
सामूहिक अत्याचारानंतर अल्पवयीन मुलीने माहीम पोलीस चौकीत जाऊन तक्रार दाखल केली. त्यानंतर सातपाटी सागरी पोलीस ठाण्यात सामूहिक बलात्कार प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी पोक्सो कायद्यासह आयपीसी 376 (ड) (सामूहिक बलात्कार), 366 (अ) (अल्पवयीन मुलीची खरेदी करणे), कलम 341, कलम 342, 323 आदी कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणातील 8 आरोपींना पोलिसांनी अटक केली.
राज्य महिला आयोगाकडून या प्रकरणाची गंभीर दखल घेण्यात आलीये. 'राज्य महिला आयोगाने यामध्ये सुमोटो दाखल करत संबंधित आरोपींवर कडक कारवाई करावी, अशी सूचना पालघर पोलिसांना दिलेली आहे.मी स्वतः यामध्ये पालघर पोलीस अधीक्षक यांच्याशी फोनवरून संपर्क साधून याची सविस्तर माहिती घेतलेली आहे.'
'यामध्ये संबंधित जे कोणी आरोपी आहेत त्यांना अटक करण्यात आलेली आहे आणि या आरोपींवर पोक्सो अंतर्गत ४-६-८-१२ या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. यामध्ये आरोपींना शिक्षा होईल आणि निश्चितपणाने त्यांच्यावर कडक कारवाई देखील होईल,' अशी माहिती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिली.