BMC Election 2026: 'तिलाच सारखं... ', शिवसैनिक 'फायर आजी' उद्धव ठाकरेंवर एवढी का संतापली?
शिवसेना UBT पक्षाने श्रद्धा जाधव यांना पुन्हा तिकीट दिल्याने शिवसेनेच्या फायर आजी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चंद्रभागा शिंदे या थेट उद्धव ठाकरे यांच्यावर संतापल्या आहेत.
ADVERTISEMENT

मुंबई: मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या (BMC Election) तयारीत शिवसेना UBT पक्षात उमेदवारी वाटपावरून अंतर्गत कलह उफाळून आला आहे. मुंबईच्या प्रभाग क्रमांक 202 (लालबाग) मधून माजी महापौर श्रद्धा जाधव यांना पुन्हा उमेदवारी जाहीर झाल्याने पक्षाच्या ज्येष्ठ आणि निष्ठावंत कार्यकर्त्या चंद्रभागा शिंदे, ज्यांना 'फायर आजी' म्हणून ओळखले जाते, त्या प्रचंड नाराज झाल्या आहेत. फायर आजींनी पक्षनेते उद्धव ठाकरे यांच्यावर थेट टीका करत "साहेबांनी असं का केलं? तिलाच पुन्हा तिकीट का दिलं?" असा सवाल उपस्थित केला आहे. या घटनेमुळे पक्षातील निष्ठावंतांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत.
कोण आहेत फायर आजी?
चंद्रभागा शिंदे या शिवसेनेच्या कट्टर समर्थक आणि ज्येष्ठ कार्यकर्त्या आहेत. वयाच्या 80 व्या वर्षीही त्या पक्षाच्या आंदोलनांमध्ये सक्रिय असतात आणि त्यांच्या धडाडीपूर्ण भाषणांमुळे त्यांना 'फायर आजी' हे टोपणनाव मिळाले आहे.
2022 मध्ये हनुमान चालीसा प्रकरणात त्या ठाकरेंच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरल्या होत्या आणि रवी राणा आणि नवनीत राणा यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी देखील केली होती. 'झुकेगा नही साला..' असा डायलॉग म्हणत आजींनी राणा दाम्पत्याला आव्हान दिलं होतं. तेव्हापासून त्या 'फायर आजी' म्हणून चर्चेत आल्या होत्या.
त्याच वर्षी एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीदरम्यान त्या उद्धव ठाकरेंच्या पाठीशी ठाम उभ्या राहिल्या होत्या आणि मातोश्रीवर जाऊन ठाकरेंना पाठिंबा दिला होता. फायर आजी मुंबईच्या परळ भागात राहतात आणि पक्षाच्या स्थानिक शाखांमध्ये सक्रिय आहेत. त्या निष्ठावंत कार्यकर्त्यांचे प्रतीक मानल्या जातात.










