बाळासाहेबांचं निधन, ठाकरेंचं 'पक्षप्रमुख' पद.. शिंदेंचे वकील 'या' युक्तिवादाने गेम फिरवणार?

मुंबई तक

शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सुप्रीम कोर्टात शिंदे गटाचे वकील नीरज किशन कौल यांनी एक अत्यंत महत्त्वाचा युक्तिवाद केला. जाणून घ्या त्याविषयी सविस्तरपणे.

ADVERTISEMENT

shiv sena supreme court hearing eknath shinde lawyer neeraj kishan kaul paksha pramukh internal democracy thackeray shinde
प्रातिनिधिक फोटो
Google CTA

नवी दिल्ली: शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हावरील अधिकाराच्या वादाची सुप्रीम कोर्टातील सुनावणी आता निर्णायक टप्प्यावर पोहोचली आहे. शिंदे गटाच्या वतीने युक्तिवाद करताना ज्येष्ठ वकील नीरज किशन कौल यांनी ठाकरे गटाच्या ‘पक्षप्रमुख’ पदासह पक्षातील अंतर्गत लोकशाही आणि निवडणूक आयोगाच्या अधिकारांवर महत्त्वाचे मुद्दे मांडले. ‘पक्षप्रमुख’ ही संकल्पनाच या वादानंतर अस्तित्वात आली, असा दावा करत ठाकरे गटाकडून करण्यात आलेला युक्तिवाद चुकीचा असल्याचे कौल यांनी म्हटले.

‘पक्षप्रमुख’ पदावरून कौलांचा ठाकरे गटाला घेराव

कौल यांनी ठाकरे गटाच्या ‘पक्षप्रमुख’ पदासंदर्भातील युक्तिवादावर थेट आक्षेप घेतला. ‘पक्षप्रमुख’ हे पद केवळ 2018 च्या पक्षघटनेअंतर्गत अस्तित्वात आले आणि या पदाशी संबंधित अधिकारांची सर्वांनाच माहिती होती, असा युक्तिवाद करण्यात आल्याचे सांगत कौल यांनी तो वस्तुस्थितीला धरून नसल्याचे स्पष्ट केले.

हे ही वाचा>> Shiv Sena सुनावणी: ठाकरेंवर शिंदेंचा पहिला घाव.. सुप्रीम कोर्टात आज शिंदे गटाची ‘बॅटिंग’; प्रत्येक अपडेट LIVE

सर्व राजकीय पक्षांनी त्यांच्या पक्षघटना निवडणूक आयोगाकडे सादर कराव्यात, असे निर्देश आयोगाने दिल्यानंतर शिवसेनेची 1999 ची पक्षघटना निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आली होती, असा युक्तिवाद कौल यांनी केला. मात्र, बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर पक्षाच्या घटनात्मक आणि संघटनात्मक रचनेत मूलभूत स्वरूपाचे बदल करण्यात आले, असा दावा त्यांनी केला.

‘शिवसेनाप्रमुख’ पद 2013 मध्ये गोठवले

कौल यांच्या युक्तिवादातील महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ‘शिवसेनाप्रमुख’ आणि ‘पक्षप्रमुख’ या पदांमधील फरक. त्यांच्या म्हणण्यानुसार, बाळासाहेब ठाकरे यांच्या सन्मानार्थ आणि आदरापोटी 2013 मध्ये ‘शिवसेनाप्रमुख’ हे पद गोठवण्यात आले होते. बाळासाहेब ठाकरे हे शिवसेनेचे संस्थापक असून त्यांनी पक्षाची उभारणी केली होती. त्यानंतर ‘पक्षप्रमुख’ हे पद अस्तित्वात आणण्यात आले.