तेजस्वी यादवांशी संसार थाटताच नितिश कुमारांनी भाजपला दिले पाच संकेत

बिहारच्या राजकारणात मोठा बदल घडवत नितीश कुमार यांनी ८व्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
Nitish Kumar Takes Oath as Bihar CM
Nitish Kumar Takes Oath as Bihar CM

बिहारच्या राजकारणात (Bihar Politics) मोठा बदल घडवत नितीश कुमार यांनी ८व्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राज्यपाल फागू चौहान यांनी त्यांना राजभवनात मुख्यमंत्रिपदाची शपथ दिली. आरजेडीचे नेते तेजस्वी यादव (Tejashwi Yadav) यांनीही उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. एनडीए सोडून महाआघाडीत सामील होताच नितीश यांनी कठोर भूमिका घ्यायला सुरुवात केली आहे. शपथ घेतल्यानंतर त्यांनी भाजपपासून नरेंद्र मोदींपर्यंत ज्या पद्धतीने आणि कणखरतेने हल्ला चढवला त्यावरून भविष्यातील राजकारणाची चिन्हे दिसू लागली आहेत.

नितीश कुमार यांनी विरोधकांना केले आवाहन

भाजपशी फारकत घेतल्यानंतर आणि मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर नितीश कुमार यांनी 2024 च्या निवडणुकीत विरोधकांनी एकत्र येणाचे आवाहन केले आहे. नितीश म्हणाले, 2014 मध्ये सत्तेत आलेले 2024 मध्येही विजयी होतीलच असे नाही. मी सर्व विरोधी पक्षांना आवाहन करतो की त्यांनी 2024 साठी एकत्र यावे. त्याचबरोबर मी पंतप्रधानपदाच्या शर्यतीत नसल्याचे त्यांनी सांगितले. नितीश कुमार यांनी ज्या प्रकारे बिहारमध्ये RJD ते काँग्रेस आणि डाव्या पक्षांपर्यंत सर्व विरोधी पक्षांचा, लहान-मोठ्या पक्षांचा पाठिंबा मिळवला आहे, तो 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या विरोधात विरोधी आघाडीचा मुद्दा असू शकतो.

आगामी काळात विरोधी पक्ष आणखी मजबूत होणार- नितिश कुमार

नितीश कुमार यांनी कोणाचेही नाव न घेता सांगितले की, काही लोकांना वाटते की विरोधी पक्ष संपेल. आम्ही विरोधातही आलो आहोत. नितीश कुमार यांच्या या विधानाला भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या विधानाशी जोडले जात आहे, ज्यात त्यांनी देशात प्रादेशिक पक्ष संपत असल्याचे म्हटले होते. सर्व प्रादेशिक पक्ष संपतील आणि फक्त भाजपा टिकेल असे मत नड्डा यांनी व्यक्त केले होते. त्याला प्रत्युत्तर देत नितीश कुमार यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. आमचे सरकार बनले, शपथही घेतली आणि आता आम्ही विरोधकांसोबत आलो, असेही ते म्हणाले.

देशभर फिरून विरोधकांना बळ देण्याच्या प्रश्नावर नितीश कुमार म्हणाले की, आम्ही पुढे सर्व काही करू, संपूर्ण विरोधकांनी एकजुटीने पुढे जावे अशी आमची इच्छा आहे आणि योजना तयार आहे. विरोधी पक्ष मजबूत होईल. नितीश कुमार विरोधकांना बळकट करण्याच्या दिशेने पाऊल टाकण्यासोबतच 2024 च्या निवडणुकीत भाजपला पर्याय म्हणून देशातील विरोध पक्ष एकत्र करण्यावर भर देतील.

अटलबिहारी वाजपेयींच्या बहाण्याने नितीशकुमारांनी मोदींवर निशाणा साधला

अटलबिहारी वाजपेयींना समोर ठेऊन नितीश कुमार यांनी नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. वाजपेयी आणि मोदी यांच्यातील फरकाबाबत विचारले असता नितीश कुमार म्हणाले की, वाजपेयीजींचे त्यांच्यावर खूप प्रेम होते, आम्ही त्यांना विसरू शकत नाही. त्यावेळची आणखी एक गोष्ट होती.. अटलजींचे आणि त्यावेळच्या लोकांचे जे प्रेम होते ते विसरता येणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल मला काहीही बोलायचे नाही, असे ते म्हणाले. आम्ही एक माणूस दिला होता, तो त्यांचा झाला असे म्हणत नितीश कुमार यांनी थेट आरसीपी सिंह यांच्यावर निशाणा साधला.

नितीश कुमार म्हणाले की, आम्ही त्यांना पाठिंबा दिला, पण जेडीयूलाच संपवण्यासाठी त्यांच्या वतीने प्रयत्न सुरू झाले. म्हणून आम्हाला पुन्हा जुन्या ठिकाणी यावं लागलं. नितीश कुमार यांनी आपण विरोधी छावणीत उभे राहू असे सांगितले मात्र पंतप्रधानपदाचे पत्ते उघडलेले नाहीत.

पंतप्रधानपदाबाबत काय म्हणाले नितीश कुमार?

पंतप्रधानपदाच्या प्रश्नावर नितीश कुमार म्हणाले, माझा कोणताही दावा नाही. आम्ही जो काही निर्णय घेतला आहे, तो आमच्या पक्षाच्या सहकाऱ्यांना सोबत घेऊन घेतला आहे. 2024 मध्ये विरोधी पक्षाच्या पंतप्रधानपदाच्या उमेदवाराबाबत ते म्हणाले की, याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही आणि त्यांचा तसा कोणताही हेतू नाही. आपण पंतप्रधानपदाच्या शर्यतीत नसल्याचे त्यांनी सांगितले. जेडीयूचे बडे नेते नितीश कुमार पंतप्रधानपदाचा पुढचा चेहरा असल्याचे बोलले जाते.

भाजपसोबत राहण्याचा गैरफायदा

नितीश कुमार म्हणाले, सगळ्यांचे काय झाले ते आमच्या पक्षाच्या लोकांना विचारा. मला 2020 मध्ये मुख्यमंत्री व्हायचे नव्हते, पण पक्षातील आमदारांची काळजी घेण्यासाठी माझ्यावर दबाव आणला गेला. त्यानंतर जे काही घडते, ते सर्व पाहत होते. आमच्या पक्षाच्या लोकांच्या सांगण्यावरून आम्ही वेगळे झालो. ते म्हणाले, गेल्या दीड महिन्यांपासून आमच्यात काही बोलणे होत नव्हते, आमच्याशी काहीतरी चुकीचं होतंय याची चाहूल आम्हाला लागली होती.

पुढे नितीश कुमार म्हणाले ''2020 च्या निवडणुकीत जेडीयूला कशी वागणूक दिली गेली. भाजपसोबत गेल्याने आमचे आमदार दुखावले. भाजप सोडा, असे आमच्या पक्षातील सर्वजण सांगत राहिले. त्यामुळे आता आम्ही त्यांना सोडले आहे. हे लक्षात घेण्यासारखे आहे की 2020 मध्ये बिहार विधानसभा निवडणुकीत जेडीयूने कमी जागा जिंकल्या होत्या. निवडणुकीत 43 जागा जिंकूनही भाजपने नितीश यांना मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवर बसवले होते''.

Related Stories

No stories found.
logo
Mumbai Tak
www.mumbaitak.in