Maharashtra Lok Sabha Election 2024 Live : उत्तर मुंबईतून काँग्रेसने 'या' नेत्याला दिली उमेदवारी
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live News : लोकसभा निवडणुकीसंदर्भातील महत्त्वाच्या घडामोडी आणि महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या बातम्या वाचा...
ADVERTISEMENT
Lok Sabha Election 2024 Maharashtra Live Uppdates : पहिल्या दोन टप्प्यात महाराष्ट्रातील 13 लोकसभा मतदारसंघात निवडणूक पार पडल्या आहेत. उर्वरित लोकसभा मतदारसंघांसाठी पुढील तीन टप्प्यात मतदान होणार असून, प्रचार शिगेला पोहोचला आहे.
ADVERTISEMENT
भाजपच्या नेतृत्वाखाली महायुती आणि काँग्रेसच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीने कंबर कसली असून, प्रचारातून एकमेकांना लक्ष्य करताना नेते दिसत आहे.
पंतप्रधान मोदींनीही महाराष्ट्रात मुक्काम केला असून, सोमवारी तीन सभा झाल्यानंतर आजही त्यांच्या तीन सभा वेगवेगळ्या मतदारसंघात होणार आहेत. पश्चिम महाराष्ट्रातील काही मतदारसंघात भाजपची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीच्या नेत्यांनीही सभांचा धडाका लावला आहे.
लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने महाराष्ट्रातील वातावरण ढवळून निघालं असून, प्रत्येक घडामोडींचे अपडेट्स वाचा लाईव्ह ब्लॉगमध्ये...
ADVERTISEMENT
- 08:35 PM • 30 Apr 2024
उत्तर मुंबईतून काँग्रेसने 'या' नेत्याला दिली उमेदवारी
उत्तर मुंबईतून काँग्रेसने उमेदवार जाहीर केला आहे.काँग्रेसने भूषण पाटील यांना या जागेवरून उमेदवारी दिली आहे.भाजपने या जागेवरून पियुष गोयल यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे उत्तर मुंबईत पियुष गोयल विरूद्ध भूषण पाटील लढत होणार आहे.
- 07:13 PM • 30 Apr 2024
यामिनी जाधवांच्या उमेदवारीवरून अंधारेंनी भाजपला डिवचलं
या त्याच यामिनी जाधव आहेत ज्यांच्यावर व्हिडिओ स्पेशालिस्ट सोमय्यांनी ढीगाने भ्रष्टाचाराचे आरोप केले. ED, इन्कमटॅक्सच्या रेडमध्ये करोडो सापडल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या.
भक्तूल्यांनो मोदींना पंतप्रधान अशा भ्रष्टाचाऱ्याना संरक्षण देण्यासाठी करायचे आहे का?
- 05:26 PM • 30 Apr 2024
दक्षिण मुंबईतून यामिनी जाधवांना उमेदवारी जाहीर
दक्षिण मुंबईतून शिंदेच्या शिवसेनेकडून यामिनी जाधव यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. भाजपमधून या जागेवर राहुल नार्वेकर, मंगलप्रभात लोढा ही नावे चर्चेत होती. मात्र आता शिंदेंच्या शिवसेनेला हे जागा मिळाली असून, यामिनी जाधव यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. ठाकरेंच्या शिवसेनेकडून या जागेवर अरविंद सावंत यांना उमेदवारी दिली गेली आहे. त्यामुळे अरविंद सावंत विरूद्ध यामिनी जाधव अशी लढत रंगण्याची शक्यता आहे.
- 04:10 PM • 30 Apr 2024
Lok Sabha Election : वंचितने केली तीन उमेदवारांच्या नावांची घोषणा
वंचित बहुजन आघाडीने कल्याणसह मुंबईतील दोन लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवार जाहीर केले आहेत.
वंचित बहुजन आघाडीने कल्याणमधून मुस्लीम उमेदवार रिंगणात उतरवला आहे. जमील अहमद यांना वंचितने तिकीट दिले आहे.
वर्षा गायकवाड आणि उज्ज्वल निकम निवडणूक लढवत असलेल्या मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातूनही उमेदवार रिंगणात उतरवला आहे. वंचितने संतोष आंबुलगे यांना उमेदवारी दिली आहे.
मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघातून अफजल दाऊदनी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या लोकसभा मतदारसंघातून अरविंद सावंत हे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत. तर महायुतीचा उमेदवार अद्याप ठरलेला नाही.
- 01:17 PM • 30 Apr 2024
Maharashtra Lok Sabha : "निष्ठावान माणूस ब्लॅकमेल करून नेला", ठाकरेंच्या नेत्याने उपस्थित केले दोन सवाल
रवींद्र वायकर यांना एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने उमेदवारी जाहीर केली आहे. त्यांचे सुषमा अंधारे यांनी अभिनंदन केले. दोन प्रश्न त्यांनी उपस्थित केले आहेत.
"वायकर साहेबांबद्दल सदिच्छाच. पण कालपर्यंत निष्ठावान माणूस ईडीच्या धाकाने अक्षरशः ब्लॅकमेल करून नेला. ते खरंच मनाने शिंदे गटात रमले असतील का? रमले तरी अमोल कीर्तीकरांशी लढताना गजानन कीर्तिकर वायकरांची साथ देतील की पोटच्या पोराची?", असा सवाल सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला आहे.
- 11:59 AM • 30 Apr 2024
Lok Sabha Election Updates : वर्षा गायकवाड उमेदवारी अर्ज भरण्या आधी भावूक
Mumbai North Central Lok Sabha 2024 : काँग्रेसने उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून वर्षा गायकवाड यांना उमेदवारी दिली आहे. मंगळवारी उमेदवारी अर्ज भरायला जाण्यापूर्वी त्यांना अश्रू अनावर झाले.
माध्यमांशी संवाद साधत असताना वर्षा गायकवाड या त्यांचे वडील एकनाथ गायकवाड यांच्या आठवणीने भावूक झाल्या.२००९ मध्ये उत्तर मध्य मुंबईतून एकनाथ गायकवाड यांनी निवडणूक लढविली होती आणि जिंकले होते, असा प्रश्न विचारताच वर्षा गायकवाड यांना अश्रू अनावर झाले आणि नंतर त्यांनी बोलणं थांबवलं.
- 11:22 AM • 30 Apr 2024
शिंदेंनी वायकरांना दिली उमेदवारी, मुंबईतील कोणत्या मतदारसंघातून लढणार?
रवींद्र वायकर यांना एकनाथ शिंदे यांनी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहेत रवींद्र वायकर यांच्याविरोधात ठाकरेंच्या शिवसेनेचा उमेदवार असणार असून, ते मुंबई उत्तर पश्चिम म्हणजेच वायव्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून लढणार आहेत.
- 09:06 AM • 30 Apr 2024
BJP : "महाराष्ट्राचा महानालायक उद्धव ठाकरे", भाजपचे ठाकरेंवर टीकास्त्र
उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या टीकेला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उत्तर दिले आहे. बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंचा उल्लेख महानालायक असा केला आहे.
बावनकुळे यांनी म्हटलं आहे की, "महाराष्ट्राचे महानालायक उद्धव ठाकरे यांचा आदरणीय मोदीजी आणि देवेंद्रजींबद्दल बोलताना आज पुन्हा तोल गेलाच."
"उद्धव ठाकरेंनी देवेंद्रजींच्या नावानं कितीही शिव्याशाप दिले तरी जनता जनार्दनाचे आशीर्वाद देवेंद्रजींसोबत आहेत."
"खरं तर समर्थ रामदास स्वामींनी मुर्खांची लक्षणं सांगतांना लिहून ठेवलंय.
तोंडाळासीं भांडों नये | वाचाळासीं तंडोंनये |
संतसंग खंडूं नये | अंतर्यामीं ||||पण उद्धव ठाकरेंचा वाचाळपणा काही थांबायचं नाव घेत नाही. अडीच वर्षे घरात बसून काढली. बोलण्यासाठी एक विकासकामही केलं नाही. मग लोकांसमोर गेल्यावर अशी मुक्ताफळे उधळण्याची वेळ येते. उद्धव ठाकरे हे आता नैराश्याच्या गर्तेत गेले आहेत. त्यांची ही वायफळ बडबड त्यांच्या पक्षातील उमेदवारांना आणि नेत्यांना सुद्धा नकोशी झाली आहे."
"उद्धव ठाकरे यांनी आता एक लक्षात ठेवावं की, तुम्ही मोदीजी आणि देवेंद्रजींबद्दल कितीही वायफळ बडबड करा. ४ जून रोजी जनता तुम्हाला तोंड दाखवायलाही जागा ठेवणार नाही."
- 09:01 AM • 30 Apr 2024
Maharashtra Lok Sabha Updates : "मोदीजी, तोपर्यंत काळजी घ्या", रोहित पवारांचा टोला
शरद पवारांचा नामोल्लेख न करता पंतप्रधान मोदी यांनी भटकती आत्मा म्हणत टीकास्त्र डागलं. त्यांच्या विधानावर आमदार रोहित पवार यांनी टीका केली आहे. रोहित पवारांनी एक पोस्ट केली आहे.
ते म्हणतात, "काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल!
नांदतो केवळ पांडुरंग!!
(संत एकनाथ महाराज)
मोदीजी, महाराष्ट्र हे आमचं शरीर म्हणजेच पंढरी आहे आणि विठ्ठल हा या पंढरीतला आत्मा आहे.. म्हणूनच स्वतःचं आसन अस्थिर झाल्याचं लक्षात येताच तुम्हाला महाराष्ट्राची आठवण झाली, पण इथं येऊन विठ्ठलाचं दर्शन घेण्याऐवजी तुम्हाला #अस्थिर_आत्मे दिसू लागले. आता ४ जूननंतर भाजप आणि मित्र पक्षांच्या अनेकांना निवांत हिमालयात जाऊन मन स्थिर करण्याची संधी देश देणार आहे. तोपर्यंत काळजी घ्या!", असा टोला पवारांनी लगावला आहे.मोदी काय बोललेले?
पुण्यातील सभेत बोलताना मोदी म्हणालेली की, "असं म्हटलं जातं की, आपल्याकडे काही 'भटकती आत्मा' असतात.. ज्यांच्या इच्छा पूर्ण होत नाही, ज्यांचे स्वप्न अपूर्ण राहतात ते आत्मे भटकत राहतात. स्वत:चं काही झालं नाही तर दुसऱ्यांच्या गोष्टी बिघडविण्यात त्यांना मजा येते. आमचा महाराष्ट्र देखील अशा भटकती आत्म्यांचा शिकार झाला आहे."
- 08:42 AM • 30 Apr 2024
Pune Lok Sabha Updates : 'प्रस्थापितांची झोप उडवणार', निवडणूक चिन्ह मिळताच वसंत मोरेंनी थोपटले दंड
Pune Lok Sabha election 2024 : वंचित बहुजन आघाडीने पूर्वाश्रमीचे मनसेचे नेते वसंत मोरे यांना उमेदवारी दिली आहे. पुणे लोकसभा मतदारसंघातून मोरे निवडणुकीच्या रिंगणात असून, त्यांना आता निवडणूक चिन्हही मिळालं आहे.
वसंत मोरे यांना रोडरोलर हे निवडणूक चिन्ह मिळाले आहे. चिन्ह मिळताच वसंत मोरेंनी सोशल मीडियावर चिन्हाचा फोटो शेअर केला. "पुण्यात आता वसंत (तात्या) मोरे यांचा विकासाचा रोडरोलर प्रस्थापितांची झोप उडवणार... चिन्ह - रोड रोलर", असे ते म्हणाले आहेत.
पुणे लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार म्हणून मुरलीधर मोहोळ हे भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहेत. तर महाविकास आघाडीचे उमदेवार म्हणून काँग्रेसने रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी दिली आहे.
तिन्ही उमेदवारी पहिल्यांदाच लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात असून, पुणेकर लोकसभेत कुणाला पाठवणार याचीच उत्सुकता आहे. त्याचबरोबर वंचित फॅक्टर पुण्यातील निकालावर कसा आणि किती परिणाम करणार आणि कुणाला फटका बसणार, याबद्दलही चर्चा सुरू आहेत.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT