
त्रिपुरातील तथाकथित हिंसाचाराच्या निषेधार्थ करण्यात आलेल्या बंदला अमरावतीत हिंसेचे गालबोट लागलं होतं. सलग दोन दिवस शहरात हिंसक घटना घडल्यानं प्रशासनाने सध्या संचारबंदी लागू केलेली असून, हिंसाचाराशी संबंधित संशयित आरोपीची धरपकड केली जात आहे. आतापर्यंत 132 हून अधिक आरोपींना अटक करण्यात आली असून, आजपासून अमरावती शहरातील संचारबंदी अंशतः शिथिल केली जाणार आहे.
अमरावती शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी कलम 144 अन्वये संपूर्ण संचारबंदीचे आदेश आहेत. शहरातील नागरिकांच्या अडचणी लक्षात घेऊन जीवनावश्यक वस्तू व्यवहारासाठी दुपारी 2 ते 4 या वेळेत 2 तासांची मुभा देण्यात आली आहे. अमरावती शहरातील सर्व नागरिकांनी शांतता राखण्याचं आवाहन शहराच्या पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह यांनी केलं आहे.
दुसरीकडे शहरातील वातावरण बिघडवणे तसेच अनुचित प्रकाराला जबाबदार असलेल्या व्यक्तींविरुद्ध विविध पोलीस ठाण्यात 26 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. एकूण 132 संशयितांना अटक करण्यात आलेली आहे. समाजमाध्यमांद्वारे चुकीच्या माहितीचा प्रसार होऊ नये यासाठी आज रात्रीपर्यंत (16 नोव्हेंबर) सर्व इंटरनेट सेवा बंदच ठेवण्यात आलेली आहे.
जिल्ह्यातील संचारबंदीची स्थिती कशी?
प्रशासनाने अमरावती शहरातील नागरिकांच्या अडचणी लक्षात घेऊन काही वेळासाठी संचारबंदीत शिथिलता देण्याचा निर्णय घेतला आहे. आजपासून (16 नोव्हेंबर 2021) दुपारी 2 ते 4 वाजेपर्यंत जीवनावश्यक वस्तूंचं आवागमन, दूधवितरण आदी व्यवहार, तसेच शासकीय व निमशासकीय परीक्षा देण्यासाठी पात्र असलेल्या व परीक्षेचे ओळखपत्र असलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षेच्या वेळेनुसार विद्यार्थ्यांना सवलत देण्यात आली आहे.
दरम्यान, हिंसाचाराच्या घटनेनंतर अमरावती शहरातील परिस्थिती काहीशी नियंत्रणामध्ये आल्याचं दृश्य आहे. पठाण चौक, इतवारा बाजार, चित्रा चौक परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. इतर जिल्ह्यातील जवळपास 4000 पोलीस कर्मचाऱ्यांचा कडेकोट बंदोबस्त आहे.
दुसरीकडे पोलिसांनी अटकसत्र सुरू ठेवले असून, भाजप नेते अनिल अनिल बोंडे यांना काल 12 तास पोलीस निगरानीखाली ठेवण्यात आले होते. त्यानंतर आज सकाळी सिटी कोतवाली पोलिसांनी अटक केली. त्याचबरोबर भाजप नेते तुषार भारतीय यांना अटक केली करण्यात आली आहे. त्याचबरोबर आमदार प्रवीण पोटे यांचा शोध सुरू आहे.
अमरावती ग्रामीण भागातील स्थिती...
जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी शहरात 14 नोव्हेंबरपासून पुढील आदेशापर्यंत संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर अचलपुर, परतवाडा शहर व कांडली देवमाळी ग्रामपंचायत क्षेत्रात सोमवार (15 नोव्हेंबर) पासून रात्री 7 ते सकाळी 7 या वेळेमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे.