पंकजा मुंडेंचा धक्कादायक गौप्यस्फोट! “मराठी असल्याने मलाही मुंबईत घर नाकारलं”
मुलुंडमध्ये तृप्ती देवरुखकर या महिलेला ऑफिससाठी जागा देण्यास गुजराती व्यक्तींनी नकार दिला. यावर बोलताना पंकजा मुंडेंनी गौप्यस्फोट केला. मलाही मराठी असल्याने मुंबईत घर देण्यास नकार दिला गेला होता, असे पंकजा मुंडे म्हणाल्या.
ADVERTISEMENT

Pankaja Munde on mulund : मुलुंड पूर्व मध्ये तृप्ती देवरुखकर या महिलेला ऑफिससाठी जागा देण्यास गुजराती व्यक्तीने नकार दिला. याचे तीव्र पडसाद उमटले. विविध पक्षातील राजकीय नेत्यांनी यावर संताप व्यक्त केला. हा विषय चर्चेत असतानाच भाजपच्या नेत्या पंकजा मुंडेंनी एक धक्कादायक अनुभव सांगितला. मराठी असल्याने मलाही मुंबईत घर देण्यास नकार दिला गेला, असा गौप्यस्फोट पंकजा मुंडेंनी केला आहे.
‘मुलुंडच्या एका मुलीच्या एका व्हिडियोवरून माझ्या भावना व्यक्त कराव्याशा वाटल्या, या आहेत त्या भावना…’, असं म्हणत पंकजा मुंडेंनी त्यांच्या भावना एका व्हिडीओतून मांडल्या आहेत.
पंकजा मुंडे काय बोलल्या?
“आताच राजकारणातलं वातावरण आणि एकूणच समाजातलं वातावरण इतकं सगळं असताना… इतकी सगळी समृद्धी असताना रस्ते आहेत. हायवे आहेत. लोकांना सगळ्या सुविधा आहेत. प्रत्येकाकडे गाड्या आहेत. साधनं आहेत. हे सगळं असतानाही समाजात कुठेतरी अस्वस्थता वाटते”, अशी खंत पंकजा मुंडे यांनी व्यक्त केली.
आरक्षणाच्या मुद्द्यावर पंकजा मुंडेंनी काय मांडली भूमिका?
“आरक्षणाची भाडणं सुरू आहेत. वेगवेगळ्या समाजाचे लोक… कुणी मुंडण करतंय. कुणी आंदोलन करतंय. हे बघून ह्रदयाला पिळ पडतो. त्याचबरोबर प्रत्येक रंगात माणूस वाटला गेला आहे. हिरवा आहे. भगवा आहे. पिवळा आहे. निळा आहे. हे सगळं बघून कधी कधी वाटतं की, हे सगळे रंग जोरात फिरवले ना चक्रावर तर पांढरा रंग दिसतो. तो शांततेचा रंग आहे. हा रंग कधी आपल्या देशाला व्यापेल याची मी प्रतिक्षा करतेय”, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.