
अहमदाबाद: गुजरातमधील अहमदाबादमध्ये एकाच कुटुंबातील 4 जणांची हत्या झाल्याची अत्यंत धक्कदायक घटना समोर आली आहे. घरगुती वादातून हे हत्याकांड घडले असावे, असा प्राथमिक संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. सध्या पोलिसांनी संशयाच्या आधारे कुटुंबातील एका बेपत्ता असलेल्या सदस्याचा शोध सुरू केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील ओढव भागातील दिव्यप्रभा सोसायटीतील एका घरातून अत्यंत दुर्गंधी येत होती. त्यामुळे स्थानिक नागरिकांनी ही बाब पोलिसांना कळवली. यावेळी पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहचले. ज्या घरातून प्रचंड दुर्गंधी येत होती ते घर खरं तर बाहेरुन बंद होतं. त्यामुळे घराचे कुलूप तोडून पोलिसांना आत प्रवेश करावा लागला. जेव्हा पोलिसांनी आत प्रवेश केला तेव्हा त्यांना घरातील वेगवेगळ्या खोल्यांमध्ये चार मृतदेह आढळून आले. प्राथमिक तपासात या चारही जणांची 4 दिवसांपूर्वी हत्या झाल्याचे निष्पन्न झाले आहे.
पोलिसांना असा संशय आहे की, घरात प्रचंड वाद झाल्यानंतर या घरातील प्रमुख विनोद मराठी यानेच आपली पत्नी सोनल मराठी, मुलगी प्रगती, मुलगा गणेश आणि सासू सुभद्रा यांची हत्या केली असावी. ज्यानंतर तो तिथून पसार झाला असावा.
वास्तविक, विनोद मराठी हा घटनास्थळावरून फरार असल्याने त्याच्यावरील पोलिसांचा संशय बळावत चालला आहे. पोलिसांच्या पथकांनी संशयिताचा शोध सुरू केला आहे. सध्या पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून पंचनामा केल्यानंतर चारही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहे.
अहमदाबादचे जेसीपी गौतम परमार यांनी सांगितले की, मृतांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले जात आहेत. याप्रकरणी पोलीस घरून पुरावे गोळा करत आहेत. तसेच संशयित आरोपींना पकडण्यासाठी पथके तयार करण्यात आली आहेत. लवकरच पोलीस या प्रकरणाचा छडा लावतील असा दावा करण्यात आला आहे.
दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाने परिसरात मात्र एक खळबळ उडाली आहे. एकाच घरातील चारही व्यक्तींची हत्या झाल्यानंतर देखील चार दिवसांनी हा प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे आता चारही हत्येप्रकरणातील आरोपीला लवकरात लवकर अटक करण्याचं मोठं आव्हान पोलिसांसमोर असणार आहे.