जवान सुट्टीवर आला अन् सोन्यासारख्या बायकोला संपवले, नेमकं कारण काय?
पंजाबमधील होशियारपूर येथे रजेवर असलेल्या एका लष्करी जवानावर त्याच्या पत्नीच्या हत्येचा आरोप ठेवण्यात आला आहे. कुटुंबाची दिशाभूल करण्यासाठी, त्याने पत्नी छतावरून पडल्याचे सांगितले होते, परंतु रुग्णालयात तिच्या शरीरावर जखमा आढळल्यानंतर या प्रकरणात संशय निर्माण झाला.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
जवान सुट्टीवर आला अन् सोन्यासारख्या बायकोला संपवले
नेमकं कारण काय?
Crime News : एका महिलेच्या संशयास्पद मृत्यूची घटना समोर आली आहे. सुट्टीवर आलेल्या एका लष्करी जवानावर त्याची पत्नी रमा हिची निर्घृण हत्या केल्याचा आरोप आहे. घटनेला अपघाताचे स्वरूप देण्यासाठी आरोपीने पत्नी छतावरून पडल्याचा बनाव रचल्याचा दावा पीडितेच्या नातेवाईकांनी केला आहे. कुटुंबाला माहिती दिल्यानंतर रमाला रुग्णालयात नेण्यात आले, तिथे तिच्या शरीरावर मारहाणीच्या गंभीर खुणा दिसल्याने नातेवाईकांचा संशय बळावला आणि त्यांनी तत्काळ पोलिसांत धाव घेतली. पंजाबमधील होशियारपूर जिल्ह्याच्या मुकेरियां भागातील ही घटना आहे.
सुट्टीवर आला अन् केली हत्या
मृत महिलेच्या आईने दिलेल्या माहितीनुसार, रमाचा विवाह लष्करी जवान अमरजीत सिंह याच्याशी झाला होता आणि या दांपत्याला एक आठ वर्षांचा मुलगा व एक लहान मुलगी आहे. लग्नानंतर अमरजीत पत्नीला वारंवार मारहाण करत असे. नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार, 13 तारखेच्या रात्री तो सुट्टी काढून घरी आला आणि त्याने रमाला बेदम मारहाण केली, ज्यात तिचा मृत्यू झाला. त्यानंतर पहाटे 4 वाजता रमा छतावरून पडल्याची खोटी माहिती नातेवाईकांना देण्यात आली, परंतु रुग्णालयात डॉक्टरांनी तिला मृत घोषित केल्यावर आणि तिच्या शरीरावरील जखमा पाहून कुटुंबाने हत्येचा आरोप केला.
हे ही वाचा : शाळेतील मुलींनी मांडल्या व्यथा, थेट झाडाझडती; दीपके कुणावर संतापले?
आरोपी ताब्यात, काका-काकू फरार
या गंभीर प्रकरणाची दखल घेत पोलिसांनी तपास सुरू केला आहे. पोलीस ठाण्याच्या प्रमुखांनी सांगितले की, पीडित कुटुंबाच्या जबाबाच्या आधारे पती अमरजीत सिंह, त्याचे काका कुलदीप कुकी आणि काकू सोनिया यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुख्य आरोपी असलेल्या लष्करी जवानाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्याचे काका आणि काकू अद्याप फरार आहेत व पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहेत. या गुन्ह्यात इतर आरोपींची नेमकी काय भूमिका होती आणि मृत्यू कोणत्या परिस्थितीत झाला, याचाही सविस्तर तपास पोलीस करत आहेत.
हे ही वाचा : जरांगे पाटलांवर प्रश्न येताच पंकजा मुंडेंचं सॉफ्ट उत्तर, नेमकं काय म्हणाल्या?
सततचा घरगुती वाद
पोलिसांनी संध्याकाळी उशिरा मृतदेहाचे शवविच्छेदन करून तो नातेवाईकांच्या ताब्यात दिला असून, रमावर तिच्या गावी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. तिच्या मृत्यूमुळे दोन लहान मुले पोरकी झाली असून कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सततचा घरगुती वाद आणि मारहाणीमुळेच तिचा बळी गेल्याचा कुटुंबाचा आरोप आहे. सध्या पोलीस आरोपी पतीची सखोल चौकशी करत असून शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा केली जात आहे. या अहवालातून आणि पुढील तपासातून मिळालेल्या पुराव्यांच्या आधारे मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल व त्यानुसार पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल, असे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
