लाइव्ह

Maharashtra Lok Sabha Election 2024 Live : 'हा झाला रडीचा डाव', अजित दादांची रोहित पवारांवर टीका

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Lok Sabha Election Maharashtra Live Updates : लोकसभा निवडणुकीमुळे देशातील वातावरण ढवळून निघाले आहे. पहिल्या दोन टप्प्यातील मतदान पार पडल्यानंतर प्रचाराचे मुद्दे बदलल्याचे दिसत आहे. 

ADVERTISEMENT

लोकसभा निवडणुकीत धार्मिक धुव्रीकर करण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे. दुसरीकडे संविधान बदलाचा मुद्दाही जोरात चर्चेत आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, राहुल गांधी, मल्लिकार्जून खरगे, शरद पवार, उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्यासह सर्वच पक्षाचे नेते प्रचारात गुंतले आहेत. 

महाराष्ट्रात तिसऱ्या चौथ्या आणि पाचव्या टप्प्यात मतदान होणार असून, उमेदवार आणि नेते मतदारांनापर्यंत पोहोचण्यासाठी पायाला भिंगरी बांधून फिरताना दिसत आहेत. आरोप-प्रत्यारोप जोरात सुरू आहेत. त्याचबरोबर स्थानिक मुद्दे विरुद्ध राष्ट्रीय मुद्दे असे एक चित्र निवडणुकीत दिसत आहे. 

लोकसभा निवडणुकीसंदर्भातील दिवसभरातील सर्व घडामोडींची माहिती जाणून घेण्यासाठी वाचत रहा लाईव्ह अपडेट्स....

ADVERTISEMENT

  • 06:17 PM • 05 May 2024

    असली नौटंकी बारामतीकरांपुढे चालणार नाही- अजित पवार

    अजित पवारांच्या बारामतीतील भाषणातील महत्त्वाचे मुद्दे-

    • बारामतीत परिवार म्हणून एकमेकांना आधार दिला, सहकार्य केलं. आजची रात्र, उद्याचा दिवस आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. कुणाशीही भांडू नका, वाद घालू नका. फक्त विजयासाठी प्रयत्न करा.
    • बारामतीकरांचा उत्साह पाहून माझ्यासारख्या कार्यकर्त्याला समाधान मिळतोय. विकास कोण करणारे, हे पाहून मतदान करा. कायमच मी लोकांना मदत करत आलोय. बारामती, इंदापूर, भोर, मुळशी, वेल्हा या तालुक्यातील पाणीप्रश्न महत्त्वाचा आहे. 
    • बारामतीकरांच्या भविष्यासाठी ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे. आरोग्य, शिक्षणाचं हब म्हणून बारामतीत काम करण्याचा प्रयत्न केला. काही चूका असतील तर लक्षात आणून दुरुस्त करायच्या असतात. जात, पात करून राजकारण होत नाही. सगळ्या जातधर्मातील लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न करेन.
    • माझ्यासह हर्षवर्धन पाटील, राहुल कुल, दत्ता भरणे, रमेश थोरात हे रात्रीचा दिवस करून लोकांची कामं करण्याचा प्रयत्न करताहोत. आपण आता एकमेकांना विरोध करायचा नाही, असं आम्ही ठरवलंय. कारण त्यातून कोणतेही प्रश्न सुटणार नाहीयेत.
    • बारामतीतल्या 'आण्णा' नावाच्या नेत्याचं नाव सुरुवातीला न घेतल्याचं समर्थकांनी दादांच्या लक्षात आणून दिलं. त्यानंतर दादांनी त्यांचंही नाव घेत भाषणं कंटिन्यू केलं.
    • उत्तरेसह दक्षिणेत बारामतीची रेल्वे देशभरात जावी, ही आमची इच्छा आहे. मतदारसंघात रेल्वेचं जाळ उभारण्याचा प्रयत्न करू.
    • अजित पवार कोण आहे, हे बारामतीकरांना चांगलंच माहिती आहे. त्यामुळं मी बाकीच्या गोष्टींना मी फार महत्त्व देत नाही. लोकांच्या कामाला फार महत्त्व देत असतो. राज्यातल्या कामांना केंद्राची जोड यावी, यासाठी मी वाद बाजूला ठेवून एका व्यासपीठावर आलोय.
    • ते म्हणतात मी दम देतो, मी लोकांना दम दिला असता तर मला २५, ३० वर्ष बारामतीकरांनी निवडून तरी दिलं असतं का?, लोकांशी सहजपणे बोलणं म्हणजे दम देणं असतं का? आम्ही एकमेकांच्या विरोधात उभे राहत असू तरीसुद्धा विकासाच्या बाबतीत आमची भूमिका एकच आहे.
    • संस्था काढणं नाही तर संस्था चालवणं अत्यंत महत्त्वाचं असतं. मी नावं सांगत नाही पण राज्यातल्या अनेक लोकांना संस्था चालवता आल्या नाही. काही लोकांनी संस्था धुळीस मिळवल्या.
    • कुणीतरी चौकात सभा घेतं, मडकं फोडतो, कोण आहे काय आहे मला माहिती नाही. ही काय भावकीची निवडणूक नाहीये. 
    • आमच्या एका पठ्ठ्याने डोळ्यातून पाणी काढून दाखवलं, मी पण काढून दाखवतो, व्हिडिओ दाखवून दादांनी केली नक्कल
    • असली नौटंकी बारामतीकरांपुढे चालणार नाही. हा रडीचा डाव आहे. तुम्ही काम दाखवा, तुमचं खणखणीत नाणं दाखवा. मी तुम्हाला सांगत होतो असलं हे करणार, ह्याला साहेबांचा विरोध असूनही मी झेडपीचं तिकीट दिलं. हडपसरला तयारी करत होता, तिथं चेतन तुपे तयारी करत असल्याने आम्ही जामखेड सूचवलं. त्यानंतर जामखेडमध्ये मी पाठवलं, मी साहेबांचंही ऐकलं नाही. तुझ्यापेक्षा कितीतरी जास्त उन्हाळे-पावसाळे मी पाहिलेले आहे. भावनिक होऊन प्रश्न सुटत नाही.
    • काही लोकांनी आयुष्यात कुस्ती खेळली नाही, ते कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष झाले. अरे कुस्तीचे डाव माहितीय का बेटा. चितपट कसं करतात हे माहितीय का?, लगेच फार उड्या मारू नका. हे औटघटक्याचं आहे. हे जे पायाला भिंगरी बांधून फिरताहेत ना, तुम्ही निकालानंतर बघा, हे कुठे गायब होतात बघा. मी ठरवलेलं आहे मी माझं भाषण विकासकामांवर ठेवायचं. कुणावरही टीका करायची नाही. बारामतीतल्या जावयाला, लेकीला, सुनेला, नव्या तरुणांना काही वाटलं तर त्यांनी माझ्याकडे येवून सांगायला हवं ना. 
    • कुणीतरी सुनेत्रा अजित पवार असं केलंय, मला ते दादा म्हटलेलं आवडत नाही. काय तुम्ही टीका करता, महिला लोकसभेवर गेल्यानंतर त्यांचा नवरा काय पर्स घेवून जाणार का?, आपण जाताना सदानंद सुळे काय पर्स घेवून जातो काय? सुनेत्रा खासदार झाल्यावर मी काय पर्स घेऊन जाणारय का?, अरे मी बोलायला लागलो तर तुम्हाला पळता भुई थोडी होईल, मुंबईच गाठाल डायरेक्ट. आपण म्हणतो भाऊ, बंधू आपलेच आहेत, जाऊ द्या, जाऊ द्या.
    • काही लोकांनी खुर्च्या टाकल्या. गर्दी दिसावीत म्हणून. मी आजपर्यंत जेवढ्या सभा केल्या, एवढी गर्दी मी कुठेही पाहिलेली नाही. सहाहीच्या सहाही ठिकाणी आपण लीड घेणार. माळेगावात अद्यापही गडबड आहे, असं मला दिसतंय. भावनिक होवून, पैसे पाहून दिशाभूल करून घेवू नका.एकमेकांबद्दल आढी ठेवू नका. जमत नसेल तर जमवून घ्या. एकोप्याने राहण्याचा प्रयत्न करा. गाहाळपणे बसू नका.
  • 06:11 PM • 05 May 2024

    लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्याचा प्रचार संपला, आता मतदानाकडे लक्ष

    लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्याचा प्रचार आज संपला आहे. या टप्प्यात येत्या सात तारखेला मतदान होणार असून राज्यातील ११ मतदारसंघातील मतदार आपला हक्क बजावणार आहेत.

  • 05:58 PM • 05 May 2024

    'हा झाला रडीचा डाव', अजित दादांची रोहित पवारांवर टीका

    'मतदारांनी भावनिक होऊन मतदान करू नका. सुनेत्रा पवारांना निवडून द्या, कळकळीची विनंती. दम दिला असता तर लोकांनी मला निवडून दिलं असतं?', असा सवाल अजित पवारांनी केला. त्याचबरोबर रोहित पवारांवर टीका करत ते म्हणाले की, 'हा झाला रडीचा डाव, असली नौटंकी बारामतीकर सहन करणार नाही.'

  • 04:42 PM • 05 May 2024

    Baramati Lok Sabha : "होय, शरद पवार आत्मा, कारण...", अमोल कोल्हेंचं मोदींना उत्तर

    सुप्रिया सुळे यांच्या प्रचारार्थ बारामतीमध्ये शेवटची प्रचारसभा झाली. या सभेत अमोल कोल्हे यांनी पंतप्रधान मोदींच्या टीकेला उत्तर दिले. 

    "पंतप्रधान येऊन गेले. पंतप्रधानांनी शरद पवारांचा उल्लेख अस्वस्थ आत्मा म्हणून केला. भटकती आत्मा म्हणून उल्लेख केला. आज अभिमानाने पंतप्रधानांना नम्रपणे सांगू ईच्छितो की, होय, शरदचंद्र पवार महाराष्ट्राचा आत्मा आहे. होय, पवारसाहेब युवकांचा आत्मसन्मान आहेत. होय, पवार साहेब ज्या माताभगिनींना ३३ टक्के स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आरक्षण दिलं. ११ टक्के संरक्षण दलात आरक्षण दिलं. त्या प्रत्येक माताभगिनीचा आत्माभिमान आहेत. आणि कदाचित पंतप्रधानांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी... कारण असं आहे की, भगवत गीतेतील एक श्लोक ते पवारसाहेबांना आत्मा म्हणताना विसरून गेले." 

    अमोल कोल्हेंनी दिला भगवद्गीतेचा दाखला

    "भगवद्ग गीतेत लिहिलंय की, आत्मा तो आहे, ज्याला शस्त्राने भेदता येत नाही. ज्याला अग्नीने जाळता येत नाही. ज्याला पाण्याने विझवता येत नाही. भिजवता येत नाही. वाऱ्याने सुकवता येत नाही आणि हा आत्मा महाराष्ट्राचा आत्मा. त्याच्या आत्मसन्मानासाठी उद्या महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकरी, प्रत्येक कष्टकरी, प्रत्येक युवक आणि प्रत्येक महिला ही जिवाची बाजी लावल्याशिवाय राहणार नाही. कारण हा महाराष्ट्राचा आत्मा गेली ५५ वर्ष अव्याहतपणे, या महाराष्ट्राच्या, हिंदुस्थानच्या आत्मसन्मानासाठी झटतोय", असे अमोल कोल्हे म्हणाले.

  • ADVERTISEMENT

  • 04:24 PM • 05 May 2024

    'मोदी आता गल्ली-बोळात फरतायेत', उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

    'मोदींना मध्येच माझ्यावर प्रेम आलंय. 10 वर्ष कामं केली असती तर फोडाफोडी करण्याची वेळ आली नसती. माझ्यावर आई-वडील आणि तुळजाभवानीचं कवच आहे. चोरा मी वंदिले हेच भाजप म्हणतोय. मोदी सांगतायेत त्यांनी मला शस्त्रक्रियेचा सल्ला दिला. मोदी आता प्रत्येक गल्ली-बोळात फरतायेत. भाजपची दयनीय अवस्था झाली आहे.' असं म्हणत उद्धव ठाकरेंनी भाजपवर हल्लाबोल केला.
     

  • 04:09 PM • 05 May 2024

    Baramati Lok Sabha election : "अजित पवारांना मुख्यमंत्री करण्याचा प्रस्ताव ठेवला, पण शरद पवारांनी..."

    बारामती लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने पवार विरुद्ध पवार अशीच लढाई सुरू आहे. त्यातच आता विजय शिवतारेंनी मोठा दावा केला आहे. टीव्ही९ या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत शिवतारेंनी मोठा दावा केला आहे. 

    ते म्हणाले, "२००४ मध्ये विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने १२४ जागा लढवल्या, तर काँग्रेसने १५७ जागा लढवल्या होत्या. त्यावेळी राष्ट्रवादीचे सर्वाधिक ७१ आमदार निवडून आले होते, तर काँग्रेसचे ६९ आमदार विजय झाले होते."

    "ज्या पक्षाचे आमदार जास्त त्यांचा मुख्यमंत्री असा निर्णय दोन्ही पक्षात झाला होता. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधील पाच नेते दिल्लीत शरद पवार यांच्या भेटीसाठी गेले. त्यात मी (विजय शिवतारे), डॉक्टर महाजन, शिवाजीराव नलवाडे (मुंबई बँकेचे अध्यक्ष), रवींद्र पवार (मुंबई मनपा) मुबारक खान (अल्पसंख्याक प्रमुख) हे होते."

    "२००४ मध्ये मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होतो. शरद पवार यांची वेळ घेतली होती. त्या दिवशी रात्री ११ वाजताच्या विमानाने दिल्लीला गेलो. दिल्लीत जाऊन आम्ही पाच लोकांनी त्यांची भेट घेतली. सकाळी दिल्लीत पवार साहेबांच्या निवासस्थानी बैठक झाली. बैठकीत आम्ही सर्वांनी राष्ट्रवादीचे आमदार जास्त आहेत, आपण अजित पवार यांना मुख्यमंत्री करा, असे पवार साहेबांना सांगितले."

    "अजितदादा धाडसाने काम करणारे नेते आहेत. त्यांच्यामुळे पक्ष वाढणार आहे. परंतु शरद पवार यांनी हा प्रस्ताव फेटाळून लावला. त्यावेळी पवार साहेबांनी झटकून दिले. आपण दोन चार खाती जास्त घेऊ, पण मुख्यमंत्रीपद नको, असे त्यांनी म्हटले. त्यावेळी जर पवार साहेबांनी ऐकले असते तर आज जी परिस्थिती आहे, ती आली नसती", असे शिवतारे यांनी सांगितले. 

  • ADVERTISEMENT

  • 01:34 PM • 05 May 2024

    "एकवेळ मी मान कापून देईन, पण...", राजू शेट्टींनी उद्धव ठाकरेंना काय दिलं होतं उत्तर

    hatkanangale lok sabha election 2024 : हातकणंगले लोकसभा मतदारसंघाबद्दल राजू शेट्टी यांनी एका मुलाखतीत भाष्य केले. ही जागा ठाकरेंकडे कशी गेली याबद्दल ते बोलले आहेत. 

    "सांगलीची जागा त्यांना दिली गेली कारण कोल्हापूरची शिवसेनेची जागा होती, तिथे काँग्रेसने उमेदवार उभा केला. कारण शाहू महाराज शिवसेनेत जायला तयार नव्हते. मग असं असताना अचानक शिवसेनेकडून मला निरोप आला की, तुम्ही आमचं चिन्ह घ्यायला पाहिजे, मशाल. चिन्ह घेणं याचा अर्थ म्हणजे मला त्यांच्या पक्षात प्रवेश करावा लागला असता. मग त्यांच्या पक्षाची एकूण घटना लक्षात घेता, त्यांच्या पक्षाच्या जे कार्यक्रम आहेत, ते सोडून दुसऱ्या गोष्टी सदस्याला करता येत नाही. मग स्वाभिमानी शेतकरी संघटना मी काय बरखास्त करायची होती का?", असा सवाल त्यांनी केला.

    "शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडायचं होतं का? ते पण, मला खासदार व्हायचं म्हणून... मी एका क्षणाचाही विचार न करता सांगितलं की, एकवेळ मी मान कापून देईन, पण शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. एकटं सोडणार नाही", असे शेट्टी म्हणाले.

    सविस्तर वृत्त वाचण्यासाठी क्लिक करा

  • 01:23 PM • 05 May 2024

    Baramati Lok Sabha election : अजित पवारांनी मिशा काढायची तयारी ठेवावी -श्रीनिवास पवार

    निवडणूक झाल्यानंतर मीच इथे (बारामती) असेन, दुसरे कुठले पवार असणार नाहीत. जर कुणी दिसलं तर मी मिशा काढेन, असे विधान अजित पवार यांनी केले.

    त्यांनी केलेल्या या विधानाला त्यांचे बंधू श्रीनिवास पवार यांनी उत्तर दिले. एका मुलाखतीत बोलताना श्रीनिवास पवार म्हणाले की, त्यांनी मिशा काढण्याची तयारी ठेवावी. 

    "मी ऐकतो की, दादा (अजित पवार) शब्दाचे पक्के आहेत. तर त्यांनी फक्त जे बोललेत, ते लक्षात ठेवावं. कारण निवडणूक झाल्यानंतर आम्ही इथे दिसणारच... कारण रणजित आणि राजूदादा इथे राहतात. त्यांचं घरच इथे आहे. त्यामुळे ते इतके वर्षे काम करताहेत. सगळ्यांसाठी बोलले असतील, तर त्यांनी आधीच मिशा काढल्या पाहिजेत. त्यासाठी उद्या काय होणार हे बघण्याची गरज नाही", असा टोला श्रीनिवास पवार यांनी लगावला. 

    "रोहितचे सुद्धा घर इथे आहे. शेती इथे आहे. तो आमदार तिथला असला, तरी तीन इथे आणि तीन दिवस तिकडे असतो. तो जन्माने बारामतीकर आहेच. राहता राहिला प्रश्न माझा... माझा मुलगा आठवड्यातील तीन दिवस इथे असतो. कारण त्याचे व्यावसाय इथे आहेत. माझी शेती इथे आहे. माझी एक डीलरशिपही बारामतीमध्ये आहे. त्यामुळे माझाही इथे मुक्काम असतो. त्यामुळे फक्त दिलेला शब्द पाळावा. ही माझी त्याच्याकडून अपेक्षा आहे", असे श्रीनिवास पवार म्हणाले.

  • 11:24 AM • 05 May 2024

    Baramati Lok Sabha : जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट

    मराठा आरक्षण आंदोलनाचे प्रमुख मनोज जरांगे यांच्या भूमिककडे सगळ्या राजकीय नेत्यांचे लक्ष लागले आहे. राजकीय नेत्यांच्या जरांगेंसोबतच्या भेटी वाढल्या आहे. उस्मानाबादच्या उमेदवार अर्चना पाटील यांचे पती राणा जगजितसिंह यांनी भेट घेतली. 

    त्यानंतर आता अजित पवार यांचे पुत्र जय पवार यांनी मनोज जरांगेंची अंतरवाली सराटी येथे जाऊन भेट घेतली आहे. मराठा मतदारांमध्ये असंतोष असून, हा मतदार आपल्या बाजूने यावा, यासाठी प्रयत्न होताना दिसत आहेत.

  • 10:02 AM • 05 May 2024

    Sucharita Mohanty : काँग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केलं परत, कारण...

    काँग्रेसचे माजी खासदार ब्रजमोहन मोहंती यांच्या कन्या सुचारिता मोहंती यांनी काँग्रेस पक्षाने दिलेले तिकीट परत केले आहे. 

    काँग्रेसने सुचारिता मोहंती यांना पुरी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली. पण, त्यांनी आता निवडणूक लढवण्यास नकार दिला आहे. 

    निवडणूक न लढवण्याचे कारणही सुचारिता यांनी स्पष्ट केले आहे. 'मला पक्षाने निवडणूक लढवण्यासाठी निधी देण्यासाठी नकार दिला आहे. पक्षाने सांगितलं की, कमकुवत उमेदवारांना विधानसभेसाठी उमदेवारी दिली गेली आहे. एकीकडे भाजप बीजेडी पैशांच्या डोंगरावर बसले आहेत, तर मी इथे प्रचारासाठी संघर्ष करत आहे. माझ्यासाठी हे अवघड आहे. सगळीकडे पैशाचे अश्लील प्रदर्शन सुरू आहे. मला त्यांची स्पर्धा करायची नाही. मला जनतेला समोर ठेवून प्रचार करायचा आहे, पण पैसे नसल्याने शक्य नाही. काँग्रेसही यासाठी जबाबदार नाही. भाजप सरकारने पक्षाला पंगू करून टाकले आहे', असे त्यांनी म्हटले आहे.

  • 09:43 AM • 05 May 2024

    Thane Lok Sabha Election Updates : शिंदेंना ठाण्याची चिंता

    महायुतीमध्ये जागावाटपात एकनाथ शिंदे यांनी ठाण्याची जागा स्वतःकडे ठेवली, पण भाजपच्या पूर्ण सहकार्यासाठी त्यांची धडपड सुरू झाली आहे. ऐरोलीचे आमदार गणेश नाईक यांच्या समर्थकांनी नरेश म्हस्के यांना उमेदवारी दिल्याने नाराजी व्यक्त केली आहे. 

    भाजपच्या साडेतीनशे पेक्षा अधिक स्थानिक पदाधिकाऱ्यांनी आपापल्या पदाचे राजीनामे दिले आहेत. नाईक समर्थकांनी म्हस्केंचा प्रचार करणार नाही, अशी भूमिका घेतली असून, यामुळेच शिंदेंची डोकेदुखी वाढली असल्याचे बोलले जात आहे. 

    गणेश नाईक यांचे सुपुत्र संजीव नाईक यांना ठाण्यातून तिकीट मिळणार अशी चर्चा होती. त्यांनी प्रचारही सुरू केला होता. पण, ऐनवेळी म्हस्केंना उमेदवारी मिळाल्याने भाजपमध्ये नाराजी आहे. 

    ठाणे लोकसभा मतदारसंघ पूर्वी भाजपकडे होता. या मतदारसंघात भाजपची ताकद जास्त आहे, त्यामुळे इथून कमळ चिन्हावरच निवडणूक लढवली जावी, अशी भाजपच्या नेत्यांची आणि कार्यकर्त्यांचा हट्ट होता. त्यामुळेच या जागेचा पेच शेवटपर्यंत लांबला होता. पण, आता शिंदेंच्या शिवसेनेकडे ही जागा गेली आहे. पण, भाजपमध्ये नाराजी असल्याने नेत्यांची आणि महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न शिंदेंसह शिवसेनेच्या नेत्याकडून केले जात आहे. 

    मिळालेल्या माहितीनुसार, आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गणेश नाईक यांची भेट घेणार आहेत. 

follow whatsapp

ADVERTISEMENT