डेल्टा प्लसचे 21 रुग्ण, ही तिसऱ्या लाटेची सुरूवात?

महाराष्ट्रात डेल्टा व्हेरिअंटचे 21 रुग्ण आढळल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिली माहिती
डेल्टा प्लसचे 21 रुग्ण, ही तिसऱ्या लाटेची सुरूवात?
Aaj Tak

महाराष्ट्रात डेल्टा व्हेरिअंटचे 21 रुग्ण आढळल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिली. त्यातले रत्नागिरीत 9, जळगावात 7, मुंबईत 2, पालघर 1, सिंधुदुर्ग 1 आणि ठाण्यातही डेल्टा प्लसचा 1 रुग्ण आढळला आहे. 15 मे पासून 7500 नमुने घेण्यात आले आणि त्यांचे स्क्विन्सिंग करण्यात आले. ज्यामध्ये डेल्टा प्लसचे साधारणपणे 21 केसेस आढळून आले आहेत. आता या 21 जणांचं कॉटॅक्ट ट्रेसिंग सुरू करण्यात आलं आहे.

पण जर आकडेवारी नीट पाहिली तर लक्षात येत की रत्नागिरी आणि त्या खालोखाल जळगाव या दोन जिल्ह्यांमध्ये डेल्टा प्लसचे सर्वात जास्त रुग्ण आढळलेत.

Aaj Tak

तसं पाहायला गेलं तर डेल्टा प्लस व्हेरिअंटला अजूनही व्हेरिअंट ऑफ कन्सर्न म्हणजे चिंताजनक व्हेरिअंट म्हणून घोषित करण्यात आलेलं नाही.

पण हाच डेल्टा प्लस महाराष्ट्रातल्या तिसऱ्या लाटेसाठी कारणीभूत ठरू शकतो अशी शक्यता राज्याच्या कोविड टास्क फोर्सकडून व्य़क्त करण्यात आली आहे. त्यामुळे रत्नागिरी आणि जळगावमार्गे डेल्टा प्लसच्या माध्यमातून महाराष्ट्रात कोरोनाची तिसरी लाट येतेय का? असा प्रश्न विचारला जातोय. त्यामुळे त्याचं उत्तर शोधताना आधी, सगळ्यात पहिले जाणून घेऊया की राज्याच्या कोविड टास्क फोर्सने मुख्यमंत्र्यांशी झालेल्या बैठकीत नेमकं काय म्हटलं होतं?

तिसऱ्या लाटेच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री आणि टास्क फोर्समध्ये 17 जूनला बैठक झालेली. त्यात ही शक्यता व्यक्त केली गेलेली.

दुसर्‍या लाटेदरम्यान ‘डेल्टा व्हेरिएंट’मुळे रुग्णांची संख्या पहिल्यापेक्षा खूपच जास्त आहे, त्यामुळे तिसऱ्या लाटेमध्ये रुग्णांची संख्याही जास्त असू शकते. करोनाच्या पहिल्या लाटेत राज्यात सुमारे 19 लाख आणि दुसऱ्या लाटेत सुमारे 40 लाख रुग्णांची नोंद झाली. तिसऱ्या लाटेत आठ लाख सक्रिय रूग्ण असू शकतात, ज्यांपैकी दहा टक्के मुलेही असू शकतील, असं आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी या बैठकीत सांगितलेलं.

Aaj Tak

आता महाराष्ट्रात आढळलेला डेल्टा प्लस ही तिसऱ्या लाटेची सुरूवात म्हणायचं का? याच प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आम्ही राज्याच्या कोविड टास्क फोर्सचे सल्लागार डॉ. सुभाष साळुंखे यांच्याशी बोललो. तेव्हा ते म्हणाले की, महाराष्ट्रातल्या पहिल्या लाटेत रत्नागिरीत खूप कमी रुग्ण आढळत होते. दुसऱ्या लाटेच्या सुरूवातीलाही तिथे रुग्ण कमीच होते. पण आता मात्र तिथली रुग्णसंख्या वाढताना दिसतेय. पण याचा अर्थ रत्नागिरीमध्ये डेल्टा प्लसचे आढळलेले रुग्ण ही तिसऱ्या लाटेची सुरूवात आहे असं म्हणू शकत नाही. पण इथे दुसरी लाट उशिरानं सुरू झालीय असं आपण म्हणू शकतो.

याच विषयावर आम्ही पल्मोनोलॉजिस्ट डॉ. लेंसलॉट पिंटो यांच्याशी बोललो तर त्यांनीही कुठलाही अर्थ काढणं घाई असेल असंच म्हटलंय. ते असं म्हणाले की, डेल्टा प्लस व्हेरिअंट जास्त धोकादायक ठरू शकतो का याबाबत अजूनही ठोस उत्तर मिळालेलं नाही. सध्या तरी घाबरण्याची गरज नाही. सध्या तरी असं म्हणू शकत नाही की, डेल्टा प्लसमुळे तिसरी लाट आलीय.

याचाच अर्थ डेल्टा प्लस व्हेरिअंट घातक ठरू शकतो ही शक्यता जरी असली, तरी जोपर्यंत तज्ञांकडून स्पष्ट केलं जात नाही तोपर्यंत या बातम्यांनी घाबरून जायची गरज नाही. पण काळजी घ्यायलाच हवी.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in