पालघर : सलूनमध्ये 'काश्मीर बनेगा पाकिस्तान' गाणं मोठ्या आवाजात वाजवलं, पोलिसांनी आरोपीला उचललं...
पालघर जिल्ह्यातील नायगाव येथे एका सलूनमध्ये स्पीकरवर 'काश्मीर बनेगा पाकिस्तान' हे प्रक्षोभक आणि अशांतता पसरवणारं गाणं लावल्याप्रकरणी पोलिसांनी 25 वर्षीय तरुणाला अटक केल्याचं वृत्त आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
सलूनमध्ये 'काश्मीर बनेगा पाकिस्तान' गाणं मोठ्या आवाजात वाजवलं
पोलिसांनी आरोपीला घेतलं ताब्यात...
पालघर जिल्ह्यातील धक्कादायक घटना
पालघर: पालघर जिल्ह्यातील नायगाव पोलीस स्टेशन हद्दीतून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. एका सलूनमध्ये स्पीकरवर 'काश्मीर बनेगा पाकिस्तान' हे प्रक्षोभक आणि अशांतता पसरवणारं गाणं लावल्याप्रकरणी पोलिसांनी 25 वर्षीय तरुणाला अटक केल्याचं वृत्त आहे. संबंधित घटना ही नायगाव पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या चिंचोटी परिसरातील दुर्गामाता मंदिराजवळ घडली. 'काश्मीर बनेगा पाकिस्तान' हे गाणं 2025 मध्ये पाकिस्तानी लष्कराच्या मीडिया विंग, इंटर-सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन्स (ISPR) ने भारताविरुद्धच्या प्रचार मोहिमेचा भाग म्हणून रिलीज केलं होतं.
FIR नुसार, 1 जानेवारी 2026 रोजी दुपारच्या सुमारास उपनिरीक्षक पंकज किलजे त्यांच्या खाजगी वाहनातून गस्त घालत असताना त्यांना रुहान हेअर कटिंग सलूनमधून 'काश्मीर बनेगा पाकिस्तान' हे वादग्रस्त गाणं मोठ्या आवाजात ऐकू आलं. पोलिसांच्या मते, हे गाणं भारताच्या सार्वभौमत्वाच्या आणि एकतेच्या विरोधात आहे आणि या गाण्यातून समाजात शत्रुत्व, द्वेष पसरू शकतो आणि सार्वजनिक शांतता भंग होऊ शकते.
हे ही वाचा: नांदेड: विनयभंगाच्या आरोपाखाली तुरुंगात गेला, मनात सुडाची भावना अन् जामीनावर सुटल्यानंतर पीडितेच्या पतीलाच जाळलं...
स्थानिकांनी आरोपीला केलं पोलिसांच्या स्वाधीन..
पोलिसांनी त्वरीत संबंधित सलूनमध्ये छापा टाकला. त्यावेळी, सलूनमध्ये गुलजारी राजू शर्मा (51) आणि आरोपी अब्दुल रहमान सदरुद्दीन शाह (25) उपस्थित होते. आरोपी हा मूळ उत्तर प्रदेशच्या आजमगड जिल्ह्यातील लालगंज परिसरातील रहिवासी असल्याची माहिती आहे. पोलिसांनी आरोपीचा मोबाईल फोन तपासला असता तेच गाणं युट्यूबवर लावलं असल्याचं आढळून आलं. या घटनेमुळे स्थानिकांमध्ये संतापाची लाट उसळली आणि त्यावेळी स्थानिकांनी अब्दुल रहमानला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं.
हे ही वाचा: सांगली : नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी NS लॉ कॉलेज समोर रक्ताचा सडा, किरकोळ वादातून तरुणाचा निर्घुण खून
या प्रकरणी नायगाव पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या (BNS) कलम 197(1)(d) (भारताच्या सार्वभौमत्वाला, एकतेला, अखंडतेला किंवा सुरक्षिततेला धोका निर्माण करणारी खोटी किंवा दिशाभूल करणारी माहिती पसरवणे) अंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली. BNS च्या या कलमाअंतर्गत दोषी आढळणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला तीन वर्षांपर्यंत तुरुंगवास किंवा दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, अशा गाण्यांमुळे परिसरात तणाव आणि अशांतता निर्माण होऊ शकते.










