Zimma Film Review: एक आल्हाददायक अनुभव देणारी सुंदर कलाकृती

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

माणसं आणि जागा तेवढ्या जातात … वस्तू मात्र कायम राहतात… प्रवास.. प्रवासात माणूस जुन्याचा नवा होतो. त्याची स्वतशीच नव्याने ओळख होते. असा एक गोड प्रवास तो ही लंडनमधला.. झिम्मा या सिनेमातून मोठ्या पडद्यावर आलाय..

लॉकडाऊननंतर आता थिएटर्स सुरू झाली आहेत.. आणि थिएटर्स सुरू होताच एक छान सुखद अनुभव देणारा सिनेमा म्हणून झिम्माकडे पाहावं लागेल..

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

दिग्दर्शक हेमंत ढोमे आणि संवादलेखिका इरावती कर्णिक हिच्या अतिउत्तम संवादामुळे, सर्व कलाकारांच्या अप्रतिम अदाकारीमुळे, आणि नजरेचं पारणं फिटावं अश्या लंडन नगरीमुळे हा सिनेमा आपल्याला नक्कीच हवाहवासा वाटतो.

‘चूल आणि मूल’ या संकल्पनेखाली वावरणाऱ्या स्त्रिया जेव्हा मोकळ्या आकाशाखाली स्वछंदी आयुष्य जगतात, तेव्हा त्यांची स्वतःशीच एक नवीन ओळख होते.. वेगवेगळ्या पार्श्वभूमी, आवडीनिवडी, वयोगट असलेल्या अनोळखी स्त्रिया जेव्हा सहलीच्या निमित्ताने एकत्र येतात तेव्हा होणारी धमाल म्हणजे ‘झिम्मा’. . या वेगळ्या स्वभावाच्या महिला प्रवाशांची जेव्हा ‘इंग्लंड टूर’ सुरु होते तेव्हा त्यांच्यात घडणारी मज्जामस्ती, खटके, एकमेकींविषयीची काळजी, वेळोवेळी दिलेले मानसिक धैर्य, नव्याने निर्माण झालेली नाती असा सुंदर प्रवास आपल्याला झिम्मामध्ये पाहायला मिळतो. सिनेमाच्या सुरवातीलाच येणारं झिम्मा गाण्याने एक माहोल तयार होतो आणि पुढे सुरू होते या सात बायकांमधील धमाल लंडन टूर आणि त्यांच्यात घडणारे अगणित किस्से , हे किस्से घडत असताना नकळत का होईना त्यांच्या पूर्वआयुष्यातील क्षण हलकेसे का होईना प्रत्येकवेळी डोकावत राहतात. आणि आपल्या सहकारी महिलांसोबत चांगले वाईट अनुभव शेअर करत करत ही टूर पुढे पुढे उत्तम वळणावर येऊन थांबते..

ADVERTISEMENT

झिम्मा सिनेमाची कथा,यातील संवाद आणि दिग्दर्शन याला पैकीच्या पैकी मार्क देण्याची नितांत गरज आहे.. हेमंत ढोमेच्या अतिशय सोप्या अश्या कथेला आपल्या उत्तम संवादांनी इरावती कर्णिकने चार चांद लावले आहेत. सात बायकांसोबत एक टूर मँनेजर आणि त्यांच्यातली लंडन ट्रीपची ही धमाल हेमंत ढोमेने आपल्या दिग्दर्शनातून उत्तम रित्या मांडली आहे. हेमंत ढोमेचा दिग्दर्शक म्हणून आत्तापर्यंतचा अतिशय उत्तम सिनेमा आहे असं म्हणायला हरकत नाही. सिनेमँटोग्राफर संजय मेमाणेंच्या कॅमेऱ्याच्या लेन्समधून आपल्याला घरबसल्या होणारं लंडनचं नयनरम्य दृश्य खरंच डोळ्याचं पारणं फेडतं. क्षितीज पटवर्धनच्या समृध्द लेखणीतून आलेली गाणी आणि त्याला अमितराजने दिलेलं संगीत निव्वळ अप्रतिम..

ADVERTISEMENT

या सिनेमाचं कास्टिंग अत्यंत परफेक्ट झालं आहे. पण या सिनेमात चौकार षटकारांची आतिषबाजी केली आहे. निर्मिती सावंत आणि सुहास जोशींनी. या दोघी या टीमच्या कॅप्टन आहेत आणि त्यांनी प्रत्येक फ्रेममध्ये केलेली अदाकारी लाजवाब आहे.बुजलेली,घाबरलेली स्वताच्या कोशात असणारी व्यक्तिरेखा क्षिती जोगने लीलया साकारली आहे. लग्न ठरलेली पण अजूनही अनेक प्रश्नांची उत्तरं शोधणारी व्यक्तिरेखा सोनाली कुलकर्णीने फार ताकदीने उभी केली आहे. सायली संजीवची यो भूमिका आणि मृण्ययी गोडबोलेची चुलबुली भूमिका यामध्ये अजून रंग भरते. सुचित्रा बांदेकर यांनीही अतिशय उत्तम भूमिका साकारली आहे.. अभिनेता सिध्दार्थ चांदेकरनेही या ७ बायकांमध्ये सँण्डविज झालेल्या टूर अॉपरेटरची भूमिका अगदी समरसून केली आहे.

झिम्मा हा एक वेगळा अनुभव आहे आपल्या सगळ्यांसाठीच. हा सिनेमा फक्त महिलांनीच नाही तर प्रत्येकाने पाहायलाच हवा असा आहे. हे अनुभव आपल्या आयुष्यातही घडलेले असणार आणि सिनेमा पाहताना आपण नकळत का होईना त्या गोष्टींशी रिलेट करत जातो.. हे रिलेट करत जाण्यामुळेच झिम्मा उजवा ठरतो..आता वेळ आली आहे या सिनेमाला आपण किती स्टार देऊया याची.. हा अतिशय १०० टक्के उत्तम सिनेमा आहे याचं कारणही असंच आहे कारण झिम्मा तुम्हांला अतिशय आल्हाददायक अनुभव देतो… तुम्ही तो पाहाल तेव्हा तुमच्या नक्कीच लक्षात येईल..

    follow whatsapp

    ADVERTISEMENT