मंत्रिमंडळ बैठकीत असतानाच अशोक चव्हाणांना कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा फोन आला आणि...

अशोक चव्हाण यांनी तातडीने बैठक सोडली
Ashok Chavan
Ashok Chavan

राज्यात कोरोनाचं संकट कायम आहे. अनेक राजकीय नेत्यांनाही कोरोना झाला आहे. काही दिवसांपूर्वीच शरद पवार यांनीही त्यांना कोरोना झाल्याची माहिती दिली होती. आता सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनाही कोरोना झाला आहे. विशेष बाब म्हणजे जेव्हा कॅबिनेटची बैठक सुरू होती त्यातच अशोक चव्हाण यांना कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा फोन आला. ज्यानंतर त्यांनी तातडीने बैठक सोडली.

दर आठवड्याला बुधवारी मंत्रिमंडळाची बैठक पार पडते. पण यावेळी प्रजासत्ताक दिन असल्याने ही बैठक गुरुवारी घेण्यात आली. अनेक महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा आणि निर्णय घ्यायचे असल्याने मंत्र्यांनी केलेल्या आग्रहानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी मंत्रिमंडळाची बैठक घेतली. या बैठकीत काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले.

अशोक चव्हाण यांना काही लक्षणं जाणवत होती. त्यामुळे त्यांनी कोरोना चाचणी केली होती. अशोक चव्हाण हे जेव्हा बैठकीत आले तेव्हाच त्यांना ते पॉझिटिव्ह असल्याचा फोन आला. ज्यानंतर त्यांनी तातडीने ती बैठक सोडली. त्यानंतर त्यांनी ट्विट करूनही याबाबतची माहिती दिली आहे. 'माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. संपर्कात आलेल्यांनी कृपया काळजी घ्यावी.' असंही आवाहन अशोक चव्हाण यांनी ट्विट करून केलं आहे.

कॅबिनेटच्या बैठकीला अशोक चव्हाणदेखील उपस्थित होते. याचवेळी अशोक चव्हाण यांचा फोन वाजला आणि तिथे उपस्थित सर्व मंत्र्यांची झोपच उडाली. कारण अशोक चव्हाण यांना कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. रिपोर्ट हाती येताच अशोक चव्हाण हे बैठकीतून निघून गेले. महत्वाचं म्हणजे मंत्रिमंडळ बैठकीआधी अशोक चव्हाण यांनी प्रभारींच्या नेतृत्वात पार पडलेल्या पक्षाच्या बैठकीतही उपस्थिती नोंदवली होती.

मंत्रिमंडळ बैठकीत काय निर्णय झाले?

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 संदर्भात स्थापन करण्यात आलेल्या डॉ. रघुनाथ माशेलकर समितीचा अहवाल सादर. या धोरणाच्या अंमलबजावणीसाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली कार्यगट स्थापन करण्यास मान्यता. (उच्च व तंत्र शिक्षण विभाग)

फोर्ट, मुंबई येथील सेंट्रल टेलिग्राफ ऑफिस इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील जागा मुंबई उच्च न्यायालयाच्या कार्यालयीन वापरासाठी भाडेतत्वावर उपलब्ध करण्यास मान्यता. (विधि व न्याय विभाग)

सुपर मार्केटमध्ये किंवा वॉक इन स्टोअरमध्ये शेल्फ इन शॉप या पद्धतीने वाईनची विक्री ही संकल्पना राबविण्याचा निर्णय. (राज्य उत्पादन शुल्क विभाग)

राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालये व रुग्णालयांच्या आस्थापनेवरील चिकित्सालयीन व अतिविशेषोपचार विषयातील कंत्राटी तत्वावर नियुक्तीबाबतच्या तरतुदींत सुधारणा करण्याचा निर्णय. प्राध्यापक व सहयोगी प्राध्यापक संवर्गातील अध्यापकांच्या मानधनात वाढ करणार. (वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग)

मुंबई येथील शासकीय विधि महाविद्यालयाच्या प्राचार्य श्रीमती अस्मिता वैद्य यांची पूर्वीची अशासकीय महाविद्यालयातील सेवा विचारात घेऊन त्यांचे वेतन संरक्षित करण्यास कार्योत्तर मंजुरी. (उच्च व तंत्र शिक्षण विभाग)

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in