
कर्नाटकातील बंगळुरूमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आल्याची घटना घडली. या घटनेनंतर महाराष्ट्रातून संतप्त प्रतिक्रिया उमटली. राज्यभर ठिकठिकाणी निषेध नोंदवण्यात आला. याच घटनेसंदर्भात शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. निवेदन स्वीकारत शाह यांनी प्रकरणात आपण लक्ष घातलं असल्याचं सांगितलं.
कर्नाटकातील बंगळुरूमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आल्याचा संतापजनक प्रकार घडला. या घटनेची दृश्य सोशल मीडियावर व्हायरल झाली. या प्रकारानंतर धक्कादायक बाब म्हणजे कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी विटंबनेची घटना ही छोटी गोष्ट असल्याचं विधान केलं. या प्रकारावर महाराष्ट्रात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
दरम्यान, रविवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह पुण्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी अमित शाह यांची भेट घेऊन त्यांचं या प्रकरणाकडे लक्ष वेधलं. शिवसेना पुणे शहरप्रमुख संजय मोरे, किरण साळी आणि अन्य पदाधिकाऱ्यांनी पुणे दौर्यावर असलेल्या गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी निवेदनाद्वारे केली.
यावेळी अमित शाह म्हणाले, 'या प्रकरणात मी लक्ष घातलं आहे. माझं उद्धव ठाकरे यांच्याशीही बोलणं झालं आहे', असं त्यांनी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना सांगितलं.
'हे आपल्या पक्षाविषयी संभ्रम निर्माण करणारं'
'भाजपशासित कर्नाटकची राजधानी असलेल्या बंगळुरू शहरात हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची कानडी गुंडांनी केलेली विटंबना अत्यंत संतापजनक आहे. भारतीय जनता पार्टी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी प्रेम आणि आदर दाखवते, एवढंच काय 'छत्रपती शिवराय का हाथ भाजपा के साथ' अशा घोषणाही देते आणि दुसऱ्या बाजूला भाजपशासित कर्नाटकात वारंवार छत्रपतींचा अवमान होतो, ही गोष्ट आपल्या पक्षाविषयी संभ्रम निर्माण करणारी आहे', असं म्हणत शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी विटंबना करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.