बीड : 'पप्पा, मम्मीला मारु नका..' अंगणवाडी सेविकेला पेट्रोल ओतून जिवंत जाळले

मुंबई तक

बीडमधून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. नवऱ्याने चारित्र्याच्या संशयावरुन बायकोला जिवंत जाळले. मुलांसमोरच त्याने हे भयानक कृत्य केले. 'पप्पा, मम्मीला मारु नका' अशी विनवणी ती मुलं बापाला करत होती.

ADVERTISEMENT

Beed Crime
Beed Crime
Google CTA

बातम्या हायलाइट

point

बीड : पप्पा, मम्मीला मारु नका..

point

अंगणवाडी सेविकेला पेट्रोल ओतून जिवंत जाळले

Beed Crime, रोहिदास हातागळे : बीड जिल्ह्यातील पिंपळनेर येथे एक अत्यंत खळबळजनक आणि मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. चारित्र्याच्या संशयावरून पतीने आपल्याच पत्नीच्या अंगावर पेट्रोल ओतून तिला पेटवून दिल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. अनुष्का शिरसाट असे मृत महिलेचे नाव असून, पती मिलिंद शिरसाट याने हे क्रूर कृत्य केले आहे. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण पिंपळनेर परिसरात तीव्र संताप आणि हळहळ व्यक्त केली जात आहे.

पत्नीच्या कमाईवर डोळा

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी मिलिंद शिरसाट हा नेहमीच अनुष्का यांना त्रास देत असे. अनुष्का या अंगणवाडी कार्यकर्त्या म्हणून कार्यरत होत्या आणि त्यांच्या कष्टाच्या कमाईवर पतीची नजर होती. इतकेच नाही तर अनुष्का यांना मिळणारा अंगणवाडीचा पगारही त्याने जबरदस्तीने स्वतःच्या बँक खात्यावर जमा करण्यास सुरुवात केली होती. या  सततच्या त्रासातून मंगळवारी (11 ऑगस्ट) कौटुंबिक वादाचा भडका उडाला आणि क्रूर पतीने हे टोकाचे पाऊल उचलले.

हे ही वाचा : माजी खासदाराचे तुरुंगात नको ते धंदे, मोबाईलमध्ये सापडले 90 अश्लील Videos

'पप्पा, मम्मीला मारु नका'

ही संपूर्ण घटना त्यांच्या लहान मुलांच्या डोळ्यांदेखत घडली. "पप्पा, मम्मीला मारू नका," अशी गयावया करत मुले रडून विनवणी करत होती, मात्र निर्दयी पतीने मुलांच्या आक्रोशाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आणि पत्नीच्या अंगावर पेट्रोल ओतून तिला पेटवून दिले. या घटनेत अनुष्का या गंभीररीत्या भाजल्या. त्यांना तातडीने छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.

हे ही वाचा : आधी डोक्यात कुकर घातला, नंतर पाण्यात बुडवून मारले; नवऱ्याने शिक्षिकेला का संपवलं?

'त्याला जन्मठेपेची शिक्षा द्या'

रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत असताना अनुष्का यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात, "साहेब, त्याला जन्मठेपेची शिक्षा द्या," अशी आर्त मागणी केली. दुर्दैवाने, मंगळवारी रात्री उपचारादरम्यान अनुष्का यांची प्राणज्योत मालवली. याप्रकरणी पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपी पती मिलिंद शिरसाट याला ताब्यात घेतले आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील सखोल तपास करत आहेत.