इंदापूर : जमिनीसाठी पोटच्या पोरांनी आई बापाला मारलं, विभक्त राहणाऱ्या लेकरांकडून हल्ला! VIDEO
Pune Crime News : इंदापूरमध्ये जमिनीच्या वादातून दोन मुलांनी वृद्ध आई-वडिलांना लाकडी दांडक्याने मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. वडिलांनी दोन्ही मुलांविरोधात तक्रार दाखल केली असून, मारहाणीसह जीवे मारण्याची धमकी दिल्याचं तक्रारीत म्हटलं आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
जमिनीसाठी पोटच्या पोरांनी आई बापाला मारलं
विभक्त राहणाऱ्या लेकरांकडून हल्ला! VIDEO
Pune Crime News : पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जमिनीच्या वादातून दोन मुलांनी आपल्या वृद्ध आई-वडिलांना मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी 65 वर्षीय तुकाराम राऊत यांनी आपल्या दोन्ही मुलांविरोधात तक्रार दाखल केली आहे. संजय तुकाराम राऊत आणि राजेंद्र तुकाराम राऊत अशी ज्यांच्याविरोधात तक्रार करण्यात आलीये, त्या दोन्ही मुलांची नावं आहेत. हे दोन्ही मुलं आपल्या कुटुंबासह आई-वडिलांपासून विभक्त राहतात. तुकाराम राऊत यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, 30 ऑगस्ट 2026 रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास तरंगवाडी गावाच्या हद्दीत सलीम लॉन्सजवळील डांबरी रस्त्यावर ही घटना घडली.
हेही वाचा : बाळासाहेबांचं निधन, ठाकरेंचं 'पक्षप्रमुख' पद.. शिंदेंचे वकील 'या' युक्तिवादाने गेम फिरवणार?
तुकाराम राऊत आणि त्यांच्या पत्नीला दांडक्याने मारहाण
तुकाराम राऊत यांच्या म्हणण्यानुसार, ते आणि त्यांची आजारी पत्नी अंजना तुकाराम राऊत दोघेही रस्त्यावरून फिरत होते. त्याचवेळी त्यांची दोन्ही मुलं संजय आणि राजेंद्र हे टाटा कंपनीच्या नेक्सॉन चारचाकी वाहनातून तिथे आले. दोन्ही मुलांनी आई अंजना यांच्या नावावर असलेली जमीन का विकली, असा सवाल केला. त्यानंतर दोघांनी हातातील लाकडी दांडक्याने तुकाराम राऊत आणि त्यांच्या पत्नीला मारहाण केल्याचं तक्रारीत म्हटलं आहे. या मारहाणीत तुकाराम राऊत यांच्या पाठीवर, तोंडावर, दोन्ही पायांच्या मांडीवर आणि डाव्या खांद्यावर दुखापत झाली. तर त्यांच्या पत्नी अंजना यांच्या उजव्या हाताच्या मनगटाजवळ आणि कमरेला मारहाण करण्यात आल्याचं तक्रारीत नमूद करण्यात आलं आहे.
