भाजपचे निलंबित आमदार टी. राजा सिंह यांच्यावर मुंबईत गुन्हा, वादग्रस्त भाषण काय?
मुंबईमधील हिंदू सकल समाज तर्फे आयोजित मोर्चात टी. राजा सिंह यांनी भाषण केले होते. याप्रकरणी त्यांच्यावर दादर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
ADVERTISEMENT

मुंबईत प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी भाजपच्या निलिंबत आमदारांवर गुन्हा दाखल झाला आहे. तेलंगणातील भाजपचे निलंबित आमदार टी. राजा सिंह यांच्यावर प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी दादर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. घटनेच्या तब्बल 2 महिन्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चिथावणीखोर भाषण केल्यामुळे धार्मिक भावना दुखावणे आणि दोन समाजात तेढ निर्माण करणे हे आरोप राजा सिंह यांच्यावर आहेत.
29 जानेवारीला मुंबईमध्ये हिंदू सकल समाज तर्फे आयोजित मोर्चात टी. राजा यांनी केलेल्या भाषणावरुन त्यांच्यावर 27 मार्चला गुन्हा दाखल झाला आहे. FIR मध्ये नमूद केल्यानुसार पोलिसांकडे या मोर्चासाठी परवानगी मागण्यात आली होती. महिला आणि मुलांवर होणाऱ्या अत्याचारांविरोधात कठोर कायद्याची मागणी करण्यासाठी हा मोर्चा काढण्यात येणार असल्याचे सांगत पोलिसांकडे या मोर्चासाठी परवानगी मागण्यात आली होती.
टी राजा सिंह : प्रकरण नेमकं काय?
29 जानेवारीला झालेल्या या मोर्चात टी. राजा यांनी केलेलं भाषण व्हायरल झालं होतं. सिंग यांच्यावर भादंवि कलम 153 अ (1) अ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चिथावणीखोर टीका करणं, ज्यामुळे दोन समुदायांमध्ये शत्रुत्व निर्माण होईल आणि धार्मिक भावना दुखावल्या जातील हे आरोप त्यांच्यावर आहेत.
हेही वाचा – धक्कादायक : समोर विधानसभा चालू अन् भाजपचे आमदार महोदय पॉर्न पाहण्यात व्यस्त
वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या माहितीनुसार “सिंह यांच्या भाषणाची काळीजपूर्वक तपासणी करण्यात आली आहे. या भाषणात धार्मिक भावना दुखावणं आणि दोन समाजात तेढ निर्माण होईल अशी विधान केल्याचं पोलिसांना आढळल्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला.”
हिंदू सकल समाजाच्या या मोर्चात भाजपचे इतरही नेते सहभागी झाले होते. पण राजा सिंह यांनी 30 मिनिटं भाषण केलं होतं. यावर भाजपच्या नेत्यांची प्रतिक्रिया आलेली नाही.
टी राजा सिंह यांनी त्यांच्या भाषणात म्हटलेलं होतं की, “हिंदू समुदाय एकजूट होण्याची हीच योग्य वेळ आहे. एका समाजाच्या वर्चस्वाविरुद्ध उभं राहायला हवं. आपल्या बहिणी, मुली एका समुदायाने ठरवून बनवलेल्या योजनांच्या शिकार बनत आहेत. मी प्रत्येक हिंदूला आवाहन करतो की, अल्पसंख्याक समुदायाच्या लोकांच्या दुकानातून कोणतेही सामान खरेदी करू नये, त्यांच्यावर बहिष्कार टाकावा,” असं ते म्हणाले होते.
हेही वाचा – छत्रपती संभाजीनगर हिंसाचार : रात्री बारा ते दुपारी बारा, काय-काय घडलं?
तेलंगणासह अनेक राज्यांमध्ये टी. राजा सिंह विरुद्ध द्वेष पसरवणारी भाषणे केल्या प्रकरणी गुन्हे दाखल झालेले आहेत. राजा सिंह यांना ऑगस्ट 2022 मध्ये इस्लाम आणि प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी अटकही करण्यात आली होती.