Shiv Sena UBT: 56 इंची छाती आहे का?; मोदींच्या ‘त्या’ भाषणाची खिल्ली
शिवसेनेच्या ठाकरे गटाने पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. मोदींची पदवी ते अडाणींच्या कंपनीतील 20 कोटी, अशा वेगवेगळ्या मुद्द्यांवर शिवसेनेचे सवाल उपस्थित केले आहेत.
ADVERTISEMENT

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रश्नांचा भडीमार केला आहे. असंख्य प्रश्न उपस्थित करत शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) मोदींना डिवचलं आहे. माझी प्रतिमा मलिन करण्यासाठी सुपारी दिल्याच्या मोदींच्या दाव्याची तुफान हास्यास्पद आणि खोटारडेपणाचा कळस, असं म्हणत खिल्ली उडवली आहे.
सामना अग्रलेखातू शिवसेनेने (UBT) म्हटलं आहे, “विनोदी किंवा गमतीशीर भाषणे करण्यात पंतप्रधान मोदी यांचा हात कोणीच धरू शकणार नाही. अमेरिकेच्या ट्रम्प यांनाही त्यांनी मागे टाकले आहे. मोदी म्हणतात, ‘माझी प्रतिमा मलिन करण्याचा काही लोकांचा प्रयत्न आहे. त्यासाठी त्यांनी देशात आणि देशाबाहेर काहींशी संगनमत करून सुपारी दिली आहे.’ मोदी पुढे असेही म्हणतात की, माझी कबर खोदण्याचा प्रयत्न सुरू आहे. माझ्या विरोधात कटकारस्थाने रचली जात आहेत. पंतप्रधान मोदी यांचे हे भाषण तुफान हास्यास्पद व खोटारडेपणाचा कळस आहे.”
“याआधी मोदी म्हणत होते, लोक मला शिव्या देतात. माझ्या मरणाची प्रार्थना करतात. मला घालून पाडून बोलतात. मोदी हे देशाचे पंतप्रधान आहेत याचा त्यांना विसर पडलेला दिसतोय. मुळात पंतप्रधानांची बदनामी कोण करतोय? माझ्या बदनामीची ‘सुपारी’ घेतलीय अशी टोचणी त्यांना का लागलीय याचे आत्मचिंतन त्यांनी स्वतःच केले पाहिजे”, असा सल्ला शिवसेनेने (UBT) मोदींना दिला.
पंतप्रधान मोदींना शिवसेनेचे (UBT) सवाल
– “मोदींच्या बोगस डिग्रीचा विषय सध्या गाजतो आहे. पंतप्रधान होण्यापूर्वी मोदी यांनी जाहीरपणे एका मुलाखतीत व भाषणात सांगितले होते की, ‘मी शिकलेलो नाही. माझ्याकडे कोणतीही पदवी नाही’ व नंतर अचानक मोदी यांची ‘एमए’ची पदवी (Entire Political Science) समोर येते व अमित शाह दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन मोदींची ‘डिग्री’ फडफडवून दाखवतात. त्यामुळे मोदींची डिग्री खरी की खोटी, यावर लोकांनी शंका घेतली तर त्यात मोदींची बदनामी कशी?”










