काश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांचा हैदोस! चकमकीत पाच जवान शहीद

गेल्या काही दिवसांपासून काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्यांत वाढ : घुसखोरी विरोधी मोहिमेदरम्यान झाली धुमश्चक्री
काश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांचा हैदोस! चकमकीत पाच जवान शहीद
जवान आणि दहशतवाद्यांमध्ये धुमश्चक्री झाली. यात पाच जवानांना वीर मरण आलं.PTI

गेल्या काही दिवसांपासून दहशतवाद्यांनी काश्मीर खोऱ्यात हैदोस घातला असून, आज झालेल्या चकमकीत भारतीय लष्करातील पाच जवान शहीद झाले आहेत. घुसखोरी रोखण्यासाठी सुरू असलेल्या मोहिमेदरम्यान जवान आणि दहशतवाद्यांमध्ये धुमश्चक्री झाली. यात पाच जवानांना वीर मरण आलं. (1 JCO along with 4 soldiers lost their life during counter terror operation In Poonch sector)

दहशतवादी वास्तव्याला असल्याची माहिती मिळाल्यानंतर भारतीय लष्कराने घुसखोरी विरोधी मोहीम सुरू केली होती. पुंछ सेक्टरमध्ये असलेल्या डीकेजीमधील सुरणकोटजवळ असलेल्या गावात सर्च ऑपरेशन सुरु केलं होतं. तीन ते चार दहशतवादी असलेल्याची माहिती असल्यानं परिसराला लष्कराने वेढा दिला होता.

यावेळी दहशतवादी आणि जवानांमध्ये जोरदार धुमश्चक्री झाली. या गोळीबारात लष्कराचे पाच जवान धारातीर्थी पडले. यात एक ज्युनिअर कमिशन ऑफिसर असून, चार जवान आहेत, अशी माहिती लष्कराच्या प्रवक्त्यांनी दिली आहे.

चकमकीची माहिती मिळाल्यानंतर पोलीस आणि लष्कराच्या जवान घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर संपूर्ण परिसराला वेढा देण्यात आला असून, दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

सुरणकोट विभागातील मुघलरोड परिसरात असलेल्या जंगलात घुसखोरी होण्याची शंका लष्कराला असल्याची माहिती सूत्रांनी इंडिया टुडेशी बोलताना दिली. दरम्यान, यापूर्वी बांदीपोरा जिल्ह्यात झालेल्या चकमकीत जवानांनी एका दहशतवाद्याचा खात्मा केला होता. तर अनंतनाग जिल्ह्यातही एका दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात आलं.

काश्मिरात दहशतवाद्यांकडून हत्यासत्र

कलम 370 रद्द केल्यानंतर काश्मीर खोऱ्यात दहशतावाद्यांनी पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. गेल्या काही दिवसांपासून काश्मिरी पंडित आणि शिखांना लक्ष्य केलं जात आहे. दोन-तीन दिवसांपूर्वीच दहशतवाद्यांनी एका शाळेत घुसून प्राचार्यांसह दोन शिक्षकांची गोळ्या घालून हत्या केली.

गुरूवारी करण्यात आलेल्या या हल्ल्यात शिख समुदायातील प्राचार्या सुपिंदर कौर आणि शिक्षक दीपक चंद यांचा मृत्यू झाला. शिक्षकांना गोळ्या घातल्यानंतर दहशतवाद्यांनी परिसरातून पोबारा केला.

एका आठवडाभरात काश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांनी सात नागरिकांच्या हत्या केल्या आहेत. ज्यात चार जण अल्पसंख्याक समुदायातील होते. यातील सहा हत्या या श्रीनगरमध्ये करण्यात आल्या.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in