मोडला नाही कणा...नापिकीला कंटाळून दुग्धव्यवसायाकडे वळलेला शेतकरी कमावतोय लाखोंमध्ये

हिंगोलीचे शेतकरी पंडीत श्रुंगारेंची गोष्ट तुम्हालाही प्रेरणा देईल
मोडला नाही कणा...नापिकीला कंटाळून दुग्धव्यवसायाकडे वळलेला शेतकरी कमावतोय लाखोंमध्ये
दोन गाईंपासून सुरु झालेला हा व्यवसाय आता चांगलाच विस्तारला आहे

- ज्ञानेश्वर उंडाळ, हिंगोली प्रतिनिधी

महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याच्या मागे गेल्या काही वर्षांपासून दुष्टचक्र लागलेलंच आहे. कधी दुष्काळ तर कधी अतिवृष्टी यामुळे राज्यातला शेतकरी हा पुरता मेटाकुटीला येऊन गेला आहे. सततच्या नापिकीमुळे आपलं आयुष्य संपवणाऱ्या शेतकऱ्यांच्या बातम्या आपण अनेकदा वाचल्या आहेत. परंतू हिंगोलीतले शेतकरी पंडीत श्रुंगारे याला अपवाद ठरले आहेत. २००७ साली नापिकीला कंटाळून पंडीत श्रुंगारे यांनी घेतलेला निर्णय चांगलाच फायदेशीर ठरला आहे. शेतीला रामराम करत दुग्धव्यवसायाकडे वळलेले श्रुंगारे याच माध्यमातून आता लाखोंचं उत्पन्न घेत आहेत.

हिंगोली जिल्ह्यात २००७ साली झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेलं पिक वाया गेलं. श्रुंगारे यांनाही या परिस्थितीचा फटका बसला. कुटुंबाला हातभार लागावा यासाठी श्रुंगारे यांनी शिक्षण अर्ध्यावर सोडत शेती करण्याचा निर्णय घेतला होता. परंतू शेतीतूनही फारसं हातात काहीच येत नसल्यामुळे पुढे करायचं काय हा त्यांच्यासमोर प्रश्न होता. शेतीतून मिळणारं उत्पन्न हे अत्यंत कमी असल्यामुळे त्यांनी धाडस दाखवत दुग्धव्यवसायात उतरण्याचा निर्णय घेतला.

सुरुवातीला पंडीत यांनी एच.एफ. जातीच्या दोन गायी आणल्या. सुरुवातीचे दिवस त्यांना फारच कष्ट करावे लागले. हिंगोली जिल्ह्यातील टाकणगव्हाळ या गावात श्रुंगारे राहतात परंतू इथे दूध संकलन केंद्र नसल्यामुळे त्यांना ३० किलोमीटरचा प्रवास करुन आपल्या गाईंचं दूध देण्यासाठी जावं लागायचं. संकरीत गाईच्या दुधाला भाव मिळत नाही असं म्हणून अनेकांनी पंडीत श्रुंगारे यांना या व्यवसायात पडू नकोस म्हणत विरोधही केला. परंतू संकरीत गाईंमध्ये दुधाची क्षमता जास्त असल्यामुळे ते आपल्या निश्चयावरुन मागे हटले नाहीत.

कालांतराने श्रुंगारे यांच्या दुग्धव्यवसायाला चांगला प्रतिसाद मिळाला. यातून मिळालेल्या पैश्यांमधून त्यांनी आणखी संकरीत गाई विकत घेतल्या. हळुहळु श्रुंगारे यांच्या गोठ्यात जनावरांची संख्या आणि त्यातून मिळणारं उत्पन्न हे वाढतच गेलं. श्रुंगारेंना मिळालेलं यश पाहता गावातील काही तरुणांनीही त्यांची साथ देत या व्यवसायात उतरण्याचं ठरवलं. यानंतर गावातील लोकांनी दुग्धव्यवसायात येण्याचा निर्णय घेत एक दूध संकलन केंद्र उभारलं. आज श्रुंगारे यांच्याकडे ६० गाई आणि ३० वासरं आहेत.

श्रुंगारे यांनी इथेच न थांबता गाईंच्या शेणापासून आणि गोमुत्रातून गांडुळ खत निर्मीतीचा प्रकल्पही सुरु केला. आपल्या नावावर असलेल्या जमिनीत आता श्रुंगारे गुरांसाठी चारा लागवड करतात. या व्यवसायातून श्रुंगारे यांना वर्षाकाठी ३० ते ४० लाख रुपये मिळत आहेत.

सुरुवातीला दोन गाईंच्या सोबतीने सुरु केलेला श्रुंगारे यांचा व्यवसाय आता चांगलाच मोठा झाला आहे. गावातले अनेक तरुण त्यांचा गोठा पाहण्यासाठी येतात. या व्यवसायात येऊ इच्छिणाऱ्यांना श्रुंगारे आपुलकीने मार्गदर्शन करतात. श्रुंगारे यांना शिक्षक बनायचं होतं, परंतू परिस्थितीने ते पूर्ण होऊ शकलं नाही. परंतू मातीशी आपली नाळ कायम ठेवत श्रुंगारे दुग्धव्यवसायाचे धडे इतरांना देत आपलं शिक्षक बनण्याचं स्वप्न या न त्या मार्गाने पूर्ण करत आहेत.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in