गाण्याच्या आवाजावरून रक्तरंजित थरार! मुंबईत बाप-लेकाची निर्घृण हत्या

मुंबई तक

मोठ्या आवाजात गाणे वाजवण्यावरून झालेल्या कौटुंबिक वादातून मुंबईत एक धक्कादायक प्रकार घडला. आरोपींनी एका कुटुंबावर धारदार चाकूने हल्ला केला. यामध्ये वडील आणि मुलाचा मृत्यू झाला.

ADVERTISEMENT

Mumbai Crime
Mumbai Crime
Google CTA

बातम्या हायलाइट

point

गाण्याच्या आवाजावरून रक्तरंजित थरार!

point

मुंबईत बाप-लेकाची निर्घृण हत्या

Mumbai Crime : मोठ्या आवाजात गाणे वाजवण्यावरून झालेल्या कौटुंबिक वादातून मुंबईतील विक्रोळी (पश्चिम) येथे एक भयानक प्रकार घडला. राहुल नगर भागात गुरुवारी, 6 ऑगस्ट रोजी पहाटे एक अत्यंत थरारक आणि हृदयद्रावक घटना घडली. पार्कसाईट पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या या परिसरात म्युझिकच्या कारणावरून पेटलेल्या वादाचे रूपांतर रक्तरंजित संघर्षात झाले. या हिंसक घटनेत एकाच कुटुंबातील दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून इतर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.

धाकदार सुऱ्याने हल्ला

घटनेच्या वेळी राहुल नगरमधील नागरिक गाढ झोपेत असताना अचानक घरातून मोठ्या प्रमाणावर किंचाळण्याचे आणि भांडणाचे आवाज येऊ लागले. घरात सुरु असलेल्या मोठ्या आवाजातील गाण्यांना विरोध केल्याने सुरुवातीला किरकोळ शिवीगाळ आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण झाली. मात्र, रागाच्या भरात आरोपीने अचानक धारदार सुरा काढून कुटुंबातील सदस्यांवर प्राणघातक हल्ला चढवला. या हल्ल्यात 40 वर्षीय सुनील विश्वकर्मा आणि त्यांचा 14 वर्षांचा मुलगा श्लोक विश्वकर्मा हे गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने राजावाडी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी दोघांनाही मृत घोषित केले.

हे ही वाचा : नागपूर : 16 वर्षीय मुलीला ओलीस ठेवून बलात्कार, 19 वर्षीय नराधमाला अटक; लॉकअपमध्ये पिझ्झाची मागणी

क्षणात होत्याचं नव्हतं झालं

या प्राणघातक हल्ल्यात सुनील यांच्या पत्नी अंजू विश्वकर्मा आणि लहान मुलगा विवान विश्वकर्मा हे देखील गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर सध्या राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू असून दोघांचीही प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. क्षणभरात घडलेल्या या रक्ताळलेल्या घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब पूर्णपणे उद्ध्वस्त झाले असून संपूर्ण परिसरात प्रचंड हळहळ व्यक्त केली जात आहे.

हे ही वाचा : Maharashtra Weather : पुढील काही तास धोक्याचे, 'या' जिल्ह्यांचं काही खरं नाही, IMD चा अलर्ट

आरोपी कोण?

घटनेची माहिती मिळताच पार्कसाईट पोलीस आणि फॉरेन्सिक टीमने घटनास्थळी धाव घेऊन परिसर सील केला आहे. या प्रकरणावर जलद कारवाई करत पोलिसांनी सुरेंद्र विश्वकर्मा आणि सूरज विश्वकर्मा या दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे. कौटुंबिक वाद आणि गाण्यांच्या विरोधातून हा प्रकार घडल्याचे प्राथमिक तपासात समोर आले असून, गुन्ह्यात वापरलेला सुरा जप्त करण्याचे आणि घटनेची सखोल चौकशी करण्याचे काम पोलीस करत आहेत. या भयंकर घटनेनंतर राहुल नगर परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.