कोंबड्या फक्त भाईच्या दुकानातून घ्यायच्या ! कल्याणमध्ये अज्ञात व्यक्तींची चिकन सेंटर मालकाला मारहाण

कल्याणमध्ये कोंबड्यांच्या व्यवसायातील स्पर्धेतून घडला प्रकार
कोंबड्या फक्त भाईच्या दुकानातून घ्यायच्या ! कल्याणमध्ये अज्ञात व्यक्तींची चिकन सेंटर मालकाला मारहाण

- मिथीलेश गुप्ता, कल्याण प्रतिनिधी

कल्याण शहरात एक विचीत्र घटना समोर आली आहे. पत्री पूल भागात चिकन सेंटर चालवणाऱ्या एका व्यक्तीला अज्ञात व्यक्तींनी मारहाण केली आहे. कोंबड्यांचा धंदा करायचा असेल तर फक्त भाईच्या दुकानातून कोंबड्या घ्यायच्या असं म्हणत ही मारहाण झाल्याचा आरोप चिकन सेंटरचे मालक अब्दुल अलीम शेख यांनी केला आहे.

कल्याणच्या पत्रीपुल परिसरात अब्दुल अलीम शेख यांचं अलीम चिकन सेंटर हे दुकान आहे. पहाटे पाच वाजल्याच्या सुमारास शेख हे आपल्या दुकानासमोर उभे होते. कोंबड्या पुरवणारी गाडी आल्यानंतर माल उतरवण्याचं काम सुरु असताना अचानक त्या ठिकाणी रिक्षातून चार-पाच तरुण आले. या तरुणांनी सर्वात आधी कोंबड्या घेऊन आलेल्या ट्रक चालकाला पिटाळून लावलं.

यानंतर त्यांनी आपला मोर्चा थेट अब्दुल अलीम शेख यांच्याकडे वळवला आणि त्यांना मारहाण करायला सुरुवात केली. मला का मारत आहात अशी विचारणा केली असता त्यातील एका तरुणाने अब्दुल यांना तुला कोंबड्यांचा धंदा करायचा असेल तर फक्त भाईच्या दुकानातून कोंबड्या घ्यायच्या अशी धमकी दिली.

अब्दुल यांनी दिलेल्या माहितीनुसार, कल्याणच्या चक्कीनाका परिसरातील काही गुन्हेगारी वृत्तीची लोकं या व्यवसायात उतरली आहेत. या व्यक्ती सर्व दुकानदारांवर अशा पद्धतीने दहशत पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत. यामधूनच आपल्याला मारहाण झाल्याचं अब्दुल यांनी सांगितलं. या प्रकरणी टिळकनगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in