'घर सोडून जा किंवा मरून जा', लिव्ह-इन पार्टनरचे टोमणे; कुटुंबियांकडून छळ..अखेरीस

Ahmedabad Crime News : अहमदाबादमध्ये प्रियकर आणि त्याच्या कुटुंबीयांकडून होणाऱ्या छळाला कंटाळून 24 वर्षीय दक्षा परमारने आत्महत्या केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी चौघांना अटक करण्यात आली आहे.

ADVERTISEMENT

Ahmedabad Crime News
Ahmedabad Crime News
Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

'घर सोडून जा किंवा मरून जा',

point

लिव्ह-इन पार्टनरचे टोमणे; कुटुंबियांकडून छळ..अखेरीस

Ahmedabad Crime News : अहमदाबादमध्ये लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या 24 वर्षीय तरुणीने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. प्रियकर आणि त्याच्या कुटुंबीयांकडून वारंवार होणारा मानसिक छळ, शिवीगाळ आणि लग्न करण्यास टाळाटाळ केल्यामुळे तिने हे टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप आहे. अक्षरशः 'घर सोडून जा किंवा मरून जा' अशा शब्दांत तिला टोमणे मारले जात होते, असा आरोप मृत तरुणीच्या आईने केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी तरुणीचा प्रियकर, त्याचे आई-वडील आणि भावाला अटक केली आहे. दक्षा परमार असे मृत तरुणीचे नाव असून ती अहमदाबादमधील बापूनगर परिसरात राहत होती. मे 2021 मध्ये तिची इन्स्टाग्रामच्या माध्यमातून मयूर परमार याच्याशी ओळख झाली होती. त्यानंतर जानेवारी 2023 मध्ये दोघांनी लग्न न करता लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहण्याचा निर्णय घेतला. यासाठी ते मोरबी येथे राहायला गेले. दक्षा ही आई नंदाबेन राठोड यांच्या पाच मुलींपैकी दुसऱ्या क्रमांकाची मुलगी होती. मुलीने लग्न न करता एकत्र राहण्याचा निर्णय घेतल्यामुळे आई आणि तिच्यात मतभेद झाले होते. त्यामुळे काही काळ आईने तिच्याशी संबंध तोडले होते.

हेही वाचा : 5 हजार 675 कोटी रुपयांचा प्रस्तावित प्रकल्प 56.75 कोटी रुपयांचा कसा झाला? विवेकानंद पाटीलचा सवाल

मयूर वेगवेगळी कारणे देत लग्न पुढे ढकलत होता

एप्रिल 2024 मध्ये दक्षाने एका मुलाला जन्म दिला. त्यानंतर सुमारे सहा महिन्यांनी तिने आईला फोन करून मुलगा झाल्याची माहिती दिली. मुलाचे नाव आनंद ठेवल्याचेही तिने सांगितले. त्यावेळी दक्षा आणि मयूर अहमदाबादला परतले होते. बापूनगर परिसरात ते मयूरच्या कुटुंबीयांसोबत राहत होते. त्यानंतर दक्षाचे आईशी पुन्हा बोलणे सुरू झाले. ती मयूर आणि मुलासोबत आईच्या घरीही जाऊ लागली. मात्र, मुलीने मयूरसोबत लग्न करावे, अशी नंदाबेन यांची इच्छा होती. त्यांनी अनेकदा दोघांना लग्न करण्यास सांगितले. मात्र, मयूर वेगवेगळी कारणे देत लग्न पुढे ढकलत होता. दरम्यान, दोघांमध्ये आणि मयूरच्या कुटुंबीयांसोबत दक्षाचे वारंवार वाद होत असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. मार्च 2025 मध्ये पहाटे साडेपाचच्या सुमारास दक्षा मुलाला घेऊन आईच्या घरी आली होती. मयूर, त्याची आई मंजू, वडील प्रवीण आणि भाऊ विशाल यांनी शिवीगाळ करून घराबाहेर काढल्याचा आरोप तिने केला होता. काही दिवसांनी मयूरचे आई-वडील तिला पुन्हा घरी घेऊन जाण्यासाठी आले. त्यावेळी नंदाबेन यांनी लग्नाचा विषय काढला. मात्र, भविष्यात सामूहिक विवाह सोहळ्यात लग्न लावून देऊ, असे त्यांनी सांगितल्याचा आरोप आहे.

हेही वाचा ; भाच्यासोबत कथित अनैतिक संबंधांच्या संशयातून आत्याची हत्या; दोन सख्ख्या बहिणींसह चौघांना अटक

घर सोडून जाण्यास किंवा मरण्यास सांगितल्याचा आरोप 

त्यानंतरही दक्षाचा छळ थांबला नाही. मयूरने मारहाण केल्याचे सांगत तिने एकदा आईला फोन केला होता. मला या घरातून घेऊन जा, अशी विनंती तिने केली होती. त्यानंतर आईने तिला आपल्या घरी आणले. मात्र, काही वेळाने मयूर तिला परत घेण्यासाठी आला. मुलीचे नाते तुटू नये, या अपेक्षेने नंदाबेन यांनी तिला पुन्हा मयूरसोबत पाठवले. मयूर, त्याचे आई-वडील आणि भाऊ आपल्याला वारंवार टोमणे मारतात, असेही दक्षाने आईला सांगितले होते. मयूरला तू आवडत नाहीस, त्यामुळे घर सोडून जा किंवा मरून जा, असे ते म्हणत असल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. 15 नोव्हेंबर रोजी सकाळी दक्षाने मयूरच्या फोनवरून आईला संपर्क साधला होता. मयूर आणि त्याच्या कुटुंबीयांसोबत भांडण झाल्याचे तिने सांगितले. त्यावेळी मयूरने तिला आपण आवडत नसल्याचे सांगत घर सोडून जाण्यास किंवा मरण्यास सांगितल्याचा आरोप आहे. यावर नंदाबेन यांनी दुसऱ्या दिवशी घरी येऊन सर्वांशी बोलण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, त्याच दिवशी रात्री नऊच्या सुमारास मयूरने नंदाबेन यांना फोन केला.

दक्षाची बहीण खुशबू हिने फोन उचलला असता मयूरने दक्षाने आत्महत्या केल्याची माहिती दिली. त्यानंतर खुशबू आणि तिच्या बहिणी तातडीने दक्षाच्या घरी पोहोचल्या. तेथे दक्षाने ओढणीच्या साहाय्याने छताच्या पंख्याला गळफास घेतल्याचे त्यांना दिसले. घटनेच्या वेळी दक्षाची नणंदही घरात उपस्थित होती, अशी माहिती अहमदाबादचे एसीपी आर. डी. ओझा यांनी दिली. या प्रकरणी पोलिसांनी मयूर परमार, त्याची आई मंजू, वडील प्रवीण आणि धाकटा भाऊ विशाल यांना अटक केली आहे. मयूर आणि दक्षा मुलासह मयूरच्या कुटुंबीयांसोबत राहत होते. दक्षा वारंवार लग्न करण्याची मागणी करत होती, मात्र मयूर त्यासाठी टाळाटाळ करत होता. त्यातून त्यांच्यात वाद होत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. आरोपींविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम १०८ आणि ५४ अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. दक्षाच्या मृत्यूनंतर तिच्या अडीच वर्षांच्या मुलाचा ताबा सध्या त्याची आजी नंदाबेन राठोड यांच्याकडे देण्यात आला आहे.