सिल्वर ओकवर झालेला हल्ला हा माझ्या आईवर झालेला हल्ला - सुप्रिया सुळे

'घरावर हल्ला करणारी लोकं स्वतःहून आलेली नव्हती, त्यांच्याशी संवाद साधणं ही माझी नैतिक जबाबदारी होती'
सिल्वर ओकवर झालेला हल्ला हा माझ्या आईवर झालेला हल्ला - सुप्रिया सुळे

राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्या दक्षिण मुंबईतील सिल्वर ओक निवासस्थानी झालेल्या एसटी कामकारांच्या हल्ल्याचे पडसाद आता राज्यभर उमटत आहेत. या हल्ल्यात सहभागी झालेले एसटी कामगार आणि त्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांना पोलिसांनी अटक केली आहे.

हल्ल्याच्या वेळी एसटी कामगारांना सामोऱ्या गेलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सिल्वर ओकवर झालेला हल्ला हा माझ्या आईवर झालेला हल्ला होता असं वक्तव्य केलं आहे.

"सिल्वर ओकवर जे झालं तो माझ्या आईवर झालेला हल्ला होता. माझे आई-वडील, मुलगी हे त्यावेळी तिकडेच होते. अशावेळी मी तेच केलं जे तुम्हीही केलं असतंत. मी त्यावेळी पोलिसांना संपर्क साधून वारंवार विनंती करत होते की मला त्या महिलांशी संवाद साधायचा आहे. कारण एक महिला म्हणून त्यांना काय त्रास होतोय हे जाणून घेणं ही माझी जबाबदारी होती."

हल्ल्याच्या वेळी एसटी कामगार कसे वागले याला माझ्या दृष्टीने महत्व नाही. ते असं का वागले हे महत्वाचं होतं आणि तेच मला जाणून घ्यायचं होतं. मला अजुनही असं वाटतंय की जी लोकं माझ्या घरावर हल्ला करायला आली ती स्वतःहून आलेली नव्हती. महाराष्ट्राची ही संस्कृतीच नाही. माझ्या आई आणि मुलीने घराच्या खिडक्या आणि पडदे बंद करुन घेतले होते जेणेकरुन घरात कोण आहे याचा पत्ता लागणार नाही, असं सुप्रिया सुळेंनी सांगितलं. त्या औरंगाबादेत बोलत होत्या.

त्या लोकांच्या वेदना समजून घेणं ही आमची नैतिक जबाबदारी होती कारण राष्ट्रवादी काँग्रेस हा सत्तेतला पक्ष आहे. कामगार मला वारंवार 105 कामगार मृत्यूमुखी पडलेल्याचा दाखला देत होते. मी त्यांना वारंवार आपण यावर चर्चा करुया असं सांगत होते कारण हा आकडा कन्फर्म होणं गरजेचं असल्याचं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

Related Stories

No stories found.