भाच्यासोबत कथित अनैतिक संबंधांच्या संशयातून आत्याची हत्या; दोन सख्ख्या बहिणींसह चौघांना अटक
Crime News : गुजरातच्या जेतपूरमध्ये भाच्यासोबत कथित संबंध असल्याच्या वादातून हकूबेन परमार यांची हत्या केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी दोन सख्ख्या बहिणींसह चौघांना अटक करण्यात आली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
भाच्यासोबत कथित अनैतिक संबंधांच्या संशयातून आत्याची हत्या
दोन सख्ख्या बहिणींसह चौघांना अटक
Crime News : गुजरातमधील राजकोट जिल्ह्यातील जेतपूर येथे कौटुंबिक वादातून एका महिलेची हत्या करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. हकूबेन परमार असे मृत महिलेचे नाव असून, भाच्यासोबत कथित अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून ही हत्या करण्यात आल्याचा आरोप आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन सख्ख्या बहिणी, त्यापैकी एका बहिणीचा पती आणि अन्य एका व्यक्तीला अटक केली आहे. आधी सोड्यामध्ये विषारी औषध मिसळून महिलेला पाजण्यात आले आणि त्यानंतर तिच्याच ओढणीने गळा आवळून तिची हत्या करण्यात आल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
हेही वाचा : 5 हजार 675 कोटी रुपयांचा प्रस्तावित प्रकल्प 56.75 कोटी रुपयांचा कसा झाला? विवेकानंद पाटीलचा सवाल
रवीसोबत कथित संबंध असल्याची माहिती
राजकोट जिल्ह्यातील जेतपूर तालुक्यातील नवागढ रेल्वे स्टेशन रोडजवळ 11 नोव्हेंबर रोजी एका महिलेचा मृतदेह आढळला होता. रेल्वे स्टेशनजवळील निर्जन ठिकाणी मृतदेह सापडल्याने परिसरात खळबळ उडाली होती. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. फॉरेन्सिक शवविच्छेदन अहवालातून महिलेची हत्या झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. मृत महिलेची ओळख हकूबेन परमार अशी पटली. पोलिसांनी घटनास्थळ आणि परिसरातील जवळपास 90 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले. या फुटेजच्या आधारे पोलिसांना संशयितांपर्यंत पोहोचण्यात यश आले. तपासात हकूबेन यांचे त्यांचा सख्खा भाऊ धमाभाई यांच्या मुलासोबत म्हणजेच रवीसोबत कथित संबंध असल्याची माहिती समोर आली. या संबंधांना कुटुंबातील अनेक सदस्यांचा विरोध होता. रवीच्या राधा आणि मधू या बहिणींनी हकूबेन यांना रवीपासून दूर राहण्यास सांगितले होते. मात्र, त्यांनी ऐकले नसल्याचा आरोप आहे. यावरून कुटुंबात वारंवार वाद होत होते.
हेही वाचा : Personal Finance: सरकारी कंत्राटदारांना निधी देऊन कमाई करता येते? पण 'हे' गणित समजून घ्या!
विषारी औषध दिल्यानंतरही हकूबेन यांचा मृत्यू झाला नाही, म्हणून...
पोलिसांच्या तपासानुसार, याच वादातून राधा आणि मधू यांनी इतर आरोपींच्या मदतीने हकूबेन यांच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप आहे. काही दिवसांपूर्वी हकूबेन यांचे राधा, मधू, मधुचा पती लक्ष्मण उर्फ लखा आणि त्यांच्यासोबत राहणारा भूपत वाघेला यांच्याशी वाद झाले होते. त्यानंतर आरोपींनी हकूबेन यांना जुनागढ येथून रिक्षात बसवून जेतपूरला बोलावल्याचे तपासात समोर आले. जेतपूर येथे आल्यानंतर राधा आणि मधु यांनी त्यांना सोड्यामध्ये विषारी औषध मिसळून पाजल्याचा आरोप आहे. मात्र, विषारी औषध दिल्यानंतरही हकूबेन यांचा मृत्यू झाला नाही. त्यामुळे आरोपींनी काही तास वाट पाहिली. त्यानंतर दोन्ही बहिणींनी हकूबेन यांच्याच ओढणीने त्यांचा गळा आवळल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे. त्यानंतर त्यांचा मृतदेह नवागढ रेल्वे स्टेशन रोडजवळील निर्जन ठिकाणी टाकण्यात आला होता.
या प्रकरणी जेतपूर पोलिसांनी राधाबेन सैयद शेख, मधुबेन लक्ष्मण उर्फ लखा बावाजी, मधुबेन यांचे पती लक्ष्मण उर्फ लखा पीरुनाथ बावाजी आणि भूपतभाई पोपटभाई वाघेला या चौघांना अटक केली आहे. मृत महिलेचे भाऊ अरविंदभाई वाघेला यांनी जेतपूर शहर पोलीस ठाण्यात या चौघांविरोधात तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी भारतीय न्याय संहिता 2023 मधील कलम 103(1), 61(2) आणि 3(5) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये हत्या, गुन्हेगारी कट आणि सामूहिक हेतूशी संबंधित कलमांचा समावेश आहे. पोलिसांनी आरोपींना अटक केल्यानंतर त्यांची पोलीस कोठडी मिळवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. हकूबेन या मूळच्या भावनगर जिल्ह्यातील पालीताना येथील हथियाधार गावच्या रहिवासी होत्या. त्यांच्या कुटुंबात एक मुलगा आणि दोन मुली आहेत. त्यांचे कुटुंब भटकंती करून उदरनिर्वाह करत असल्याची माहिती आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
