महापौर किशोरी पेडणेकर यांच्या परिवाराला धमकीचं पत्र, जिवे मारण्याची धमकी
गेल्या काही दिवसांपासून मुंबईत महापौर किशोरी पेडणेकर आणि भाजप आमदार आशिष शेलार यांच्यातील वादामुळे पुन्हा एकदा शिवसेना-भाजप आमने-सामने आलेले पहायला मिळाले. हा वाद ताजा असतानाच महापौर किशोरी पेडणेकर यांना आज एक धमकीचं पत्र मिळालं आहे. पेडणेकर यांच्या वरळी येथील निवासस्थानावर हे पत्र आलं असून यात पेडणेकर यांच्या परिवारालाही धमकी देण्यात आल्याचं कळतंय. ज्यात अश्लील भाषेचा […]
ADVERTISEMENT

गेल्या काही दिवसांपासून मुंबईत महापौर किशोरी पेडणेकर आणि भाजप आमदार आशिष शेलार यांच्यातील वादामुळे पुन्हा एकदा शिवसेना-भाजप आमने-सामने आलेले पहायला मिळाले. हा वाद ताजा असतानाच महापौर किशोरी पेडणेकर यांना आज एक धमकीचं पत्र मिळालं आहे.
पेडणेकर यांच्या वरळी येथील निवासस्थानावर हे पत्र आलं असून यात पेडणेकर यांच्या परिवारालाही धमकी देण्यात आल्याचं कळतंय. ज्यात अश्लील भाषेचा वापर करण्यात आला असून जर ‘दादा’सोबत वाकड्यात शिराल तर त्याचे परिणाम भोगावे लागतील असा उल्लेख आहे. आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी किशोरी पेडणेकर यांनी आशिष शेलारांविरुद्ध FIR दाखल केल्यानंतर हे पत्र आल्यामुळे पुन्हा एकदा वादाला तोंड फुटलं आहे.
दरम्यान या प्रकरणाबद्दल महापौर किशोरी पेडणेकर यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत माहिती दिली. “मला हे धमकीचं पत्र सकाळी मिळालं. मी नेहमी माझ्या प्रतिमेला सांभाळत आली आहे. परंतू आज आलेल्या पत्रात अश्लाघ्य भाषा वापरण्यात आलेली आहे की जे मी वाचूनही दाखवू शकत नाही. या पत्रात मला मारून टाकण्याविषयी उल्लेख आहे, इतकच नव्हे माझ्याबद्दलही अश्लिल शब्दांत लिहीण्यात आलेलं आहे”. हे बोलत असताना पत्रकार परिषदेत किशोरी पेडणेकरांना आपले अश्रु अनावर झाले होते.
यावेळी बोलत असताना पेडणेकर यांनी राजकारणाचा स्तर घसरत चालल्याबद्दल खंत व्यक्त केली. “मी राजकारणात आहे पण जर कोणी माझ्या परिवाराला हानी पोहचवत असेल तर मी शांत बसणार नाही. विजेंद्र म्हात्रे या नावाने हे धमकीचं पत्र मला मिळालं आहे.” जर राजकारणीच अशा प्रकारची वक्तव्य करणार असतील तर सामान्य लोकंही तेच करतील असं म्हणत किशोरी पेडणेकर यांनी आशिष शेलारांना टोला लगावला आहे.