तीन मित्रांच्या मर्डर केसमध्ये 158 वर्षे कारावासाची शिक्षा, नेमकं प्रकरण काय?

तीन मित्रांची हत्या केल्याप्रकरणी न्यायालयाने आरोपींना 158 वर्षे आणि 9 महिने कारावासाची शिक्षा सुनावली आहे. हे तिघे मित्र पर्यटनासाठी मेक्सिको देशात गेले असता त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती.

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

पर्यटनाला गेलेल्या तिघांची हत्या

point

न्यायालयाने सुनावली 158 वर्षे कारावासाची शिक्षा

point

जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

Crime News : दोन भाऊ आणि त्यांच्या एका मित्राची निर्घृण हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी न्यायालयाने ऐतिहासिक निकाल दिला आहे. या प्रकरणातील तीन आरोपींना न्यायालयाने 158 वर्षे आणि 9 महिने कारावासाची कठोर शिक्षा सुनावली आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे तब्बल दोन वर्षांनंतर पीडित कुटुंबांना न्याय मिळाला असून, या भीषण गुन्ह्यात हत्या, दरोडा आणि वाहन चोरीचे गुन्हे सिद्ध झाले आहेत. मे 2024 मध्ये मेक्सिको देशात ही घटना घडली होती. या घटनेने संपूर्ण आंतरराष्ट्रीय पर्यटन क्षेत्रात मोठी खळबळ उडवून दिली होती. मृतांमध्ये दोन ऑस्ट्रेलियन भाऊ आणि त्यांच्या एका अमेरिकन मित्राचा समावेश होता.

'त्या'दिवशी नेमकं काय घडलं होतं?

कॅलम रॉबिन्सन, जेक रॉबिन्सन हे ऑस्ट्रेलियन भाऊ आणि त्यांचा अमेरिकन मित्र कार्टर हे तिघे जण एप्रिल 2024 च्या अखेरीस मेक्सिकोमध्ये सर्फिंगचा आनंद घेण्यासाठी गेले होते. त्यांनी एनसेनाडापासून सुमारे 80 किलोमीटर दूर असलेल्या पुंटा सैन जोस समुद्रकिनाऱ्यावर आपला तळ ठोकला होता. 27 एप्रिलच्या रात्री तिघेही तिथे असताना, काही दरोडेखोरांनी त्यांच्या पिकअप गाडीचे टायर चोरी करण्याचा प्रयत्न केला. पर्यटकांनी या चोरीला कडाडून विरोध केल्यामुळे संतापलेल्या हल्लेखोरांनी त्यांच्यावर बेछूट गोळीबार केला.

हे ही वाचा : अल्पवयीन मुलीसोबत अश्लील चाळे, शेवटी रेल्वे रुळावर सापडला मृतदेह; तरुणाची कोणी केली हत्या?

मृतदेह लपवले, पोलिसांची दमछाक

या निर्दयी हल्ल्यात तिन्ही तरुणांचा जागीच मृत्यू झाला, त्यानंतर हल्लेखोरांनी त्यांचे मृतदेह एका 15 मीटरहून अधिक खोल विहिरीत फेकून दिले. अनेक दिवसांच्या शोधमोहिमेनंतर 3 मे रोजी तिघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. मेक्सिकोच्या तपास यंत्रणांनी या प्रकरणी तत्परता दाखवत मुख्य आरोपी जिसेस गेरार्डो गार्सिया याच्यासह इतरांना बेड्या ठोकल्या. तपासादरम्यान एका आरोपी महिलेकडे मृताचा मोबाईल फोन सापडल्याने या गुन्ह्याचा छडा लावणे पोलिसांना शक्य झाले.

हे ही वाचा : सिंधुदुर्ग : बसमधून उतरली पण घरी पोहोचलीच नाही, नदीत सापडला मृतदेह, नंदिनीसोबत काय घडलं?

पर्यटकांच्या संख्येत घट

या खटल्याचा निकाल लागल्यानंतर बाजा कॅलिफोर्निया सर्फर्स असोसिएशनने निर्णयाचे स्वागत केले असले, तरी या भयानक घटनेमुळे या भागात येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत मोठी घट झाल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, सरकारी वकिलांनी दिलेल्या माहितीनुसार, चोरट्यांच्या क्षुल्लक लोभापोटी आणि प्रतिरोधातून घडलेल्या या हत्याकांडाने जगभरातील पर्यटकांच्या सुरक्षेचा मोठा प्रश्न ऐरणीवर आणला होता, ज्याला आता न्यायालयाच्या कठोर निकालानंतर कायदेशीर पूर्णविराम मिळाला आहे.