फडणवीसांचा राजकीय डाव शिवसेनेच्या वर्मी, 'सामना'तून विरोधी पक्ष नेत्यावर टीकेची झोड

Saamana Editorial on Devendra Fadnavis: शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या 'सामना'च्या अग्रलेखातून शिवसेनेने देवेंद्र फडणवीस यांच्यावर तुफान टीका केली आहे.
फडणवीसांचा राजकीय डाव शिवसेनेच्या वर्मी, 'सामना'तून विरोधी पक्ष नेत्यावर टीकेची झोड
devendra fadnavis bjp politics shiv sena subhash sabane by poll saamana editorial

मुंबई: 'मराठवाड्यातील पूरस्थितीविषयी एक संयमी भूमिका मांडणाऱ्या फडणवीस यांनी लगेचच देगलूर-बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीच्या निमित्ताने पक्षीय राजकारण साधलेच. म्हणजे पूरग्रस्तांचे सांत्वन हा एक ‘मुखवटा’ होता आणि त्याआड दडलेले राजकारण हा ‘चेहरा’ होता का?,' अशा शब्दात शिवसेनेने विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या 'सामना'च्या अग्रलेखातून फडणवीसांवर टीकेची झोड उठविण्यात आली आहे.

राज्यात अतिवृष्टी आणि पूर यामुळे भीषण परिस्थिती ओढावलेली असताना देखील विरोधकांकडून राजकारण सुरु असल्याचा आरोप सामनातून करण्यात आला आहे.

नांदेडच्या दौऱ्यावर शेतकऱ्यांची नुकसान पाहणी करण्यासाठी गेलेल्या फडणवीस यांनी शिवसेनेचे नेते सुभाष साबणे यांना फोडत थेट विधानसभा पोटनिवडणुकीचं तिकिटच दिलं. फडणवीसांचा हा वार शिवसेनेच्या देखील वर्मी बसला आहे. अशावेळी आता सामनातून फडणवीसांवर निशाणा साधण्यात आला आहे.

'सामना'च्या अग्रलेखातील महत्त्वाचे मुद्दे:

 • विरोधी पक्ष हे बौद्धिक बेइमानी करत असून राजकीय फसवेगिरीतही ते आघाडीवर असल्याचे ज्वलंत मत श्री. मोदी यांनी नुकतेच मांडले. विरोधकांनी लोकांना फसवू नये व गोंधळ निर्माण करु नये, असा सल्ला पंतप्रधान मोदी यांनी दिला.

 • बरहुकूम राज्यातल्या विरोधी पक्षाने वागायचे ठरवले असेल तर त्यात त्यांचे व राज्याचेही हित आहे. अर्थात तसे होईल का, हा प्रश्नच आहे.

 • कारण मराठवाड्यातील पूरस्थितीविषयी एक संयमी भूमिका मांडणाऱ्या फडणवीस यांनी लगेचच देगलूर-बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीच्या निमित्ताने पक्षीय राजकारण साधलेच. म्हणजे पूरग्रस्तांचे सांत्वन हा एक ‘मुखवटा’ होता आणि त्याआड दडलेले राजकारण हा ‘चेहरा’ होता का? फडणवीस यांचा पूरग्रस्त भागाचा दौराही अखेर 'व्हाया ओला दुष्काळ' राजकारण, असाच झाला म्हणायचा!

 • विरोधी पक्षनेत्यांनी परिस्थितीचा ‘आँखों देखा हाल’ पाहिला व आता त्यांनी याबाबत त्यांना जे वाटते ते सरकारला सांगायला हवे. शेतीचे नुकसान झाले आहेच. शेतात, घरात पुराचे पाणी शिरल्याने हाहाकार माजला. हा एक प्रकारे ओला दुष्काळ आहे व या सर्व शेतकऱ्यांना तत्काळ मदत करावी, अशी मागणी फडणवीस यांनी केली ती योग्यच आहे. महाराष्ट्रातील पुराच्या विळख्यात सापडलेला शेतकरी हा राजकारणाचा विषय नाही.

 • मराठवाडय़ातील अनेक भागांत शेतकऱ्यांची घरे, गुरे-ढोरे वाहून गेली. माणसांनी भरलेल्या ‘एस.टी.’ बस वाहून गेल्या. घरे उद्ध्वस्त झाली. चुलीही पावसाने विझल्या. तेथील जनतेचा आक्रोश अस्वस्थ करणारा आहे. शेतकऱ्यांचा संताप विमा कंपन्यांविरुद्ध आहे. दोन-दोन वेळा पिकाचा विमा उतरविल्यावरही शेतकऱ्यांना नुकसानीचा छदाम हाती लागत नाही.

 • याच विमा कंपन्यांच्या मनमानीविरुद्ध शिवसेनेने आंदोलन केले होते व काही भागांत विमा कंपन्यांच्या कार्यालयाच्या काचा फोडून संताप व्यक्त केला होता. त्या वेळी विमा कंपन्यांच्या अधिकाऱ्यांनी शिवसेनेपुढे गुडघे टेकून शेतकऱ्यांचे पीक विम्याचे दावे निकाली काढतो असे वचन दिले होते, पण आजही शेतकऱयांच्या हातात काहीच पडले नसेल तर सरकारने या कंपन्यांना बडगा दाखवायलाच हवा.

 • नुकसानीचे पंचनामे अद्याप झाले नाहीत. पंचनामे झाले नाहीत या सबबीखाली विमा कंपन्यांची व सरकारी मदत नाकारली जाते. सरकारी नियमाने पिकांचा पंचनामा करायचा झाला तर पिकाच्या क्षेत्रातील एक बाय एक मीटरवरील पिकाची काढणी करावी लागते.

 • सोयाबीन पिकाचे नुकसान झाले आहे तर त्या शेतातील एक बाय एक मीटर क्षेत्रावरील सोयाबीनची काढणी करायची. एक बाय एक मीटरमध्ये एवढे नुकसान तर एका हेक्टरात किती नुकसान असे प्रमाण ठरवले जाते. अशा प्रकारे पीक नुकसानीची टक्केवारी ठरते.

 • अर्थात 33 टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान असेल तरच शेतकरी नुकसानभरपाईसाठी पात्र होतो, पण विमा कंपन्यांचे व सरकारचे प्रतिनिधी बांधावरून उतरून पंचनामे करीत नाहीत. त्यामुळे खरे पंचनामे व खरे नुकसान याबाबत गोंधळ होतो.

 • नैसर्गिक संकटांमुळे पिकाचे नुकसान होते तेव्हा पीक विम्याचे कवच शेतकऱ्यांचे तारणहार ठरते, पण त्या कवचालाच अनेक भोके पडली आहेत. मका, बाजरी, ज्वारी, भुईमूग, सोयाबीन, पुळीथ, मूग या पिकांचे नुकसान झाले आहे.

 • दोन महिन्यांपूर्वी कोल्हापुरात आलेल्या पुरामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले, पण केंद्रीय पाहणी पथके वेळेवर आली नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांना अद्याप मदत मिळू शकलेली नाही.

devendra fadnavis bjp politics shiv sena subhash sabane by poll saamana editorial
देगलूरमध्ये शिवसेनेचा माजी आमदार भाजपच्या गळाला; पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर
 • कोल्हापूरचे शेतकरी काय सांगतात तेसुद्धा राज्याच्या विरोधी पक्षनेत्यांनी समजून घेतले पाहिजे. ”आम्हाला आता केवळ तुमच्याकडूनच अपेक्षा आहे,” असे काही शेतकऱ्यांनी म्हणे फडणवीस व दरेकर यांना सांगितले. याचा अर्थ असा की, केंद्रातल्या मोदी सरकारने शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्यासाठी ठाकरे सरकारला सढळ हस्ते मदत करावी.

 • फडणवीस यांनी दिल्लीत जाऊन महाराष्ट्रासाठी मदत मागावी व राज्याचे रखडलेले पैसे आपले वजन वापरून घेऊन यावेत. शेतकरी चिंताग्रस्त आहेच.

 • संकट अस्मानी आहे व त्याच्याशी एकजुटीने लढायला हवे. ”आमचा मराठवाडय़ाच्या पूरग्रस्त भागाचा दौरा केवळ प्रशासनाला जागे करणे, शेतकऱ्यांच्या व्यथा सरकारपर्यंत पोहोचवून प्रशासनाकडून त्यांना मदत मिळवून देण्यासाठी आहे,” असे विरोधी पक्षनेते फडणवीस यांनी जाहीर केले. या त्यांच्या विधायक भूमिकेबद्दल त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच.

Related Stories

No stories found.