डोंबिवलीमधील हृदयद्रावक घटना! पाणीटंचाईने घेतले एकाच कुटुंबातील पाच जणांचे प्राण
डोंबिवलीत एक दुर्दैवी घटना घडली आहे. पाणीटंचाईमुळे खदानीवर कपडे धुण्यासाठी गेलेल्या एकाच कुटुंबातील पाच जणांचा बुडून मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये दोन महिलांसह तीन मुलांचा समावेश आहे. या घटनेनंतर मृतदेह नेण्यात आलेल्या महापालिकेच्या रुग्णालयात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. अनेक ठिकाणी वाढत्या पाऱ्याबरोबच पाणीटंचाईच्या झळा नागरिकांना सोसाव्या लागत आहे. पाणी मिळवण्यासाठी नागरिक जीव मुठीत घेऊन धडपडत […]
ADVERTISEMENT

डोंबिवलीत एक दुर्दैवी घटना घडली आहे. पाणीटंचाईमुळे खदानीवर कपडे धुण्यासाठी गेलेल्या एकाच कुटुंबातील पाच जणांचा बुडून मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये दोन महिलांसह तीन मुलांचा समावेश आहे. या घटनेनंतर मृतदेह नेण्यात आलेल्या महापालिकेच्या रुग्णालयात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती.
अनेक ठिकाणी वाढत्या पाऱ्याबरोबच पाणीटंचाईच्या झळा नागरिकांना सोसाव्या लागत आहे. पाणी मिळवण्यासाठी नागरिक जीव मुठीत घेऊन धडपडत असल्याचं दृश्य ग्रामीण भागात दिसून असून, कल्याण ग्रामीणमध्येही मोठ्या प्रमाणावर पाणीटंचाई भेडसावत आहे.
पाणीटंचाईमुळे खदानीवर कपडे धुण्यासाठी गेलेल्या एका कुटुंबातील पाच जणांना जीव गमावावा लागला. शनिवारी (७ मे) दुपारी कपडे धुण्यासाठी आणि इतर वापरासाठी नेहमीप्रमाणे पाणी आणण्यासाठी खदानीवर गेलेल्या एकाच कुटुंबातील ५ जणाचा खदानीत बुडाल्याने मृत्यू झाला.
डोंबिवली नजीकच्या संदप गावात ही घटना घडली आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या मदतीने सर्व मृतदेह बाहेर काढून रुग्णालयात पाठवले गेले. मात्र, त्यानंतर महापालिकेच्या शास्त्रीनगर हॉस्पिटलमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
नंतर मृतदेह कल्याणच्या रुख्मिणी बाई हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करण्यात आले. अपेक्षा गौरव गायकवाड (वय ३०), मीरा सुरेश गायकवाड (वय ५५), मयुरेश मनिष गायकवाड (वय १५), मोक्ष मनिष गायकवाड (वय १३), सिद्धेश कैलाश गायकवाड (वय १५) अशी मृतांची नावं आहेत.
गावात पाण्याची मोठी समस्या आहे. त्यामुळे लोक खदानीवर जाऊन कपडे धुतात. पाणी न आल्याने कपडे धुण्यासाठी एकाच घरातील दोन महिला आणि तीन मुले खदानीवर गेले होते.
१३ वर्षीय मोक्ष गायकवाड पाण्यात बुडू लागला. त्याला वाचवण्यासाठी एक-एक करून इतर लोकांनीही पाण्यात उड्या घेतल्या. दुर्दैवाने सगळ्यांनाच यात प्राण गमवावा लागला, असं सांगितलं जात आहे.