पुणे महानगरपालिका : विधानसभा निवडणुकीमध्ये चंद्रकांत पाटलांना नडणाऱ्या अमोल बालवडकर यांचा पत्ता कट
Pune Mahanagar Palika Election : विधानसभा निवडणुकीदरम्यान तत्कालीन मंत्री चंद्रकांत पाटील यांना उघडपणे आव्हान देणारे आणि त्यांच्या उमेदवारीविरोधात आक्रमक भूमिका घेणारे भाजप कार्यकर्ते अमोल बालवडकर यांचा महापालिका निवडणुकीतही पत्ता कट करण्यात आलाय. अमोल बालवडकर ज्या वार्डातून निवडणूक लढण्यास इच्छुक होते, त्या वार्डात भाजपने लहू बालवडकर यांना अधिकृत उमेदवारी जाहीर केली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
विधानसभा निवडणुकीमध्ये चंद्रकांत पाटलांना नडणाऱ्या अमोल बालवडकर यांचा पत्ता कट
भाजपकडून लहू बालवडकर यांना अधिकृत उमेदवारी जाहीर
Pune Mahanagar Palika Election : कोथरूड विधानसभा मतदारसंघातील भाजपच्या अंतर्गत राजकारणाचे पडसाद आता थेट पुणे महानगरपालिका निवडणुकीत उमटू लागले आहेत. विधानसभा निवडणुकीदरम्यान तत्कालीन मंत्री चंद्रकांत पाटील यांना उघडपणे आव्हान देणारे आणि त्यांच्या उमेदवारीविरोधात आक्रमक भूमिका घेणारे भाजप कार्यकर्ते अमोल बालवडकर यांचा महापालिका निवडणुकीतही पत्ता कट करण्यात आलाय. अमोल बालवडकर ज्या वार्डातून निवडणूक लढण्यास इच्छुक होते, त्या वार्डात भाजपने लहू बालवडकर यांना अधिकृत उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे अमोल बालवडकर यांचे राजकीय भवितव्य सध्या तरी अंधारात गेले आहे.
चंद्रकांत पाटलांना नडणाऱ्या अमोल बालवडकर यांचा पत्ता कट
विधानसभा निवडणुकीत कोथरूड मतदारसंघातून भाजपची उमेदवारी मिळावी, यासाठी अमोल बालवडकर यांनी जोरदार शड्डू ठोकला होता. आपण स्थानिक असून कार्यकर्त्यांचा पाठिंबा आपल्या पाठीशी असल्याचा दावा करत त्यांनी थेट चंद्रकांत पाटील यांना कडाडून विरोध केला होता. उमेदवारीच्या मागणीसाठी मोर्चे, बैठकांमधील आक्रमक भूमिका आणि सार्वजनिक नाराजी यामुळे हा वाद चिघळला होता. परिस्थिती इतकी गंभीर झाली होती की, या प्रकरणात थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही हस्तक्षेप करावा लागला होता.
अखेर पक्षशिस्त आणि वरिष्ठांच्या आदेशानंतर अमोल बालवडकर यांनी विधानसभा निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली होती. मात्र, त्यानंतरही त्यांनी चंद्रकांत पाटील यांच्यासाठी आणि भाजपसाठी प्रामाणिकपणे काम केलं का, याबाबत पक्षांतर्गत वर्तुळात प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. काही नेत्यांच्या मते, या नाराजीचा आणि बंडखोरीच्या सूरांचा फटका अमोल बालवडकर यांना दीर्घकाळ बसू शकतो, अशी चर्चा त्याचवेळी सुरू झाली होती.
आता पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपकडून उमेदवारांची यादी जाहीर होत असताना, अमोल बालवडकर यांचे नाव त्यात आलेले नाही. उलट, लहू बालवडकर यांना भाजपची अधिकृत उमेदवारी देण्यात आली आहे. यामुळे विधानसभा निवडणुकीत चंद्रकांत पाटील यांना नडणाऱ्या आणि स्वतंत्र भूमिका घेणाऱ्या कार्यकर्त्याचा ‘पत्ता कट’ महापालिका निवडणुकीतच करण्यात आल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.










