नगर-आष्टी दरम्यान हायस्पीड रेल्वेची चाचणी, बीडवासियांचं वर्षांपासूनचं स्वप्न होणार पूर्ण

गोपीनाथ मुंडे अमर रहे च्या घोषणांनी परिसर दुमदुमला, प्रीतम मुंडेंनी केलं रेल्वेचं स्वागत
नगर-आष्टी दरम्यान हायस्पीड रेल्वेची चाचणी, बीडवासियांचं वर्षांपासूनचं स्वप्न होणार पूर्ण

बीड जिल्ह्यासाठी अत्यंत जिव्हाळ्याचा विषय असलेल्या नगर-बीड-परळी रेल्वे प्रकल्प लवकरच पूर्णत्वाकडे जाण्याच्या मार्गावर आहे. आज नगर ते आष्टीदरम्यान हायस्पीड रेल्वेची चाचणी घेण्यात आली. बीड जिल्ह्याचे दिवंगत ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांच्या काळापासून जिल्ह्यात रेल्वेमार्गाचा प्रश्न प्रलंबित होता. अहमदनगर रेल्वे स्थानक ते आष्टीपर्यंत चाचणीच्या निमित्ताने रेल्वेचे प्रथमच बीड जिल्ह्यात आगमन झाले, यावेळी आष्टी रेल्वे स्थानकावर मुंडे समर्थकांनी या रेल्वेचं जोरदार स्वागत केलं.

बीडच्या खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांनी या रेल्वेचं स्वागत केलं. यादरम्यान मुंडे समर्थकांनी गोपीनाथ मुंडेंच्या नावाने घोषणा देत परिसर दणाणून सोडला.

हायस्पीड रेल्वे टेस्टदरम्यान जमा झालेली गर्दी
हायस्पीड रेल्वे टेस्टदरम्यान जमा झालेली गर्दी

नगर-बीड-परळी रेल्वे प्रकल्पाचे काम सध्या जलदगतीने सुरू आहे. नगर ते आष्टी दरम्यान लोहमार्गाचे काम पूर्ण झाल्यानंतर या मार्गावर हायस्पीड रेल्वेची चाचणी घेण्यात आली. बीड जिल्ह्यासाठी हा क्षण अत्यंत आनंदाचा आणि अभिमानाचा असल्याची प्रतिक्रिया यावेळी खासदार प्रीतम मुंडे यांनी दिली.यावेळी आमदार सुरेश धस जिल्ह्यातील अन्य महत्वाचे नेते आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

रेल्वेचे स्वागत केल्यानंतर खासदार प्रीतम मुंडे यांनी विधिवत पूजा करून रेल्वेपूर्तीचा नारळ फोडला. यावेळी त्यांनी रेल्वे स्थानकाची पाहणी केली, तसेच रेल्वे ट्रॅकवर चालत लोहमार्ग ही बघितला. रेल्वे हा जिल्ह्याच्या आणि आमच्या अस्मितेचा विषय असल्याने लवकरात लवकर हा प्रकल्प पूर्ण करून जिल्ह्यात रेल्वे धावती ठेवू अशी हमी प्रीतम मुंडे यांनी दिली.

दुसरीकडे पंकजा मुंडेंनीही या ऐतिहासीक क्षणाच्या निमीत्ताने सोशल मीडिया अकाऊंटवर गोपीनाथ मुंडेंनी या प्रकल्पासाठी केलेल्या मेहनतीला सलाम केला. बाबा..! इतिहास बनाती इस रफ्तार में आप हो..हमारी हर आगाज में आप हो..अशा शब्दांत लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेबांचं गौरव करणारं लक्षवेधी ट्विट भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी केलं आहे.

यावेळी बीड रेल्वेच्या स्वप्नपूर्तीबद्दल त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस व सुधीर मुनगंटीवार यांचेही आभार मानले आहेत.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in