‘देहबोली, डोळ्यातून भाव व्यक्त करण्याचं कसब असलेला भारदस्त अभिनेता!’ विक्रम गोखलेंच्या निधनानं राजकारणीही भावूक

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

चतुरस्त्र अभिनयाने सिनेरसिकांच्या मनात स्वतःचं वेगळं स्थान निर्माण करणारे ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचं शनिवारी (26 नोव्हेंबर) निधन झालं. त्यांच्या निधनाने मराठी चित्रपटसृष्टीसह राजकीय वर्तुळही शोकाकूल झालं आहे. शरद पवार, नितीन गडकरी, देवेद्र फडणवीस यांच्यासह अनेक नेत्यांनी शोक व्यक्त केला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी विक्रम गोखले यांना श्रद्धांजली वाहिली आहे. शरद पवारांनी श्रद्धांजली अर्पण करताना म्हटलंय की, ‘ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या निधनाचे वृत्त अतिशय वेदनादायी आहे. रंगभूमी, चित्रपट आणि दूरचित्रवाणी तिन्ही माध्यमांतून विक्रम गोखले यांनी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. त्यांच्या निधनाने मराठी रंगभूमी व चित्रपटसृष्टीतील एक संवेदनशील अभिनेता हरपला.’

‘अभिनय कौशल्य व अनोख्या संवादशैलीने केवळ मराठीतच नव्हे तर हिंदी चित्रपटसृष्टीत त्यांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला. ५० वर्षे रंगभूमीची अविरत सेवा करत सामाजिक बांधिलकी जपणारे हरहुन्नरी कलावंत विक्रम गोखले यांना भावपूर्ण श्रद्धांजली!’, अशा भावना शरद पवारांनी व्यक्त केल्या आहेत.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनीही यांनी विक्रम गोखलेंचं जाणं कला विश्वाची मोठी हानी असल्याचं म्हटलंय. ‘मराठी व हिंदी चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली. चित्रपट, नाटक व मालिका या माध्यमांतून कला सृष्टीचा एक मोठा काळ विक्रम गोखले यांनी गाजवला. त्यांच्यासारखा चतुरस्त्र अभिनेता जाणे ही कला विश्वाची मोठी हानी आहे’, अशा भावना नितीन गडकरींनी व्यक्त केल्या आहेत.

ADVERTISEMENT

‘त्यांच्या अनेक संस्मरणीय भूमिकांनी रसिक-प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केले. भारतीय चित्रपट सृष्टीतील त्यांचे योगदान मोठे व कायम लक्षात राहणारे आहे. ईश्वर दिवंगत आत्म्यास शांती देवो आणि त्यांच्या कुटुंबीयांना या दु:खातून सावरण्याची शक्ती देवो. ॐ शांती’, अशा शब्दात नितीन गडकरींनी श्रद्धांजली वाहिली.

ADVERTISEMENT

विक्रम गोखले काळाच्या पडद्याआड, ‘बॅरिस्टर’ अजरामर करणाऱ्या अभिनेत्याची एक्झिट

देवेंद्र फडणवीस विक्रम गोखलेंच्या निधनावर काय म्हणाले?

‘मराठी आणि हिंदी अशा दोन्ही सिनेसृष्टी गाजविणारे ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या निधनाने सिनेमाजगत आणि नाट्यसृष्टीचे कधीही भरुन न निघणारे नुकसान झाले आहे. एक चतुरस्त्र अभिनेता, दिग्दर्शक, नाट्य कलावंतच नाही, तर व्यक्ती म्हणून सुद्धा मोठ्या मनाचे, व्यापक सामाजिक भान असलेले हे व्यक्तिमत्त्व! भारदस्त अभिनेता, देहबोली आणि डोळ्यातून भाव व्यक्त करण्याचे त्यांचे कसब आणि आत्मविश्वासी बाणा हे क्वचितच कुणाला लाभले!’, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

‘अभिनयाच्या क्षेत्रातील त्यांचा परिचय तर मोठा होताच, पण सैन्यदलात काम करताना अपंगत्त्व आलेल्यांच्या कुटुंबीयांना मदत किंवा निराधार बालकांचे शिक्षण यासाठी त्यांचा कायम पुढाकार असायचा. विक्रम गोखले यांच्या निधनाने अभिनयाचे चालते-बोलते विद्यापीठ आपल्यातून हरपले आहे. प्रत्येक भूमिकेला सुयोग्य न्याय देणार्‍या, ती व्यक्तिरेखा जीवंत साकारणार्‍या विक्रम गोखले यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. हे दु:ख सहन करण्याची शक्ती त्यांचे कुटुंबीय आणि त्यांच्या लाखो चाहत्यांना लाभो, हीच माझी ईश्वरचरणी प्रार्थना!’, अशी भावना देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केल्या आहेत.

‘ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या निधनाचे वृत्त दुःखद आहे. ते दर्जेदार अभिनेते होते. त्यांनी रंगभूमी तसेच रुपेरी पडद्यावर साकारलेल्या अनेक भूमिका आजही रसिकांच्या स्मरणात आहेत.त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली’, अशा शब्दात सुप्रिया सुळेंनी विक्रम गोखलेंना श्रद्धांजली अर्पण केलीये.

उद्धव ठाकरेंनी विक्रम गोखलेंना वाहिली श्रद्धांजली

‘विक्रम गोखले गेले. विश्वास बसत नाही. काल परवपर्यंत ते तसे संपर्कात होते. अनेक विषयांवर त्यांची मते ठाम असतं.एक कसदार राजबिंडा अभिनेते म्हणून चित्रपट रंगभूमी त्यांनी गाजवली. स्पष्ट संवादफेक हे त्यांचे वैशिष्ट्य. हिंदी सिनेसृष्टीतील तो लोकप्रिय मराठी चेहरा होता. त्यांचें जाणे चटका लावणारे आहे. मृत्यूवर मात करुन ते परत येतील असे वाटत होते.पण दुर्दैव. मी या महान अभीनेत्याला आदरांजली अर्पण करतो’, अशा भावना उद्धव ठाकरे यांनी विक्रम गोखलेंच्या निधनानंतर व्यक्त केल्या आहेत.

दिग्दर्शक समीर विद्वांस जुनी आठवण सांगत श्रद्धांजली वाहिली आहे. ‘विक्रम काका गेले. लेखक म्हणून माझा पहिला चित्रपट ‘आघात’ त्यांनी दिग्दर्शित केला होता. लहानपणापासून त्यांच्या अभिनयाचा प्रचंड चाहता होतो. भेदक नजर, आडतालातली संवाद फेक आणि गालातल्या गालातलं मार्मिक हसू आता परत पडद्यावर/स्टेजवर कुठेच अनुभवता येणार नाही. अलविदा विक्रम काका!’, अशा भावना त्याने व्यक्त केल्या आहेत.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT