“गद्दार कोण आणि खुद्दार कोण महाराष्ट्राला माहित आहे” मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं उद्धव ठाकरेंना उत्तर
मुख्यमंत्री व्हायला मिळावं म्हणून उद्धव ठाकरेंनी भाजपला दूर केलं आणि काँग्रेस राष्ट्रवादी सोबत आघाडी केली असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंच्या भाषणाला दिल्लीतून उत्तर दिलं आहे. एवढंच नाही तर गद्दार कोण आणि खुद्दार कोण? हे महाराष्ट्राला माहित आहे असंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. आम्हाला खोके सरकार म्हणून हिणवलं जातं आहे. पण लक्षात […]
ADVERTISEMENT

मुख्यमंत्री व्हायला मिळावं म्हणून उद्धव ठाकरेंनी भाजपला दूर केलं आणि काँग्रेस राष्ट्रवादी सोबत आघाडी केली असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंच्या भाषणाला दिल्लीतून उत्तर दिलं आहे. एवढंच नाही तर गद्दार कोण आणि खुद्दार कोण? हे महाराष्ट्राला माहित आहे असंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. आम्हाला खोके सरकार म्हणून हिणवलं जातं आहे. पण लक्षात ठेवा माझ्याकडे सगळ्यांचा हिशोब आहे असाही इशारा एकनाथ शिंदे यांनी दिला आहे.
उद्धव ठाकरेंना एकनाथ शिंदे यांचं उत्तर
आत्तापर्यंत मुलं पळवणारी टोळी ऐकली होती, बाप पळवणारी टोळी महाराष्ट्रात फिरते आहे असं उद्धव ठाकरेंनी म्हणत एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत गेलेल्या आमदारांवर टीका केली होती. एकनाथ शिंदे हे बंड केल्यापासूनच आम्ही बाळासाहेब ठाकरेंचा विचार पुढे घेऊन जात आहोत असं वारंवार सांगत आहेत. तोच संदर्भ घेऊन उद्धव ठाकरेंनी टीका केली होती या टीकेलाही एकनाथ शिंदे यांनी उत्तर दिलं आहे. तुम्ही बापाचे विचार आणि पक्ष विकणारी टोळी आहात का? असा प्रश्न एकनाथ शिंदे यांनी विचारला.
उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपद हवं होतं
२०१९ च्या निवडणुकीचा निकाल आल्यानंतर शिवसेनेत चर्चा सुरू झाल्या की आमच्याकडे सगळे पर्याय खुले आहेत. जर निवडणूक भाजप आणि शिवसेना यांनी युती म्हणून निवडणूक लढवली होती तर मग सगळे पर्याय खुले आहेत हे कसं काय बोललं गेलं? आपण ज्या पक्षासोबत लढलो त्यांच्यासोबत का राहिलो नाही? त्यामुळेच आम्ही अशा सरकारपासून जनतेला मुक्ती दिली. आम्ही तो निर्णय घेतला कारण ही गोष्ट जनतेच्या मनात होती असंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. आम्हाला गद्दार म्हटलं जातं आहे पण गद्दारी कुणी केली ते सगळ्यांना माहित आहे. एवढंच काय गद्दार कोण आणि खुद्दार कोण हे सगळ्या महाराष्ट्राला माहित आहे असंही एकनाथ शिंदेंनी म्हटलं आहे.
आम्ही जनतेच्या भावनेचा सन्मान केला आहे
महाराष्ट्रातल्या जनतेला हे वाटतं आहे की आपल्यातला माणूस मुख्यमंत्री झाला आहे. जनतेच्या मनात जे होतं तेच आम्ही केलं आहे. आम्ही जनतेच्या भावनेच्या सन्मान केला आहे. आम्हाला आज मिंधे गट असं म्हटलं गेलं आहे. मात्र सत्तेसाठी काँग्रेस राष्ट्रवादीपुढे मिंधे कोण झालं ते सगळ्यांना माहित आहे. आम्ही मिंधे नाही तर आम्ही बाळासाहेब ठाकरेंचे खंदे कार्यकर्ते आहोत असंही उत्तर एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना दिलं.
आम्ही ढोकळा खाऊन नाही ठेचा खाऊन मोठे झालो आहोत
आम्ही ढोकळा खाऊन नाही तर ठेचा खाऊन मोठे झालो आहोत. त्यामुळेच त्यांना ठेचलं आहे. बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आम्ही पुढे घेऊन जात आहोत. आम्हाला बाप चोरणारी टोळी असंही म्हटलं गेलं. मग तुम्हाला बापाचे विचार आणि पक्ष विकणारी टोळी म्हणायचं का?असाही प्रश्न एकनाथ शिंदे यांनी विचारला आहे.