26 वर्षीय प्रेयसी, लग्नाचे आश्वासन अन् प्रियकराची रुम...विशाखासोबत काय घडलं?
त्याने तिला लग्नाचं आश्वासन दिलं. मात्र त्याने दुसऱ्याच तरुणीशी विवाह केला. यावरुन दोघांमध्ये वाद झाला. ती त्याच्या घरी गेली आणि तिथंच होत्याचं नव्हतं झालं. आग्र्यातील 26 वर्षीय विशाखासोबत काय घडलं?
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
26 वर्षीय प्रेयसी, लग्नाचे आश्वासन अन् प्रियकराची रुम
विशाखासोबत काय घडलं?
Crime News : एक 26 वर्षीय विद्यार्थिनी विशाखा ओझा 29 सप्टेंबर रोजी अचानक बेपत्ता झाली होती. सुपर टीईटी (Super TET) परीक्षेची तयारी करणाऱ्या विशाखाचा कुटुंबाशी संपर्क तुटल्यानंतर नातेवाईकांनी तिचा शोध घेण्यास सुरुवात केली, मात्र ती सापडली नाही. यानंतर कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यात तिची तक्रार नोंदवली. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत तिच्या मोबाईलची कॉल डिटेल्स (CDR) खंगालली असता तहसील कार्यालयात कार्यरत असलेला लेखपाल शिवजीत याचे नाव समोर आले. पोलिसांनी शिवजीतला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली असता या घटनेमागील थरारक सत्य समोर आले. आग्रा येथील ही घटना आहे.
प्रेमसंबंध, लग्नाचे आश्वासन आणि विश्वासघात
पोलीस चौकशीत शिवजीतने विशाखासोबत त्याचे प्रेमसंबंध असल्याचे मान्य केले. त्याने तिच्यासोबत लग्न करण्याचे आश्वासन दिले होते, मात्र चालू वर्षातील मे महिन्यात त्याने दुसऱ्याच मुलीशी विवाह केला. ही बाब समजताच विशाखा आणि शिवजीत यांच्यात वारंवार वाद होऊ लागले. आरोपीच्या दाव्यानुसार, 30 सप्टेंबर रोजी विशाखा त्याच्या खोलीवर आली होती आणि लग्नाच्या मुद्द्यावरून दोघांमध्ये जोरदार भांडण झाले. या वादानंतर विशाखा हिने सिलिंग फॅनला गळफास घेऊन आत्महत्या केली. तरुणीच्या मृत्यूनंतर प्रचंड घाबरलेल्या शिवजीतने हे कृत्य लपवण्यासाठी मृतदेह एका पोत्यात बंद केला, तो स्वतःच्या कारमध्ये ठेवला आणि यमुना नदीत फेकून दिला.
हे ही वाचा : 'या युगाचे पहिले नायक 100 % नाना..', राज ठाकरेंची भावनिक पोस्ट
यमुना नदीत सापडला मृतदेह
दरम्यान, मंगळवारी (6 ऑक्टोबर) सायंकाळी 4 च्या सुमारास एका गावाजवळ स्थानिकांना यमुना नदीच्या किनाऱ्यावर एक संशयास्पद पोते आढळून आले. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पोते उघडले असता त्यात एका तरुणीचा मृतदेह आढळला. यानंतर झालेल्या तपासात विशाखाची ओळख पटली. दुसरीकडे, विशाखाचे वडील विजय ओझा यांनी आरोपीचा आत्महत्येचा दावा फेटाळून लावत तिच्या हत्येचा गंभीर आरोप केला आहे. 2017 सालापासून दोन्ही कुटुंबांमध्ये असलेल्या जुन्या वैमनस्यातूनच तिच्यावर हा हल्ला करून तिची हत्या करण्यात आल्याचे तिच्या वडिलांचे म्हणणे आहे.
हे ही वाचा : वडिलांचा व्यवसाय बुडाला अन्… सुपरस्टार नाना पाटेकरांचा थक्क करणारा प्रवास, संघर्ष आणि यश!
पोलिसांनी काय सांगितले?
सध्या आग्रा पोलिसांनी आरोपी लेखपाल शिवजीत भदौरिया याला अटक केली असून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे. विशाखाचा मृत्यू नेमका कसा झाला, हा प्रकार खरोखरच आत्महत्या होती की नियोजित हत्या, मृतदेह खोलीतून कारपर्यंत आणि तेथून यमुनेपर्यंत कसा नेण्यात आला तसेच या संपूर्ण गुन्ह्यात आणखी कोणाचा सहभाग आहे का, या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे खरे कारण स्पष्ट होईल आणि त्यानुसार पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल.
