अहिल्यानगर हादरले, ग्रामपंचायत कार्यलयात महिलेची हत्या, 10 वर्षांच्या प्रेमाचा क्रूर अंत
Ahilyanagar Crime News : अहिल्यानगरमधील वडारवाडी येथे प्रेमसंबंधातून महिला सफाई कर्मचाऱ्याची हत्या झाल्याची घटना घडली. या प्रकरणातील संशयित संतोष धोत्रे याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
अहिल्यानगर हादरले, ग्रामपंचायत कार्यलयात महिलेची हत्या,
10 वर्षांच्या प्रेमाचा क्रूर अंत, नेमकं काय घडलं?
Ahilyanagar Crime News, रोहित वाळके : अहिल्यानगर जिल्ह्यातील भिंगारजवळील वडारवाडी येथे प्रेमसंबंधातून एका महिला कर्मचाऱ्याची हत्या झाल्याची घटना समोर आली आहे. दहा वर्षांपासून प्रेमसंबंध असलेल्या संतोष धोत्रे याने दुसऱ्या व्यक्तीशी जवळीक असल्याच्या संशयातून अनिता आळकुटे यांच्यावर हल्ला केल्याची प्राथमिक माहिती आहे. या हल्ल्यात अनिता यांचा मृत्यू झाला असून, संशयित आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मंगळवारी (27 ऑक्टोबर) सकाळी साडेसातच्या सुमारास वडारवाडी ग्रामपंचायत कार्यालयात ही घटना घडली.
अन्य व्यक्तीशी प्रेमसंबंध असल्याचा संशयातून हत्या
मृत अनिता देविदास आळकुटे (वय 42) या वडारवाडी ग्रामपंचायत कार्यालयात सफाई कर्मचारी म्हणून काम करत होत्या. संतोष धोत्रे (वय 49) आणि अनिता यांच्यात गेल्या दहा वर्षांपासून प्रेमसंबंध असल्याची प्राथमिक माहिती आहे. मात्र, अनिता यांचे अन्य व्यक्तीशी प्रेमसंबंध असल्याचा संशय संतोष याला आल्याने दोघांमध्ये वाद निर्माण झाला होता. याच संशयातून संतोष याने अनिता यांच्यावर हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. प्रेमसंबंधातून निर्माण झालेल्या वादाचा शेवट हत्येत झाल्याने परिसरात या घटनेची चर्चा सुरू झाली आहे.
अनिता आळकुटे यांच्यावर चाकू आणि लोखंडी रॉडने हल्ला
संतोष धोत्रे याने अनिता आळकुटे यांच्यावर चाकू आणि लोखंडी रॉडने हल्ला केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या अनिता यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच भिंगार कॅम्प पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप टिपरसे यांनीही घटनास्थळाची पाहणी केली. त्यानंतर अनिता यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला. ग्रामपंचायत कार्यालयात सकाळच्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली.
या प्रकरणी अनिता आळकुटे यांचा मुलगा योगेश आळकुटे याची फिर्याद नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे. दरम्यान, संशयित संतोष धोत्रे याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अनिता यांच्याशी असलेल्या दहा वर्षांच्या प्रेमसंबंधातून हा वाद निर्माण झाला होता का आणि त्यातूनच हत्येची घटना घडली का, याचा तपास पोलीस करत आहेत. दुसऱ्या व्यक्तीशी जवळीक असल्याच्या संशयातून हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली असली, तरी हत्येमागील नेमके कारण आणि घटनेचा संपूर्ण घटनाक्रम तपासातून स्पष्ट होणार आहे. भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
