ब्युटी पार्लरचं ओपनिंग 6 दिवसांवर येऊन ठेपलं.., अनेक वर्षांचं स्वप्न पूर्ण होणार असतानाच शिल्पाचा मृतदेह सापडला
UP Crime News : एका महिलेचा संशयास्पद मृत्यू झाला असून पतीने दारूच्या नशेत तिची हत्या केल्याचा आरोप माहेरच्यांनी केला आहे. ब्यूटी पार्लरच्या उद्घाटनापूर्वीच शिल्पाचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
ब्युटी पार्लरचं ओपनिंग 6 दिवसांवर येऊन ठेपलं..,
अनेक वर्षांचं स्वप्न पूर्ण होणार असतानाच शिल्पाचा मृतदेह सापडला
UP Crime News : उत्तर प्रदेशातील वाराणसी जिल्ह्यातील जयप्रकाश नगर कॉलनीमध्ये घडलेल्या एका घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. एका महिलेचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला असून, शिल्पा सिंह असं या महिलेचं नाव आहे. शिल्पा ही मूळची गाझीपूर जिल्ह्यातील नंदगंज भागातील रहिवासी होती. तिचा विवाह 2019 मध्ये वाराणसी महानगरपालिकेत कंत्राटी पद्धतीने कार्यरत असलेल्या प्रिन्स सिंह याच्याशी झाला होता. लग्नानंतर हे दाम्पत्य आपल्या दोन मुलांसह जयप्रकाश नगर कॉलनीमध्ये राहत होते, मात्र गेल्या काही काळापासून त्यांच्या संसारामध्ये वादाची ठिणगी पडली होती, ज्याचा शेवट आता मृत्यूने झाला आहे.
पतीची दारूची सवय आणि चाकूने हल्ल्याचा जुना इतिहास
शिल्पाच्या माहेरच्यांनी पती प्रिन्सवर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या मते, प्रिन्स हा दारूच्या आहारी गेला होता आणि नशेच्या धुंदीत तो वारंवार शिल्पाला मारहाण करत असे. हा वाद इतका विकोपाला गेला होता की अनेकदा हे प्रकरण पोलीस ठाण्यापर्यंत आणि न्यायालयापर्यंतही पोहोचले होते. धक्कादायक बाब म्हणजे, प्रिन्सने यापूर्वीही शिल्पावर चाकूने प्राणघातक हल्ला केला होता. पतीकडून सातत्याने होणाऱ्या या शारीरिक आणि मानसिक त्रासामुळे शिल्पा कमालीची त्रस्त होती. प्रत्येक वेळी मुलांच्या भविष्याचा विचार करून आणि संसार वाचवण्याच्या आशेने ती तडजोड करून सासरी परतत असे, परंतु प्रिन्सच्या वागण्यात कोणताही बदल झाला नाही. वारंवार मिळणाऱ्या धमक्यांमुळे ती काही काळासाठी आपल्या वडिलांकडे मुंबईला निघून गेली होती आणि पुन्हा सासरी येण्यास तयार नव्हती.
नवीन सुरुवातीचे आश्वासन ठरले खोटे; पार्लरच्या उद्घाटनापूर्वीच शेवट
शिल्पा सासरी परतत नसल्याचे पाहून प्रिन्स आणि त्याच्या कुटुंबीयांनी तिला परत आणण्यासाठी गयावया केली होती. आपण दारू सोडून देऊ, माहेरून पैसे मागणार नाही आणि तुला स्वतःचे ब्यूटी पार्लर उघडून देऊ, असे आश्वासन त्यांनी दिले होते. या नवीन सुरुवातीच्या आशेवर विश्वास ठेवून शिल्पा केवळ 20 दिवसांपूर्वीच मुंबईहून परतली होती. तिच्या ब्यूटी पार्लरचे उद्घाटन 30 एप्रिल रोजी होणार होते, ज्यासाठी तिने तयारीही केली होती. मात्र, नव्या आयुष्याचे स्वप्न पूर्ण होण्यापूर्वीच शिल्पाचा मृतदेह राहत्या घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. पतीने दिलेली आश्वासने केवळ तिला परत बोलावण्यासाठी रचलेला एक बनाव होता का, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.









