'हॅलो, मी बोलतेय, बागेत या..' तो आला आणि फसला! काय घडलं?
आरोपीने बायकोच्या आवाजात फोनवरुन तरुणाला बागेत बोलावून घेतले. तरुणाला काय माहिती होतं की पुढं त्याच्यासोबत काय घडणार आहे?
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
'हॅलो, मी बोलतेय, बागेत या..'
तो आला आणि फसला!
काय घडलं?
Crime News : दोन दिवसांपूर्वी झाडाला लटकलेल्या अवस्थेत रंगीला यादव नावाच्या तरुणाचा मृतदेह आढळला होता. सुरुवातीला ही आत्महत्या असल्याचे सर्वांना वाटले होते. मात्र ही आत्महत्या नसून, एका नियोजित कटाचा भाग असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. प्रेमप्रकरण आणि जुन्या वादातून या तरुणाची हत्या करण्यात आली होती. बिहारच्या बगहा परिसरातील ही घटना आहे. पोलिसांनी अवघ्या 48 तासांत या गुन्ह्याचा छडा लावला. याप्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असून, इतर फरार आरोपींच्या शोधासाठी ठिकठिकाणी छापे टाकले जात आहेत.
मृताच्या वडिलांनी दिली तक्रार
पोलीस अधीक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार, 27 मे रोजी बथवरिया पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका तरुणाचा मृतदेह आढळून आला होता. मृतदेहाची ओळख रंगीला यादव म्हणून पटली होती. यानंतर मृत तरुणाच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करून तपास सुरू करण्यात आला होता. तपासादरम्यान पोलिसांनी तांत्रिक पुरावे आणि गुप्त माहितीच्या आधारे राजन यादव नावाच्या संशयिताला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली देत अनेक धक्कादायक खुलासे केले.
हे ही वाचा : 16 वर्षीय शाळकरी मुलीचं अपहरण, चॉकलेट खाल्ल्यानंतर बेशुद्ध; 5 जणांनी मिळून...
बायकोसोबत फोनवर बोलायचा
आरोपी राजन यादवने पोलिसांना सांगितले की, मृत रंगीला यादव हा त्याच्या पत्नीसोबत लग्नापूर्वीपासून फोनवर बोलत होता. या कारणावरून मृत तरुण आणि आरोपी यांच्यात यापूर्वी अनेकदा वाद व हाणामारीही झाली होती. याशिवाय, या प्रकरणातील दुसरा सह-आरोपी सुधीर याचाही मृत रंगीला यादवसोबत पैशांच्या देवाणघेवाणीवरून वाद सुरू होता. याच जुन्या वैमनस्यातून आणि रागातून दोन्ही आरोपींनी मिळून रंगीला यादवला आपल्या रस्त्यातून कायमचे हटवण्याचा कट रचला. यासाठी त्यांनी आधी रंगीलाचा विश्वास संपादन केला आणि नंतर त्याला आपल्या जाळ्यात ओढले.
हे ही वाचा : नागपूर : मॅट्रिमोनी ॲप, शारीरिक शोषण अन् 15 लाख; 31 वर्षीय महिला कशी अडकली?
बायकोचा आवाज काढला आणि...
ठरलेल्या योजनेनुसार, आरोपींनी रंगीला यादवला गोरखपूरची जत्रा फिरण्याच्या बहाण्याने बोलावून घेतले. त्यानंतर राजन यादवने आपल्या पत्नीच्या आवाजात मृत तरुणाला रात्रीच्या वेळी एका बागेत भेटायला बोलावले. तिथे आधीच दबा धरून बसलेल्या आरोपींनी रंगीला यादवची गळा आवळून हत्या केली. हत्येनंतर हा प्रकार आत्महत्येचा वाटावा म्हणून आरोपींनी त्याचा मृतदेह आंब्याच्या झाडाला लटकवून दिला, जेणेकरून कोणालाही संशय येणार नाही. मात्र, पोलिसांनी हा सगळा कट उधळून लावला. अटक केलेल्या आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली असून, इतर फरार आरोपींनाही लवकरच अटक करण्यात येईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.









