विशाल निकम ठरला Marathi Bigg Boss 3 च्या पर्वाचा विजेता, जय दुधाणेला उप-विजेतेपद

विकास पाटीलची टॉप ३ पर्यंत मजल, विजेतेपदाच्या शर्यतीत असलेले मीनल-उत्कर्षही स्पर्धेबाहेर
विशाल निकम ठरला Marathi Bigg Boss 3 च्या पर्वाचा विजेता, जय दुधाणेला उप-विजेतेपद

मराठी बिग बॉसच्या तिसऱ्या पर्वाची आज अखेरीस सांगता झाली आहे. गेल्या तीन महिन्यांपासून १७ स्पर्धकांच्या सोबतीने रंगलेल्या या शोमध्ये विशाल निकम याने बाजी मारली आहे. रविवारी पार पडलेल्या महाअंतिम फेरीत विशाल निकम आणि जय दुधाणे हे विजेतेपदाच्या शर्यतीत होते. परंतू अतिशय उत्कंठावर्धक झालेल्या या पर्वात सांगलीच्या विशाल निकमने बाजी मारली आहे. विशाल निकमला २० लाख रुपये आणि आकर्षक ट्रॉफी गिफ्ट म्हणून मिळाली आहे.

गेल्या तीन महिन्यांपासून सुरु असलेल्या या पर्वाने अनेकांच्या मनात घर केलं होतं. प्रत्येक दिवशी रंगणारा टास्क, एलिमिनेशन असं दिव्य पार पाडून डॉ. उत्कर्ष शिंदे, विकास पाटील, जय दुधाणे, विशाल निकम आणि मीनल शहा हे स्पर्धक टॉप ५ मध्ये दाखल झाले होते. या पाचही स्पर्धकांना गेल्या आठवडाभरापासून सोशल मीडियावर चांगलाच प्रतिसाद मिळत होता.

परंतू गेल्या काही दिवसांपासून प्रेक्षकांची मनं जिंकलेली मीनल शहा विजेतेपदाच्या शर्यतीतून बाहेर पडली. सोशल मीडियावर अनेकांनी मीनल शहा यंदाची विजेती ठरेल असा अंदाज बांधला होता. बिग बॉसच्या घरात प्रत्येक टास्क तडफेने खेळल्यामुळे अनेकदा खुद्द महेश मांजरेकरांनीही तिचं कौतुक केलं होतं. परंतू विजेतेपदाच्या शर्यतीतून बाहेर पडल्यामुळे अनेकांना धक्का बसला.

मीनल बाहेर पडल्यानंतर उत्कर्ष, विकास, विशाल आणि जय यांच्यात विजेतेपदाची शर्यत रंगली. परंतू यानंतर आणखी एक धक्कादायक निकाल समोर आला तो म्हणजे पहिल्या दिवसापासून आपल्या बुद्धीचातुर्याने प्रत्येक टास्कमध्ये आपली वेगळी छाप पाडणारा उत्कर्ष शिंदे घराबाहेर झाला. उत्कर्ष हा देखील विजेतेपदाच्या शर्यतीतला प्रबळ दावेदार मानला जात होता. घरातलं त्याचं वावरणं, गाणी-कविता करत इतरांचं मनोरंजन करणं याला सोशल मीडियासह महाराष्ट्रातल्या सर्वच प्रेक्षकांनी दाद दिली होती. परंतू उत्कर्षच्या बाहेर जाण्यामुळे ही शर्यत अधिकच रंगतदार झाली.

विशाल, विकास आणि जय या टॉप ३ स्पर्धकांमध्ये घराबाहेर कोण पडणार आणि बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या पर्वाचे फायनलिस्ट कोण असतील यावरुन पुन्हा चर्चा रंगायला लागल्या. यानंतर बिग बॉसच्या घरात पार पडलेल्या एका टास्कमध्ये विकास पाटील विजेतेपदाच्या शर्यतीतून बाहेर पडला आणि जय दुधाणे व विशाल निकम हे तिसऱ्या पर्वाचे फायनलिस्ट ठरले. अखेरीस या दोन तुल्यबळ स्पर्धकांच्या शर्यतीत विशाल निकमने बाजी मारत तिसऱ्या पर्वाचं विजेतेपद मिळवलं आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in