पत्नीच्या बॉयफ्रेण्डबद्दल कळलं, पती ऑस्ट्रेलियात, सापळा कारखान्याच्या खड्ड्यात
गुजरातच्या जामनगरमध्ये पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीची सायनाईड देऊन हत्या केली आणि मृतदेह कारखान्यात 12 फूट खोल पुरला. दोन वर्षांनंतर या धक्कादायक हत्येचा पर्दाफाश झाला असून पोलिसांनी आरोपी पत्नी आणि तिच्या प्रियकराला अटक केली आहे.
ADVERTISEMENT
Gujrat Crime : गुजरातच्या जामनगरमध्ये एक थरारक आणि धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. जिग्नेश मेवाडिया या तरुणाची त्याच्याच पत्नीने म्हणजेच पृथ्वीने आपल्या प्रियकराच्या मदतीने अत्यंत निर्घृणपणे हत्या केली. लग्न झाल्यानंतर काही दिवसांतच जिग्नेश ऑस्ट्रेलियाला गेल्याची खोटी माहिती पृथ्वीने त्याच्या नातेवाईकांना दिली होती. प्रत्यक्षात मात्र तिने प्रियकर निलेशच्या मदतीने जिग्नेशचा काटा काढला होता. सुमारे दोन वर्षांपर्यंत पृथ्वीने आपल्या पतीच्या हत्येचे गुपित अत्यंत चलाखीने लपवून ठेवले होते. मात्र, जिग्नेशच्या एका नातेवाईकाने ऑस्ट्रेलियातील पत्ता मागितल्यानंतर या संपूर्ण कटकारस्थानाचा उलगडा झाला आणि दोन वर्षांनंतर हे धक्कादायक वास्तव समोर आले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लग्नानंतर काही दिवसांतच जिग्नेशला पृथ्वी आणि निलेशच्या प्रेमसंबंधांबद्दल माहिती मिळाली होती. यामुळे त्यांच्यात सतत भांडणे होऊ लागली. रोजच्या वादाला कंटाळून आणि एकत्र राहण्याच्या इच्छेने पृथ्वी व निलेशने जिग्नेशला संपवण्याचा कट रचला. निलेशने जिग्नेशला आपल्या कारखान्यात बोलावून घेतले, तिथे त्याला भरपूर दारू पाजली आणि नशेमध्ये असलेल्या जिग्नेशच्या ग्लासमध्ये सायनाईड टाकले. विषबाधेमुळे जिग्नेशचा जागीच मृत्यू झाला. यानंतर निलेश आणि त्याच्या एका मित्राने मिळून कारखान्यात तब्बल 12 फूट खोल खड्डा खणून जिग्नेशचा मृतदेह तिथे पुरून टाकला आणि पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला.
