Maratha Reservation : मूक आंदोलनात सहभागी होणाऱ्या लोक प्रतिनिधींना उलटसुलट बोलू नका-संभाजीराजे

बुधवारपासून मराठा आरक्षणासाठी आंदोलनाला होणार सुरूवात
खा. संभाजीराजे
खा. संभाजीराजे(फाईल फोटो, सौजन्य - Facebook)

खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा आरक्षणासाठी आंदोलनाची हाक दिली आहे. 6 जून रोजी रायगड या ठिकाणी झालेल्या शिवराज्याभिषेक सोहळ्यानंतर संभाजीराजेंनी मराठा आरक्षणावर आपली भूमिका मांडली. येत्या 16 जूनपासून (उद्या) कोल्हापुरातील राजर्षी शाहू महाराजांच्या समाधीपासून मराठा आरक्षणाला सुरूवात होणार आहे. या आंदोलनाची तयारी पाहण्यासाठी संभाजीराजे आंदोलन स्थळी दाखल झाले होते. त्यावेळी त्यांनी मूक मोर्चात जे सहभागी होणार आहेत त्या आंदोलकांसोबत संवाद साधला. तसंच आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अनेक बाबींचा आढावाही घेतला. मराठा क्रांती मोर्चा तर्फे आयोजित करण्यात आलेल्या आंदोलनात सहभागी होणाऱ्या लोकप्रतिनिधींना काहीही उलटसुलट बोलू नका असंही आवाहन संभाजीराजेंनी केला आहे.

खा. संभाजीराजे
संभाजीराजे - प्रकाश आंबेडकर एकत्र आले तर पेशवाईला फटका, नाना पटोलेंची भाजपवर बोचरी टीका

काय म्हणाले संभाजीराजे?

'उद्याचं (बुधवार) आंदोलन हे मूक आंदोलन आहे. अनेकांना वाटतं की हा मोर्चा आहे. मात्र हा मोर्चा नाही तर मूक आंदोलन आहे. आपल्याला मूक मोर्चा काढायचा असता तर आपण काढू शकलो असतो. पण सध्या मोर्चा काढण्यासारखी परिस्थिती नाही. एवढंच नाही तर मला हे देखील वाटतं की आपण लोकांना वेठीला का धरायचं? सध्या कोरोनाच्या साथीमुळे लोक असंही त्रासले आहेत. अशात त्यांना आणखी त्रास का द्यायचा? आपल्या मराठा समाजाला ज्या भावना व्यक्त करायच्या आहेत त्या आपण 58 मूक मोर्चांच्या माध्यमातून व्यक्त केल्या आहेत. समाज बोलला आहे त्याने आता पुन्हा रस्त्यावर का उतरायचं? आता आपल्या लोकप्रतिनिधींनी बोललं पाहिजे ते जास्त महत्त्वाचं आहे. आपल्या आंदोलनासाठी सर्वच आमदार, खासदार सगळ्यांना आपण बोलावलं आहे. मला अपेक्षा आहे की सगळेजण येतील'

खा. संभाजीराजे
आम्हाला हवं आमच्या हक्काचं आरक्षण -उदयनराजे

आपल्या मूक आंदोलनात जे लोकप्रितिनिधी सहभागी होतील त्यांना सन्मानपूर्वक वागणूक द्या, कारण ते आपल्यासाठी आपल्या समाजासाठी इथे येणार आहेत. त्यांना उलटसुलट प्रश्न विचारायचे नाही. उद्या कोणीही बोलायचं नाही. माझ्यासह आपण सगळ्यांनी मौन राखायचं आहे. आंदोलनासाठी येणाऱ्या लोकप्रतिनिधींना बोलू द्यायचं आहे त्यांना त्यांचं मन मोकळं करू द्या. हवं तेवढा वेळ बोलू द्या. पण त्यांनी आपल्या आंदोलनात येणं आपल्याला साथ देणं महत्त्वाचं आहे. मला विश्वास आहे की सगळे जण येतील असंही खासदार संभाजीराजे छक्षपती यांनी म्हटलं आहे.

आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अनेकांनी संपर्क साधला यामध्ये पोलिसांचाही समावेश होता. आपण त्यांना हे स्पष्ट केलं आहे की हे मूक आंदोलन आहे. राज्यभरातील समन्वयक कोल्हापुरात येणार आहेत. त्यामुळे त्यांची व्यवस्था करणं ही देखील आपली जबाबदारी आहे. आपल्याला कोणताही कायदा हातात घ्यायचा नाही. कोरोना नियमांचं पालन करून आणि अंतर ठेवून शांतपणे आंदोलन करायचं आहे असंही आवाहन संभाजीराजेंनी केलं आहे.

21 जूनला नाशिकमध्ये होणार आंदोलन

21 जून रोजी नाशिकमध्ये मराठा क्रांती मोर्चा तर्फे आंदोलन होणार कोल्हापूर नंतर नाशिक मध्ये होणार मराठा आरक्षण मागणीसाठी आंदोलन, काळ्या फिती व कपडे घालून करणार मूक आंदोलन, संभाजी राजे छत्रपती असणार उपस्थित असणार आहेत.

Related Stories

No stories found.
logo
Mumbai Tak
www.mumbaitak.in