नागपूर : भाडे न देता भाडेकरु गायब झाला, रुम उघडताच सर्वांची झोप उडाली

Nagpur Crime News : नागपुरातील खारबी परिसरातील भाड्याच्या खोलीतून 85 लाख रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या. भाडे मागितल्यावर घरमालकाला चाकू दाखवून धमकी दिल्याचा आरोप असलेला भाडेकरू बेपत्ता असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

ADVERTISEMENT

Nagpur Crime News
Nagpur Crime News
Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

नागपूर : भाडे न देता भाडेकरु गायब झाला

point

रुम उघडताच सर्वांची झोप उडाली

Nagpur Crime News : नागपूरमध्ये भाड्याच्या खोलीतून सुमारे 85 लाख रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. खारबी परिसरात ही घटना उघडकीस आली. पुष्पक कृष्णा भंडारकर ऊर्फ बेंडाने याने रमेश नावाच्या व्यक्तीचे घर सुमारे दीड वर्षापूर्वी भाड्याने घेतले होते. मात्र, गेल्या अनेक महिन्यांपासून त्याने घराचे भाडे देणे बंद केले होते. त्याच्या भाडेकराराची मुदत याच वर्षी जानेवारीमध्ये संपली होती. तरीही त्याने भाडेकराराचे नूतनीकरण केले नाही किंवा खोली रिकामी केली नाही. त्यामुळे घरमालक रमेश यांनी त्याला खोली रिकामी करण्यास सांगितले होते. मात्र, त्यावरून दोघांमध्ये वाद झाल्याची माहिती समोर आली आहे.

हेही वाचा : भीमाशंकर वृक्षतोडीवर देवेंद्र फडणवीस रोखठोक, टोरंट प्रकल्पाचं समर्थन करत काय म्हणाले?

सुरुवातीली तक्रारीच्या आधारे पोलिसांनी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद 

रमेश यांनी भाडे मागितल्यानंतर पुष्पकने त्यांना चाकू दाखवून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे. यानंतर रमेश यांनी स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली होती. दरम्यान, काही काळानंतर पुष्पकने खोलीत येणे बंद केले. तो बराच काळ बेपत्ता असल्याने घरमालकाला संशय आला. त्यानंतर रमेश यांनी खोलीचे कुलूप तोडले. खोलीमध्ये गेल्यानंतर त्यांना बादलीमध्ये नोटांची बंडले, जमिनीवर विखुरलेले कागद आणि एक प्रिंटर आढळून आला. हा प्रकार पाहून त्यांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली.

हेही वाचा : कोल्हापूर : चुलत्याच्या घरातून सोनं चोरलं, Thar गाडी घेतली; अन् पुजेलाही त्यालाच बोलावलं!

बनावट नोटा आणि त्या छापण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य ताब्यात

माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी खोलीची तपासणी करून बनावट नोटा आणि त्या छापण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य ताब्यात घेतले. या कारवाईत 500 रुपयांच्या एकूण 37 लाख रुपयांच्या पूर्ण छापलेल्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या. याशिवाय, सुमारे 48 लाख रुपयांच्या अर्धवट छापलेल्या नोटाही पोलिसांना मिळाल्या. या नोटांच्या एका बाजूला छपाई करण्यात आली होती, तर दुसरी बाजू कोरी होती. अशा प्रकारे पोलिसांनी एकूण सुमारे 85 लाख रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या. जप्त केलेल्या नोटांची मोजणी आणि एकूण रकमेचा अंदाज घेण्यासाठी नोटा मोजण्याचे यंत्रही मागवण्यात आले होते.

या प्रकरणातील आरोपी पुष्पक कृष्णा भंडारकर ऊर्फ बेंडाने याचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. प्राथमिक माहितीनुसार, तो मुंबईत असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. त्याला अटक करण्यासाठी पोलीस पथक पाठवण्याची तयारी सुरू आहे. भाड्याच्या खोलीत बनावट नोटा छापण्याचे काम सुरू होते का, तसेच या प्रकरणात अन्य कोणाचा सहभाग आहे का, याबाबत पुढील तपासातून माहिती समोर येण्याची शक्यता आहे. सध्या पोलिसांनी खोलीतून मिळालेल्या नोटा आणि छपाईसाठी वापरण्यात येणारे साहित्य ताब्यात घेतले असून, आरोपीचा शोध घेण्यावर भर दिला आहे.