नागपूर : ...अन् भरधाव बोलेरो झाडावर जाऊन आदळली; चार मजूर महिलांवर काळाची झडप

नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यातील घटना : पाच महिलांची प्रकृती गंभीर, रुग्णालयात उपचार सुरू
झाडावर आदळल्यानंतर गाडीची झालेली अवस्था.
झाडावर आदळल्यानंतर गाडीची झालेली अवस्था.

- योगेश पांडे, नागपूर

चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटल्याने झालेल्या भीषण अपघातात चार मजूर महिलांचा मृत्यू झाला, तर पाच जणी गंभीर जखमी झाल्या आहेत. नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यातील ईसापूर-घुबडमेट रस्त्यावर ही दुर्घटना घडली. बोलेरो गाडीतून महिला शेतात कामासाठी निघाल्या होत्या. रस्त्यातच काळाने चौघींवर झडप घातली.

संत्रा तोडण्यासाठी काही महिला मजूर बोलेरो पिकअप व्हॅनमधून जात होत्या. रविवारी पहाटे काटोल तालुक्यातील ईसापूर-घुबडमेट रस्त्यावरून जात असताना बोलेरो चालकाचं गाडीवरील ताबा सुटला. त्यानंतर भरधाव गाडी रस्त्याच्या कडेला असलेल्या एका झाडावर जाऊन आदळली.

गाडीचा वेग इतका होता की समोरील भागाचा चक्काचूर झाला. या अपघातात तीन महिला जागेवरच ठार झाल्या. तर एका महिलेचा रुग्णालयात घेऊन जात असताना मृत्यू झाला.

या अपघातात इतर पाच मजूर महिला जखमी झाल्या आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात असून, त्यांनाही जबर मार लागल्याची माहिती मिळाली आहे.

मनिषा सलाम, मंजुळा ऊईके, कलाताई परतेती व मंजुला धुर्वे अशी अपघातात मृत्यू झालेल्या मजूर महिलांची नावे आहेत.

घटनेची माहिती कुटुंबियांना कळाल्यानंतर त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. चार महिलांना अपघात जीव गमवावा लागल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in