इन्स्टाग्रामवरील फ्रेंड रिक्वेस्ट ठरली जीवघेणी, कट रचून तरुणाला संपवलं; नदीत सापडला मृतदेह
बेळगावीमधील एका तरुणाने मारहाणीचा बदला घेण्यासाठी हत्येचा एक भयंकर कट रचला. आरोपीने एका तरुणीच्या माध्यमातून तरुणाला प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्याची निर्घृण हत्या केली.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
इन्स्टाग्रामवरील फ्रेंड रिक्वेस्ट ठरली जीवघेणी
कट रचून तरुणाला संपवलं
नदीत सापडला मृतदेह
Crime News : बेळगावी येथील एका तरुणाच्या हत्या प्रकरणाचा पोलीस तपासात धक्कादायक उलगडा झाला आहे. जुन्या वैमनस्याचा बदला घेण्यासाठी मुख्य आरोपीने एका तरुणीच्या माध्यमातून तरुणाला प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्याची निर्घृण हत्या केली. मिळालेल्या माहितीनुसार, मृत सर्वेश कांगराळकर (रा. मारुती नगर, बेळगावी) याचे वर्षभरापूर्वी जमीन आणि शेड बांधण्याच्या कारणावरून शशी जळगरकर याच्याशी कडाक्याचे भांडण झाले होते. त्यावेळी सर्वेशने शशीवर चाकूने हल्ला करून त्याला गंभीर जखमी केले होते. उपचारांनंतर शशी बरा झाला, मात्र त्याच्या मनात या हल्ल्याचा बदला घेण्याची भावना कायम होती.
तरुणीची घेतली मदत
आपला बदला पूर्ण करण्यासाठी शशीने त्याचा मित्र दशरथ राजपूत याच्या मैत्रिणीची मदत घेतली. त्या तरुणीने इन्स्टाग्रामवर सर्वेशला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून त्याच्याशी संवाद साधण्यास सुरुवात केली. हळूहळू दोघांमध्ये फोन नंबरची देवाणघेवाण झाली आणि भेटीगाठी सुरू झाल्या. सर्वेश पूर्णपणे तिच्या प्रेमात पडल्याची खात्री पटल्यानंतर आरोपींनी पुढील कट रचला. 20 सप्टेंबर रोजी संबंधित तरुणीने सर्वेशला गणेश मूर्तींचे दर्शन घेण्यासाठी आणि फिरायला जाण्याच्या बहाण्याने खानपूरच्या दिशेने नेले.
हे ही वाचा : प्रियकराने हात पकडले तर पत्नीने पाय.., पतीला गळा आवळून संपवलं, नेमकं काय घडलं?
'अशी' केली हत्या
खानपूरच्या रस्त्यावर सर्वेश आणि ती तरुणी जात असतानाच शशी आणि त्याचे साथीदार त्यांचा पाठलाग करत होते. वाटेत आरोपींनी सर्वेशला अडवून त्याचे अपहरण केले आणि धारदार शस्त्रांनी वार करून त्याची निर्घृण हत्या केली. त्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने त्याचा मृतदेह खानपूर येथील मलप्रभा नदीत फेकून दिला. सर्वेश घरी न परतल्याने त्याच्या वडिलांनी पोलीस ठाण्यात तो हरवल्याची तक्रार नोंदवली होती. तपासादरम्यान पोलिसांना नदीत एक अनोळखी मृतदेह आढळून आला, ज्याची ओळख सर्वेश म्हणून पटली.
हे ही वाचा : कुटुंबियांना खोटं सांगून प्रियकरासोबत राहू लागली, शेवटी सापडला मृतदेह; नेमकं काय घडलं?
तिघांना अटक, तरुणी फरार
पोलीस तपासात कॉल डिटेल्स रेकॉर्ड्स (CDR) च्या आधारे संशयितांचा माग काढण्यात आला. याप्रकरणी पोलिसांनी शशी जळगरकर (33), राहुल जळगरकर (30), दशरथ राजपूत (23) आणि अरुण हुलोली (22) या चौघांना अटक केली आहे. सर्वेशला जाळ्यात ओढणारी तरुणी सध्या फरार असून पोलीस तिचा शोध घेत आहेत. या प्रकरणी पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा अधिक तपास पोलीस करत आहेत.
