PM Modi : शेतकरी आंदोलनाचा विजय! कृषी कायदे रद्द करण्याची पंतप्रधान मोदींनी केली घोषणा
केंद्र सरकारने लागू केलेल्या कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला मोठं यश मिळालंं आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाची अखेर केंद्र सरकारने दखल घेतली आहे. तीन कृषी कायदे रद्द करत असल्याची घोषणा पंतप्रधान मोदी यांनी आज केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी देशाला संबोधित केलं. गुरुनानक जयंतीच्या पार्श्वभूमीवर मोदी काय […]
ADVERTISEMENT

केंद्र सरकारने लागू केलेल्या कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला मोठं यश मिळालंं आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाची अखेर केंद्र सरकारने दखल घेतली आहे. तीन कृषी कायदे रद्द करत असल्याची घोषणा पंतप्रधान मोदी यांनी आज केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी देशाला संबोधित केलं. गुरुनानक जयंतीच्या पार्श्वभूमीवर मोदी काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. पंतप्रधान मोदी यांनी केंद्र सरकारने लागू केलेल्या तिन्ही कृषी कायद्यांवर भाष्य केलं. त्याचबरोबर तिन्ही कायद्यांचं महत्त्व पटवून देण्यात सरकार म्हणून कमी पडलो असल्याचं सांगत कृषी कायदे रद्द करण्याची घोषणा केली.
पंतप्रधान मोदी म्हणाले, “पाच दशकांच्या सार्वजनिक आयुष्यात मी शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या समस्या आणि त्यांची आव्हान जवळून बघितली आहेत. त्यामुळे जेव्हा देशाने मला पंतप्रधानपदाची संधी दिली. तेव्हा शेतकऱ्यांच्या कल्याणाला आम्ही प्राधान्यक्रम दिला. देशात १०० पैकी ८० शेतकरी अल्पभूधारक आहे. त्यांच्याकडे दोन हेक्टरपेक्षाही कमी जमीन आहे. त्यांची संख्या १० कोटींहून अधिक आहे. ही माहिती बऱ्याचजणांना माहिती नाही.”
“याच जमिनीच्या तुकड्यावर ते स्वतःचा आणि कुटुंबियांचा उदरनिर्वाह चालवतात. पिढ्यानपिढ्या कुटुंबियांत होणारी जमिनीची विभागणी जमिनीचे आणखी तुकडे करत आहेत. त्यामुळे सरकारने बियाणांपासून सर्वच बाबींवर काम केलं आहे. विविध योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना जोडलं आहे”, असं मोदी म्हणाले.
एमएसपी अधिक प्रभावी आणि पारदर्शक करण्यासाठी एक समिती नेमली जाईल. जे केलं ते शेतकऱ्यांसाठी केलं आहे. जे करत आहे ते देशासाठी करत आहे. तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मी मेहनत करण्यात कोणतीही कमी ठेवली नाही. मी आपल्याला ग्वाही देतो की, तुमची स्वप्न आणि देशाची स्वप्न साकार व्हावी म्हणून आणखी मेहनत करेन”, असं मोदी म्हणाले.
“कृषी कायद्यासंदर्भातील सर्व घडामोडी देशवासियांना माहिती आहेत. मी आज देशवासीयांची माफी मागतो. खऱ्या मनाने आणि पवित्र ह्रदयाने सांगू इच्छितो की आमच्या तपश्चर्येत उणीव राहिली. ज्यामुळे दिव्याच्या प्रकाशाप्रमाने असलेलं सत्य आम्ही काही शेतकरी बांधवांना समजून सांगू शकलो नाही. आज गुरूनानकजींचा पवित्र प्रकाश पर्व आहे. ही वेळ कुणाला दोष देण्याचा नाही. मी देशाला हे सांगण्यासाठी आलोय की, तिन्ही कृषी कायदे रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. या महिन्यात होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात कृषी कायदे रद्द करण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाईल”, अशी घोषणा मोदी यांनी केली.