मंगेशकर कुटुंबीयांची ही कृती 12 कोटी मराठी माणसांचा अपमान करणारी -जितेंद्र आव्हाड

मंगेशकर कुटुंबाने पुरस्कार सोहळ्याच्या पत्रिकेत उद्धव ठाकरेंचं नाव न छापल्याने जितेंद्र आव्हाड यांचा संताप
मंगेशकर कुटुंबीयांची ही कृती 12 कोटी मराठी माणसांचा अपमान करणारी -जितेंद्र आव्हाड

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या नावे दिला जाणारा पहिला पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदींना आज मुंबईत देण्यात आला. मुंबईतल्या षण्मुखानंद सभागृहात हा सोहळा रंगला होता. या सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लतादीदींची संगीतसाधना आणि त्यांच्या मनात असलेलं राष्ट्रप्रेम यावर भाष्य केलं. या सोहळ्यावरून मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मात्र मंगेशकर कुटुंबावर गंभीर आरोप केला आहे.

मंगेशकर कुटुंबीयांची ही कृती 12 कोटी मराठी माणसांचा अपमान करणारी -जितेंद्र आव्हाड
संगीतसाधना आणि राष्ट्रप्रेम हे लतादीदींच्या मनात ओतप्रोत भरलेलं होतं-पंतप्रधान नरेंद्र मोदी

काय म्हटलं आहे जितेंद्र आव्हाड यांनी?

"लता मंगेशकर पुरस्कार सोहळ्याच्या निमंत्रण पत्रिकेवर मुख्यमंत्र्यांचे नाव टाकण्याचं मंगेशकर कुटुंबीयांनी टाळले.त्यांची ही भूमिका अगम्य आहे. या राज्यात राहून अमाप लोकप्रियता मिळवणाऱ्या मंगेशकर कुटुंबीयांची ही कृती 12 कोटी मराठी माणसांचा अपमान करणारी आहे."

#निषेध

जितेंद्र आव्हाड यांनी मंगेशकर कुटुंबावर हा आरोपच केला आहे. याच वर्षी लता मंगेशकर यांचं निधन झालं. त्यानंतर त्यांच्या नावाने म्हणजेच लता दीनानात मंगेशकर या नावाने पुरस्कार सुरु करण्याची घोषणा मंगेशकर कुटुंबाने केली. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हा पुरस्कार दिला जाईल हेदेखील त्यांनी जाहीर केलं. आज मुंबईत हा सोहळा रंगला होता. या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट होईल. त्यांना एकाच मंचावर पाहण्यास मिळेल असे अंदाज लावले जात होते. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं नाव निमंत्रण पत्रिकेवर नसल्याने त्यांनी या कार्यक्रमाला जाणं टाळलं अशी चर्चा आहे.

या कार्यक्रमाला राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह शिवसेना नेते सुभाष देसाई यांची उपस्थिती होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जेव्हा विमानतळावर आले तेव्हा राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांनी त्यांचं स्वागतही केलं. आता चर्चा रंगली आहे ती जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या ट्विटची. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं नाव निमंत्रण पत्रिकेवर न छापणं हा महाराष्ट्राच्या १२ कोटी जनतेचा अपमान आहे असा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. त्यामुळे या सोहळ्याला वादाचं वळण लागलं आहे.

काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी?

संगीत साधना आणि ईश्वराची साधना ही लता मंगेशकर यांच्यासाठी एकच होती. लता मंगेशकर यांचं संगीत क्षेत्रातलं योगदान खूप मोठं आहे. त्यांनी आठ दशकं संगीत क्षेत्रात मोलाचं योगदान दिलं. त्यांना भारतरत्न पुरस्कार देऊन भारताचा गौरव झाला असं वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लता दिनानाथ मंगेशकर पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

Related Stories

No stories found.