थप्पड की गुंज! ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात उपस्थित राहण्यास विल स्मिथला १० वर्षे बंदी

क्रिस रॉकला थोबाडीत ठेवून देणं विल स्मिथला पडलं महागात
थप्पड की गुंज! ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात उपस्थित राहण्यास विल स्मिथला १० वर्षे बंदी
ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात हाणामारी फोटो-आज तक

ऑस्कर पुरस्कार विजेता अभिनेता विल स्मिथला पुढची दहा वर्षे ऑस्कर पुरस्कार सोहळ्याला उपस्थित राहता येणार नाही. कारण त्याच्यावर दहा वर्षांसाठी बंदी घालण्यात आली आहे. कॉमेडियन क्रिस रॉकला २०२२ च्या म्हणजेच नुकत्याच झालेल्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात त्याने कानशिलात लगावली होती. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. क्रिस रॉकने विल स्मिथच्या पत्नीची खिल्ली उडवली होती त्यानंतर विल स्मिथने समोर जात क्रिस रॉकला कानशिलात लगावली होती. त्यामुळे यंदाचा ऑस्कर पुरस्कार सोहळा गाजला होता.

हॉलिवूड स्टार विल स्मिथवर ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात हजर राहण्यापासून १० वर्षे बंदी घालण्यात आली आहे. हॉलिवूड फिल्म अकादमीने शुक्रवारी हा फैसला केला. बोर्ड ऑफ गव्हर्नर्सनी ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात जो प्रकार घडला त्याचा निषेध नोंदवला आणि विल स्मिथवर दहा वर्षांची बंदी घातली आहे. त्यामुळे विल स्मिथला दहा वर्षे ऑस्कर पुरस्कार सोहळ्याला उपस्थित राहता येणार नाही.

काय आहे प्रकरण?

ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात क्रिस रॉक अँकरींग करत असताना त्याने विल स्मिथची पत्नी जेडा पिंकेट स्मिथची खिल्ली उडवली. जेडाला एका ट्रिटमेंटमुळे केस काढावे लागले. केस नसल्यामुळेच तिला चित्रपटात भूमिका मिळाली असं क्रिस म्हणाला. जेडाने Alopecia नावाच्या आजारामुळे तिचे केस काढले आहेत. आपल्या पत्नीची अशी खिल्ली उडवली गेली ते विल स्मिथला सहन झालं नाही त्यामुळे तो लगेच स्टेजवर आला आणि त्याने क्रिस रॉकला एक जोरदार ठोसा लगावला.

क्रिस रॉकही काही क्षणांसाठी स्तब्ध झाला. विल स्मिथने ठोसा मारल्यावर त्याला बजावलं की माझ्या पत्नीचं नाव परत घेऊन नकोस, त्यावर क्रिसने नाही काढणार असं म्हटलं. ऑस्कर २०२२ चा सोहळा चांगलाच रंगात असताना ही घटना घडली. ज्याची चांगलीच चर्चा सोशल मीडियावर रंगली होती. ही घटना समोर आल्यानंतर काही वेळातच क्रिस रॉक आणि विल स्मिथ दोघंही ट्विटरवर ट्रेंड होऊ लागले होते. दोघांच्या या भांडणाचीही चांगलीच चर्चा सोशल मीडिया आणि खासकरून ट्विटरवर झाली. आता आज पुन्हा एकदा हे प्रकरण चर्चेत आहे कारण विल स्मिथवर दहा वर्षांची बंदी घालण्यात आली आहे.

Related Stories

No stories found.